स्वित्झर्लंडची तयारी पेनल्टी शूटआउट जिंकण्याची

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

रशियात आलेला स्वित्झर्लंडचा विश्‍वकरंडक फुटबॉल संघ हा गोल्डन जनरेशन असल्याचा दावा सातत्याने होत आहे. प्रभावी सांघिक कामगिरीच्या जोरावर कर्णधाराविना खेळण्याची तयारी होत आहे, पण त्याच वेळी पेनल्टी शूटआउटचीच प्रामुख्याने तयारी करून मैदानात उतरणारे स्वीडन त्यांची गणिते बिघडवण्यास तयार आहेत. 
 

सेंट पीटर्सबर्ग - रशियात आलेला स्वित्झर्लंडचा विश्‍वकरंडक फुटबॉल संघ हा गोल्डन जनरेशन असल्याचा दावा सातत्याने होत आहे. प्रभावी सांघिक कामगिरीच्या जोरावर कर्णधाराविना खेळण्याची तयारी होत आहे, पण त्याच वेळी पेनल्टी शूटआउटचीच प्रामुख्याने तयारी करून मैदानात उतरणारे स्वीडन त्यांची गणिते बिघडवण्यास तयार आहेत. 

कर्णधार स्टीफन लिश्‍तस्टेईनर आणि फॅबियन साचार यांच्या अनुपस्थितीत स्वित्झर्लंडचा बचाव काहीसा कमकुवत होण्याची शक्‍यता आहे. अर्थात, युरोपातील लीगचा दांडगा अनुभव असलेले स्विस खेळाडू कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास तयार आहेत. ब्राझीलला रोखलेल्या स्विसला कोणीही कमी लेखणार नाही, पण स्वीडनने जर्मनीस अखेरच्या मिनिटापर्यंत रोखले होते, हेही विसरून चालणार नाही. 

प्रतिस्पर्ध्याची आक्रमणे मैदानाच्या मध्यभागी रोखून वेगवान प्रतिआक्रमण करणे, हाच स्वीडनचा प्रयत्न असतो. दोन्ही बगलांतून वेगवान आक्रमणे करून स्विस बचाव भेदण्याचा ते प्रयत्न करतील. खरे तर दोन्ही संघांचा ताकदवान बचाव पाहता प्रतिस्पर्धी पेनल्टी शूटआउटचीच जास्त तयारी करीत आहेत. 

आमचा खेळ लोकांना आनंद देतो की नाही, याचा विचार कोण करतोय. आम्ही जे काही करतो ते सर्वोत्तम करतो. कौशल्याबाबत आमची फ्रान्स किंवा स्पेनबरोबर तुलनाच करू नका. फुटबॉलमधील यशाचा निर्णय टीका करीत नाही, हेही लक्षात ठेवा. - ऍल्बिन एकदॅल, स्वीडन मध्यरक्षक 

पहिले वर्ल्डकप, मग बाळाचे स्वागत 
स्वीडनचा कर्णधार आंद्रे ग्रॅंक्वीस्ट उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीची तयारी करीत आहे, पण त्याचे लक्ष मायदेशी असेल. या लढतीच्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म होणार आहे. ग्रॅंक्वीस्टने नुकताच रशियातील क्‍लबबरोबरील करार संपवून स्वीडनमधील क्‍लबबरोबर करार केला आहे. त्यामुळे त्याची पत्नी यापूर्वीच स्वीडनला गेली आहे. वर्ल्डकप लढत सोडून कसे जाणार. सध्या तरी घरून काही बातमी नाही. माझी पत्नी खूपच कणखर आहे. तिची काळजी घ्यायलाही खूप जण आहेत. माझ्यासाठी असलेले वर्ल्डकप लढतीचे महत्त्व ती जाणते, असे ग्रॅंक्वीस्टने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Switzerland ready to win a penalty shootout