सकारात्मक दृष्टिकोनाचे लक्ष्य - मातोस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 March 2017

भारताच्या 17 वर्षांखालील फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक आशावादी

भारताच्या 17 वर्षांखालील फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक आशावादी
पणजी - भारतीय फुटबॉलचा दर्जा फार मोठा नाही हे मान्य करत, आगामी 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघबांधणी करताना सकारात्मक दृष्टिकोनाचे लक्ष्य संघाचे नवे पोर्तुगीज प्रशिक्षक लुईस नॉर्टन द मातोस यांनी बाळगले आहे. सोमवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बाणावली येथे सराव सत्रानंतर संवाद साधला.

'भारतासाठी आगामी स्पर्धा हे मोठे आव्हान आहे. भविष्याचा विचार करता ही फार मोठी स्पर्धा आहे. माझ्या अनुभवाचा लाभ भारतीय खेळाडूंना व्हावा, हाच माझा उद्देश असेल,'' असे 63 वर्षीय मातोस यांनी सांगितले. 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतातील सहा शहरांत येत्या 6 ते 28 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

भारताचे अगोदरचे जर्मन प्रशिक्षक निकोलाय ऍडम यांच्याविरोधात संघातील सर्व 21 खेळाडूंनी मारहाण आणि शिविगाळ केल्याचा लेखी आरोप केल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ऍडम यांना राजीनामा देण्यास सांगत मातोस यांची नियुक्त केली. त्याविषयी पोर्तुगीज प्रशिक्षक म्हणाले, ""माझ्या कारकिर्दीतही अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. मीसुद्धा बळी ठरलेलो आहे; मात्र संघाला मार्गदर्शन करताना खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील सकारात्मक बाबींवर भर देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्यांच्यावर विश्‍वास दाखविणे महत्त्वाचे आहे.''

संघातील खेळाडू सराव शिबिरात मेहनत घेत आहेत, याकडे मातोस यांनी लक्ष वेधले. विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत खेळाडूंकडून आणखीनच प्रगती साध्य करण्याचे उद्दिष्ट राहील, असेही लिस्बन येथे जन्मलेल्या प्रशिक्षकाने सांगितले. संघ आणखी काही आठवडे गोव्यात सराव करेल, तसेच काही मैत्रीपूर्ण सामनेही खेळणार आहे. त्यानंतर परदेशात काही मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचे मातोस यांचे नियोजन आहे.

...तर अतिशयोक्ती ठरेल
'भारत फुटबॉल विश्‍वकरंडक जिंकेल, असा दावा मी केल्यास ती अतिशयोक्ती ठरेल. पोर्तुगाल क्रिकेट विश्‍वकरंडक जिंकेल, असं म्हणण्यासारखं ठरेल; पण भारतीय संघ चांगली प्रगती साधू शकतो,'' असे मातोस यांनी नमूद केले. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना भारतीय संघ चांगली छबी तयार करू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मातोस यांच्याविषयी...
लुईस नॉर्टन द मातोस हे 63 वर्षांचे असून, पोर्तुगालतर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेले आहेत. लिस्बन येथे जन्मलेले मातोस यांनी 1982 मध्ये पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांत पोर्तुगालचे प्रतिनिधित्व केले. या आघाडीपटूने एकमेव आंतरराष्ट्रीय गोल तत्कालीन पश्‍चिम जर्मनीविरुद्ध नोंदविला होता. 1989 पासून ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी ऍटलेटिको क्‍लब द पोर्तुगालला सर्वप्रथम मार्गदर्शन केले. एखाद्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एक मार्च रोजी त्यांना भारताच्या 17 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: target to positive focus