कर के दिखा दे गोल

संजय घारपुरे
Sunday, 9 July 2017

कर के दिखा दे गोल... विश्वकरंडक कुमार फुटबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात सादर होणाऱ्या या गीताचे हे शब्द भारतीय फुटबॉलसाठी अनेक अर्थांनी मोलाचे आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा फुटबॉल लोकप्रियतेचा दर्जा उंचावण्याचा गोल कसा साध्य होतो, हे या स्पर्धेच्या दृष्टीने मोलाचे असेल....

विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉची रंगीत तालीम सुरू होती. त्यात भारताची सलामीची लढत स्पेनविरुद्ध असल्याचे जाहीर झाले. हे खरंच घडले तर... दोन वर्षांपर्यंत गवताचे पातेही नसलेल्या खडबडीत मैदानावर धडे गिरवलेले खेळाडू आणि शिस्तबद्ध यंत्रणेतून; तसेच व्यावसायिक मुशीतून घडलेले खेळाडू यांच्यातील ही लढत झाली असती. जणू दोन टोकाच्या ध्रुवावरील संघ एकमेकांविरुद्ध लढले असते.

आता स्पर्धेचा अधिकृत ड्रॉ या तुलनेत सोपा झाला; पण हे दगडापेक्षा वीट मऊ असे म्हणण्यासारखेच झाले. अमेरिका, कोलंबिया, घानो हे स्पेनपेक्षा काही कमी ताकदवान नाहीत. अमेरिका तुलनेत दुबळे वाटत असतील; पण ते या स्पर्धेसाठी केवळ एकदाच पात्र ठरलेले नाहीत. कमालीचे सातत्य ही त्यांची खासियत समजली जाते. आता गटात काय घडणार याचे संकेत भारतीय संघाच्या अमेरिका, मेक्‍सीको दौऱ्यात मिळतील. कोलंबियाचा सामना मेक्‍सीकोतील स्पर्धेत करायचा आहे. त्यांनी उरुग्वेला या स्पर्धेपासून वंचित ठेवले आहे, हे कसे विसरता येईल. दोन वेळचे विजेते, सहा वेळा उपांत्य फेरी ही कामगिरी करणारे घाना ताकदवान आहेतच. या परिस्थितीत भारताला आशा किती, या प्रश्नाचे उत्तर भारतीय मार्गदर्शक लुईस नॉर्टन डे माटोस हेच योग्य प्रकारे देऊ शकतात.

अमेरिका एकदाच या स्पर्धेस पात्र ठरले नाहीत. दक्षिण अमेरिकेतील युवा फुटबॉल खूप जवळून पाहिले आहे. कोलंबिया हा तेथीलच एक ताकदवान संघ आहे. घाना आफ्रिकेतील बलाढ्य आहेच. या गटाच्या स्पर्धेत अनुभव महत्त्वाचा असतो. हे खेळाडू १७ वर्षांखालील असतील; पण त्यांना १० वर्षांचा खेळाचा अनुभव आहे. हा अनुभव मी पाच सहा महिन्यांत कसा देणार? हे खरे असले तरी फुटबॉलमध्ये काहीही अशक्‍य नाही. आम्ही लढणार आहोत. आगामी ९० दिवसांत तीनही संघांचा नीट अभ्यास करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. हा आशावाद चांगला; पण खरं काय आहे ते सांगण्यास सगळे पुरेसे आहे. 

विश्वकरंडक स्पर्धेत यजमानांची कामगिरी उंचावते. दक्षिण कोरियाने तर थेट उपांत्य फेरी गाठली होती. हा चमत्कार घडला तरी फार तर बाद फेरीतील प्रवेश हेच भारतासाठी जेतेपद असेल. भारतीय फुटबॉलसाठी स्पर्धा कामगिरी नव्हे, तर स्पर्धा वातावरण जास्त मोलाचे असेल. विश्वकरंडक स्पर्धेच्या ड्रॉच्या वेळी हेच दिसले. अमेरिका फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष; तसेच फिफा परिषद सदस्य सुनील गुलाटी यांनी ही स्पर्धा भारताच्या कुमार खेळाडूंसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे. विश्वकरंडक १७ वर्षांखालील स्पर्धा ही खेळाडूंना स्टार करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात स्टार येथे दिसतात. भारतातील स्पर्धेबाबत थोडेसे वेगळे आहे. ही स्पर्धा भारतात फुटबॉलला आघाडीचा खेळ करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारतास स्पर्धा यजमानपद मिळाल्यापासून येथे वाढत असलेली फुटबॉलबाबतचे औत्सुक्‍य मोलाचे आहे. 

