स्वीडनकडून कोरियाला पेनल्टी व्हीएआरनंतर पेनल्टीवर अँड्रीयसचा गोल निर्णायक 

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

स्वीडनने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुद्ध पेनल्टीवरील गोलच्या जोरावर बाजी मारली. स्वीडनला नवे तंत्रज्ञान कामी आले. व्हीएआरद्वारे मिळालेल्या पेनल्टीवर अँड्रीयस ग्रॅनक्वीस्ट याने गोल केला. 
 

निझ्नी नोवगोरोड - स्वीडनने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुद्ध पेनल्टीवरील गोलच्या जोरावर बाजी मारली. स्वीडनला नवे तंत्रज्ञान कामी आले. व्हीएआरद्वारे मिळालेल्या पेनल्टीवर अँड्रीयस ग्रॅनक्वीस्ट याने गोल केला. 

निझ्नी नोवगोरोड स्टेडियमवरील लढतीत कोरियाचा गोलरक्षक चो ह्यून-वू याने दोन वेळा नाट्यमय बचाव केला होता; पण पूर्वार्धात बदली खेळाडू किम मिन-वू याने व्हिक्‍टर क्‍लाएस्सॉन याला पेनल्टी क्षेत्रात पाडले. स्वीडनचे पेनल्टीचे जोरदार अपील पंच जोएल ऍग्युइलार यांनी सुरवातीला फेटाळून लावले; पण अखेरीस व्हीएआरचा इशारा केला. त्यावर अँड्रीयसने चो याचा बचाव भेदला. वास्तविक अँड्रीयस याला पेनल्टीसाठी पसंती देण्याचा प्रशिक्षक यान्ने अँडरसन यांचा निर्णय आश्‍चर्यकारक ठरला. अँड्रीयसने शांतचित्ताने फटका मारत नेटच्या खालच्या बाजूने चेंडू आत मारला. त्याचा हा सातवा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. 

यान्ने अँडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीडनने लढतीवर वर्चस्व राखले होते; पण कोरियाचा बचाव निर्णायकरित्या भेदण्यात त्यांना अपयश येत होते. कोरियाचा स्टार सॉन हेऊंग-मीन याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. टॉटनहॅम हॉट्‌स्परकडून प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या सॉनवर मदार होती. स्वीडनचा खेळाडू व्हिक्‍टर लिंडेलॉफ आदल्यादिवशी आजारी पडला; पण पॉंटूस यान्सन आणि बचाव फळीतील इतर सहकाऱ्यांना कोरियाकडून फारसा धोका निर्माण झाला नाही. दुसरीकडे स्वीडनने आक्रमक चाली रचल्या. मार्कस बर्ज याने ओला टोईव्होनन याच्या पासवर चेंडू मारला होता. चो याने आधी पायाने चेंडू थोपविला आणि मग हाताने व्यवस्थित अडविला. त्यानंतर त्याने बर्जचाच कॉर्नरवरील चेंडू अडविला. क्‍लाएस्सॉन याने हेडिंग केलेला चेंडू नेटवरून गेला. 

अंतिम टप्प्यात कोरियाच्या ह्‌वांत ही-चॅन याने दहा यार्डवरून मारलेला फटका स्वैर होता. त्याने सोपी संधी दवडणे कोरियासाठी निराशाजनक ठरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweden's Granqvist scores penalty after VAR review