"ही घटना अगदी काल घडल्यासारखी वाटते'

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सुवर्णकाळ अनुभवला होता हा इतिहास असला तरी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक भारताने 12 ऑगस्ट 1948च्या स्पर्धेत मिळविले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनदिनी देशाला सुवर्णभेट दिली यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्टच असू शकत नाही, अशा भावना त्या संघातील खेळाडू बलबीरसिंग यांनी व्यक्त केल्या. बलबीरसिंग आज 93 वर्षांचे आहेत. 

नवी दिल्ली- ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सुवर्णकाळ अनुभवला होता हा इतिहास असला तरी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक भारताने 12 ऑगस्ट 1948च्या स्पर्धेत मिळविले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनदिनी देशाला सुवर्णभेट दिली यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्टच असू शकत नाही, अशा भावना त्या संघातील खेळाडू बलबीरसिंग यांनी व्यक्त केल्या. बलबीरसिंग आज 93 वर्षांचे आहेत. 

ज्या ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला, त्याच ब्रिटिश संघावर 4-0 असा विजय मिळवून भारतीय हॉकी संघाने देशवासीयांना स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ऑलिंपिक सुवर्णपदकाची भेट दिली होती. भारताचे ऑलिंपिकमधील हे हॉकीतील सलग चौथे सुवर्णपदक होते. याच स्पर्धेतून बलबीरसिंग यांनी ऑलिंपिक पदार्पण केले होते. भारताच्या चार गोलांत बलबीर यांनी दोन गोल नोंदवून विजयात मोठा वाटा उचलला होता. या आठवणींना उजाळा देताना बलबीरसिंग म्हणाले, ""ऑलिंपिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकत होता. माझी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. आज या घटनेला 70 वर्षे झाली असली तरी, आजही मला ही घटना काल घडली असेच वाटत आहे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. "हमारा झंडा, हमारा देश' हे त्यांचे शब्द मला जेव्हा विजयमंचावरून भारतीय ध्वज फडकावला जात होता तेव्हा मनात घोळत होते.'' 

बलबीरसिंग यांनी यानंतर 1952 आणि 1956च्या ऑलिंपिक स्पर्धेतही भारताच्या सुवर्ण वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली. बलबीर 1956 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारदेखील होते. मात्र, आजही बलबीर यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनादिनी मिळविलेले सुवर्णपदकच खास वाटते. 

"गोल्ड' आठवणींना असा ही उजाळा 
स्वातंत्र्यानंतर भारतीय हॉकी संघाने मिळविलेल्या या पहिल्या ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या आठवणींना उजाळा बॉलिवूडने देण्याचा प्रयत्न केला आहे. या 1948च्या स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर "गोल्ड' हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार आहे. भारतीय हॉकी संघाच्या या स्पर्धेतील प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balbir Singh speaks about 1948 hocky gold medal