भारतीयांनी सामना गमावला; पण मने जिंकली

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोलंबियाविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर पुढच्याच मिनिटाला गोलमुळे धक्का
 

नवी दिल्ली : यजमान म्हणून पदार्पण केलेल्या भारतीय संघाने 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत दुसरा सामनाही गमावला; पण या वेळीही मने जिंकणारा खेळ केला. कोलंबियाकडून भारताचा 1-2 असा पराभव झाला. जुआन पेनॅलोझा याने 49व्या मिनिटाला कोलंबियाचे खाते उघडले. त्यानंतर 82व्या मिनिटाला जेक्‍सन थौनाओजाम याने भारताला बरोबरी साधून दिली होती, पण पुढच्याच मिनिटाला पेनॅलोझा याने गोल केला. हा गोल निर्णायक ठरला.

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघाने हा सामना जिंकला असला तरी भारतासाठी सुद्धा ऐतिहासिक नोंद झाली. जेक्‍सन हा फिफा अंतिम किंवा मुख्य स्पर्धेत गोल करणारा भारताचा पहिलावहिला फुटबॉलपटू ठरला.
पूर्वार्धात भारतीयांनी जोरदार झुंज दिली. भारताने काही चाली रचून प्रयत्न सुद्धा केले. अभिजित सरकार याने जवळून मारलेला फटका कोलंबियाचा गोलरक्षक केव्हीन मिएर याने अडविला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत राहुल कन्नोली याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला.

भारताचा गोलरक्षक धीरज मोईरंगथेम याने प्रभावी खेळ कायम ठेवला. त्याने अनेक फटके अडविले. पूर्वार्ध गोलशन्यू बरोबरीत सोडवून भारताने आशा उंचावल्या होत्या, पण पेनॅलोझा याने उत्तरार्धात चौथ्याच मिनिटाला चित्र बदलले. डाव्या बाजूने पास मिळताच त्याने यशस्वी घोडदौड केली.
भारताचा गोल कॉर्नरवर झाला. मार्कर नसल्याचा फायदा उठवीत जेक्‍सन याने अचूक हेडिंग केले. हा गोल होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला, पण तो थांबण्याआधीच कोलंबियाने लक्ष्य साधले. गुस्तावो कार्वाजाय याच्याकडून पास मिळताच पेनॅलोझाने छातीवर चेंडूचे संतुलन साधत गोल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football under 17 india win minds