स्पर्धेची खरी नस जाणल्यामुळे कदाचित गुलाटी यांची भारत-अमेरिका लढतीची इच्छाही पूर्ण झाली. आता देशातील सच्चा फुटबॉल रसिकासही भारत विजेतेपदाच्या शर्यतीच्या जवळपास नसल्याची जाणीव आहे. गटातून पार झालो तरी डोक्‍यावरून पाणी अशीच भावना आहे. त्यात चुकीचे काहीही नाही. भारताच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी सर्वांत दुबळा संघ अमेरिका दिसतो; पण त्यांनीही दोन वर्षांपूर्वी भारताची ४-० धुलाई केली आहे. 

भारताची पूर्वतयारीही मैदानापेक्षा मैदानाबाहेरही जास्त चर्चेत राहिली. काही महिन्यांपूर्वी खेळाडूंनी तत्कालीन मार्गदर्शक निकोलाय ॲडम यांच्याविरुद्ध बंड केले होते. त्याची परिणती त्यांना हटवण्यात झाली. ऑक्‍टोबरमधील स्पर्धेसाठीचे मार्गदर्शक मार्चमध्ये आले. अर्थात, मॅटोस आल्यापासून परिस्थिती नक्कीच बदलली आहे. ॲडम यांच्या कालावधीत ३१ सामन्यांत पाच विजय आणि सात बरोबरी हीच कामगिरी होती. त्या तुलनेत कामगिरी सुधारली आहे. त्यात इटलीच्या राष्ट्रीय संघाविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे. अर्थात, मार्गदर्शकांनी बाद फेरीतील प्रवेश हेच लक्ष्य ठेवले आहे. तीन महिन्यांच्या पूर्वतयारीत मेक्‍सीकोतील स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

कोणत्याही स्पर्धेतील सामना आणि आंतरराष्ट्रीय लढत यात खूपच फरक असतो. आंतरराष्ट्रीय लढतीत किंवा सराव सामन्यात कितीही चांगला खेळ केला, तर शून्य गुणच मिळतात; पण तीन गुणांची चुरस असली की सामन्याचे स्वरूप बदलते. भारतीय फुटबॉल संघास नेमकी याचीच सवय नाही. आता विश्वकरंडक १७ वर्षांखालील स्पर्धेच्या निमित्ताने या तीन गुणांचे महत्त्व भारतीयांना कळेल. हे जेवढे कळत जाईल, तेवढी आपली प्रगती होईल. त्या वेळी आपण केवळ यजमान म्हणून स्पर्धेस पात्र ठरणार नाही, तर पात्रता स्पर्धा जिंकूनच आपण पात्र ठरू, असे मार्गदर्शक मॅटोस सांगत होते. 

विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच भारतीय फुटबॉल संघाच्या कामगिरीची मोठ्या प्रमाणावर चीरफाड होईल. प्रथमच भारतीय फुटबॉलने काय साध्य केले आहे, याकडे जगाची नजर असेल. 

यजमान असल्यामुळेच भारत पात्र ठरला असल्याची जागतिक फुटबॉलमध्ये भावना आहे. भारतीय संघावर जिंकण्याचेच दडपण नसेल, असे सध्या तरी चित्र आहे.

मैदानातील कामगिरीच नव्हे तर या स्पर्धेस भारतीयांचा लाभणारा प्रतिसाद, फुटबॉलची लोकप्रियता याचीही कसोटी लागणार आहे. हाच संघ भविष्यात भारताच्या विश्वकरंडक पात्रतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार का? याचीही चर्चा या निमित्ताने होईल. त्या वेळी असलेले भारताचे जागतिक क्रमवारीतील स्थानही महत्त्वाचे असेल. मैदानावरील गोलपेक्षा हा गोल साध्य होतो का? हे भारतीय फुटबॉलसाठी जास्त महत्त्वाचे ठरेल.

