पाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे हरविले. 

मुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगची प्रतिक्रिया भारतासमोर असणाऱ्या आव्हानाची जाणीव करून देते. भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकीत सलग दुसरा विजय मिळविताना पाकला ३-१ असे हरविले. 

पाकिस्तानने मस्कतमधील या स्पर्धेत दोनशेवी लढत खेळत असल्याचा गोलरक्षक श्रीजेशचा आनंद मिनीटभरही टिकू दिला नाही; पण त्यानंतर भारताने हुकमत राखली. कर्णधार मनप्रीत सिंगच्या अप्रतिम वैयक्तिक कौशल्याने भारताचा पहिला गोल केला. भारताने गेल्या काही सामन्यांत प्रसंगी एकतर्फी वर्चस्व राखले आहे. त्याचबरोबर संघात जास्त नवोदित आहेत, त्यामुळे पाकिस्तान जरा जास्तच सावध होते. 

पहिल्या मिनिटाच्या गोलच्या आघाडीनंतरही पाकने क्वचितच आक्रमकता दाखवली. भारतीयांनी पाकची मदार असलेल्या मधल्या फळीवर एकतर्फी हुकमत राखली आणि सामन्यात बहुतेक वेळा वन-वे ट्रॅफिकच झाला; मात्र भारतीय आक्रमक चेंडू ताब्यात असताना जास्त वेळ विचार करीत होते, हे भारतीय मार्गदर्शकांना खटकत होते. पिछाडीनंतर जिंकल्याचे समाधान आहे; पण फिनिशिंगमध्ये आम्ही कमी पडत आहोत. गोलच्या चांगल्या संधी दवडल्या. त्याकडे आम्हाला तातडीने लक्ष द्यावे लागणार आहे, असे मार्गदर्शक हरेंदर यांनी सांगितले. 

पाकने ३५ व्या सेकंदास गोल केल्यावर भारतास गोलसाठी २४ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली; पण मनदीप सिंग (३१) आणि दिलप्रीत सिंग (४२) यांनी गोल करीत भारताचा विजय सुकर केला.

या सामन्यातील अनेक त्रुटींवर मात करावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांना गोलच्या सोप्या संधी देत आहोत. आत्ताही पहिला गोल करण्याची पाकला संधी दिली.
- मनप्रीत सिंग, भारतीय कर्णधार

आम्ही खूपच बचावात्मक खेळत भारताला आक्रमणाची संधी दिली. उत्तरार्धात चांगले आक्रमण केले. आम्ही गोल करण्याच्या संधी दवडल्या.
- हसन सरदार, पाक मार्गदर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asia Champion Karandak Hockey Competition