कोसोवो वंशाच्या स्विस खेळाडूंच्या जल्लोषामुळे सर्बिया संतप्त 

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

मला राजकारणात पडायचे नाही. आम्ही येथे शक्‍य त्या सर्वोत्तम पद्धतीने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आहोत. आम्ही काही ध्येय ठेवले आहेत. आम्हाला बाकी कशातही रस नाही. 
- म्लादेड क्रॅस्टॅजिच, सर्बियाचे प्रशिक्षक 

 

कालिनीग्राड - ग्रॅनीट झाका आणि झेर्दान शकिरी या स्वित्झर्लंडच्या खेळाडूंमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. सर्बियाविरुद्ध गोल करण्याशिवाय हे दोघे अल्बानियन कोसोवो वंशाचे आहेत. सर्बियापासून वेगळे होत दहा वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य जाहीर केलेल्या कोसोवोशी त्यांचा संबंध आहे. त्यांनी हे दाखविणारा जल्लोष केल्यामुळे सर्बियात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

अल्बानियाच्या ध्वजावर दोन गरूड आहेत. त्यास "डबल ईगल' असे संबोधले जाते. गरूडाची भरारी प्रदर्शित होईल, अशा पद्धतीने हातांनी हावभाव करीत या दोघांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे कोसोवोमध्येसुद्धा स्वित्झर्लंडच्या विजयानंतर जल्लोष झाला. स्वित्झर्लंडचे मार्गदर्शक व्लादिमीर पेट्‌कोविच बोस्नियात जन्मले. ते म्हणाले की, "फुटबॉल आणि राजकारणाची गल्लत घालणे योग्य नाही. तुम्ही चाहता असणे आणि खेळाचा आदर करणे महत्त्वाचे आहे.' 

काय आहे इतिहास? 
सर्बिया आधी तत्कालीन युगोस्लाव्हियापासून वेगळा झाला. त्यानंतर कोसोवोने सर्बियापासून वेगळे होण्याचे दडपण आणले. कोसोवोतील अल्बानियन वंशाच्या जनतेवर सर्बियाने निर्बंध लादले होते. 1999 मध्ये "नाटो' सैन्याच्या हस्तक्षेपानंतरच हा वाद थांबला होता. 2008 मध्ये कोसोवोने सर्बियापासून वेगळे होत स्वातंत्र्य जाहीर केले. सर्बियाने मात्र स्वतंत्र देश म्हणून कोसोवोला मान्यता दिलेली नाही. विशेष म्हणजे रशिया हा सर्बियाचा मित्र देश आहे. रशियाची सुद्धा कोसोवोला मान्यता नाही. त्यामुळे रशियातील स्पर्धेत सर्बियाविरुद्ध कोसोवो वंशाच्या दोन खेळाडूंचा जल्लोष आणखी वादग्रस्त ठरला. 

झाका-शकिरी यांचे मूळ 
झाका आणि शकिरी हे दोघे कोसोवोचे आहेत. झाकाच्या वडिलांना युगोस्लाव्हिया साडेतीन वर्षे राजकीय तुरुंगवास भोगला. कोसोवोच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना जेरबंद करण्यात आले होते. शकिरीचा जन्म कोसोवोत झाला. निर्वासित म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी स्वित्झर्लंडला स्थलांतर केले. या दोघांशिवाय मध्य फळीतील वॅलोन बेहरामी याचा जन्मसुद्धा कोसोवोत झाला. त्याच्या दंडावर कोसोवो तसेच स्वित्झर्लंडच्या ध्वजांचे "टॅटू' आहेत. 

मला राजकारणात पडायचे नाही. आम्ही येथे शक्‍य त्या सर्वोत्तम पद्धतीने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आहोत. आम्ही काही ध्येय ठेवले आहेत. आम्हाला बाकी कशातही रस नाही. 
- म्लादेड क्रॅस्टॅजिच, सर्बियाचे प्रशिक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shadow of Kosovo hangs over Switzerland’s crunch tie with Serbia