नवी मुंबईत न्यू मॅजिक
स्पर्धा कार्यक्रम ठरण्यापूर्वी नवी मुंबई अंतिम लढतीच्या संयोजनाच्या स्पर्धेत होते, ते हुकले. भारताच्या लढतींवर पाणी सोडावे लागले. त्यातही आता संघांवर नजर टाकली, तर तुलनेत कोणताही स्टार संघ दिसत नाही. प्रत्यक्षात गटातील चित्र सतत बदलण्याची परिस्थिती येथे असेल. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकन गटात तिसरा आलेला संघ; पण विश्वकरंडकावर नजर टाकली, तर मुख्य स्पर्धेत कायम प्रभाव टाकल्याचे दिसेल. गटातील सर्वांत ताकदवान संघ माली असल्याचे ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील; पण हा संघ दोन वर्षांपूर्वीचा उपविजेता आहे. यंदाचा आफ्रिकन विजेता आहे, हे लक्षात घ्यायला हवे. न्यूझीलंड अनेकांची डोकेदुखी ठरला आहे आणि या गटात युरोपातून आलेले तुर्की आहेत. त्यांनी फ्रान्सला मागे टाकत युरोपिय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. हंगेरीला हरवून ते स्पर्धेस पात्र ठरले आहेत. या गटात अखेरच्या लढतीपर्यंत काहीही सांगता येणार नाही.

गो गोवा गो जर्मनी
जागतिक विजेते, कॉन्फेडरेशन्स विजेते, जागतिक क्रमवारीत अव्वल याचे बक्षीस जर्मनीला सोपा गट देऊन दिले असावे. कोस्टा रिका, इराण किंवा गिनिया जर्मनीस हादरा देतील, असे वाटत नाही. या गटात उपविजेतेपदासाठी जास्त चुरस आहे. त्यात इराण सरस ठरू शकते. त्यांना गोव्यात २०१६ ची आशिया पात्रता स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. जर्मनीने १७ वर्षांखालील स्पर्धा कधीच जिंकलेली नाही. ३२ वर्षांपूर्वी चीनमध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत तत्कालीन पूर्व जर्मनीने अंतिम फेरी गाठली होती. विश्वकरंडक स्पर्धेत इतिहासात काय घडले हे महत्त्वाचे नसते. आता काय हेच सर्व काही ठरवते. याची प्रचितीही हा गट देईल, हे नक्की.

गटातील सर्वच संघ चांगले आहेत. आम्हाला एका चांगल्या मैदानावर खेळण्याची संधी लाभणार आहे. मालीमध्ये फुटबॉलची लोकप्रियता खूपच वाढत आहे. केवळ लोकप्रियताच नव्हे तर व्यावसायिकताही वाढत आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी झाली तर खेळातील पैसा, प्रसिद्धी नक्कीच वाढेल. तोच आमचा प्रयत्न आहे. स्पर्धेतील कामगिरीबाबत आत्ताच काहीही बोलणे अयोग्य होईल. सुरुवातीस गट पार करणे महत्त्वाचे आहे. 
- योनास कॉमला, माली मार्गदर्शक

गटातील लढतीही रंगतदार असतील. या संघाबाबत आम्हाला फारसे माहिती नाही. आता त्यांच्या लढतीचा अभ्यास करणार आहोत. भारतात सध्या तरी खूपच उष्ण आणि दमट हवामान आहे. त्याच्याशी जुळवून घेणेही महत्त्वाचे असेल. अर्थात, या सुंदर देशात खेळण्यास आम्ही खूपच उत्सुक आहोत. हा आमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय अनुभव असेल. आमच्या संघात चांगले गुणवान खेळाडू आहेत. प्रभावी आक्रमण करू शकतो, त्यामुळे आम्हाला जेतेपदाची चांगली संधी आहे; पण या स्पर्धेत केवळ आम्हीच नाही, याची जाणीवही आहे.
- ख्रिस्तियन वुक, जर्मनी मार्गदर्शक

विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात आले, याचा आनंद अजूनही कायम आहे. स्पर्धेच्या ड्रॉमधील आमचे नाव ऐकूनही आनंद होत होता. आता या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २० वर्षांखालील स्पर्धेत वानुआताने मेक्‍सीको, जर्मनी, व्हेनेझुएलास झुंजवले होते. तोही आमच्यासारखाच छोटासा देश आहे. ते करू शकतात, मग आम्हीही करू शकतो. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचा अनुभवच खूप काही शिकवणारा असेल. हेच १७ वर्षांखालील खेळाडू काही वर्षांनी २० वर्षांखालील संघात असतील; मग वरिष्ठ संघात. ते सतत विश्वकरंडक स्पर्धेत असतील, अशीच माझी अपेक्षा आहे. 
- मायकेल क्‍लार्क्वे (Clarque), न्यू कॅलेडोनियाचे मार्गदर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football