esakal | महिला फुटबॉल प्रशिक्षकपदी मेमॉल यांची निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

महिला फुटबॉल प्रशिक्षकपदी मेमॉल यांची निवड 

महिला फुटबॉल प्रशिक्षकपदी मेमॉल यांची निवड 

sakal_logo
By
पीटीआय

पणजी - भारताची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू, नंतर राष्ट्रीय ज्युनियर संघाच्या प्रशिक्षक या भूमिकेनंतर आता गोमंतकीय मेमॉल रॉकी यांनी राष्ट्रीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक हे आव्हान स्वीकारले आहे. साजिद दार यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचे ठरविल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने महिला प्रशिक्षकास प्राधान्य दिले. 

राष्ट्रीय महिला संघाच्या पहिल्या गोमंतकीय प्रशिक्षक हा मान मेमॉल यांना मिळाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा सीनियर महिला फुटबॉल संघ या महिन्यात मलेशियाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पहिला सामना २९, तर दुसरा सामना ३१ जुलैला कुआलालंपूर येथे खेळला जाईल. त्यानिमित्त मेमॉल यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य संघाचे सराव शिबिर रविवारपासून (ता. १६) दिल्लीत सुरू होईल. 

साजिद दार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एप्रिलमध्ये भारताचा सीनियर महिला फुटबॉल संघ एएफसी महिला आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. उत्तर कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताला उझबेकिस्तानकडून ७-१ असा मोठा पराभव पत्करावा लागला होता, शिवाय दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाकडूनही भारताला हार पत्करावी लागली होती. नंतरच्या लढतीत हाँगकाँगवर भारतीय महिलांनी दोन गोलांनी विजय प्राप्त केला होता. त्या स्पर्धेत मेमॉल राष्ट्रीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या. ‘फिफा’च्या ताज्या मानांकनात भारतीय महिला संघ सध्या साठाव्या स्थानी आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघ ५६व्या क्रमांकावर होता.

वास्को येथील मेमॉल या २०१२ पासून भारतीय फुटबॉलमध्ये प्रशिक्षक या नात्याने कार्यरत आहेत. त्यांनी १६ वर्षांखालील वयोगटापर्यंत राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन केलेले आहे. या वर्षी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती. महिलांच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील गुणवत्ता शोधण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. साजिद यांच्यानंतर राष्ट्रीय सीनियर संघाची जबाबदारी स्वीकारण्याविषयी विचारणा होताच मेमॉल यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरविले. ‘‘मी या जबाबदारीकडे आव्हान या नात्याने पाहत आहे. कारकिर्दीतील हा मोठा क्षण आहे,’’ असे  मेमॉल म्हणाल्या. 

भारतीय महिला संघ ‘सॅफ’ करंडक विजेता आहे. मलेशियाविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्यास भारताला महिला मानांकनात क्रमवारी उंचावणे शक्‍य होईल. मेमॉल यांनी सध्या मलेशियाविरुद्धच्या दोन्ही लढतींवर लक्ष केंद्रित केले आहे.