आता लक्ष्य जागतिक पातळीवर : ओल्तमन्स 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

हे प्रमुख विजेतेपद असले, तरी आम्हाला आणखी पुढे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे आहे

कुंतान (मलेशिया) : आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारताने विजेतेपदाला गवसणी घातली आणि तमाम भारतीयांना दिवाळीची अमूल्य भेट दिली. या विजेतेपदानंतर प्रशिक्षक रोलॅंड ओल्तमन्स यांनी आता जागतिक पातळीवरील स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. 

ओल्तमन्स यांनी भारतीय हॉकीपटूंचे तोंडभरून कौतुक केले. ''प्रशिक्षक म्हणून मी भारत-पाकिस्तान यांच्यातील 20 लढतींचा साक्षीदार असून त्यातील उत्कंठा जवळून अनुभवली आहे. जिंकण्याशिवाय येथे भारतीय खेळाडूंना पर्याय नव्हता. भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार असल्याने आम्ही इतर संघांच्या रडारवर होतो. अंतिम सामन्यात आघाडी घेतल्यानंतर पाकिस्तानला दोन गोल करण्याची संधी दिली. त्यामुळे दबाव वाढला होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात भारतीय खेळाडूंनी दाखवलेली मानसिक कणखरता कौतुकास्पद होती आणि याचा मला अभिमान आहे'', अशा शब्दांत रोल्तमन्स यांनी खेळाडूंचे कौतुक केले. हे प्रमुख विजेतेपद असले, तरी आम्हाला आणखी पुढे जाऊन जागतिक पातळीवरील स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे आहे, असेही ते म्हणाले. 

अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविणारा सरदार सिंग म्हणाला, ''दीर्घ काळानंतर भारतीय संघाने असा दमदार खेळ केला. विजेतेपदाचा करंडक भारतीय संघाकडून देशवासींसाठी दिवाळीची भेट आहे. दोन वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचाच पराभव करून भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे विजेतेपद मिळविण्याचा दबाव आमच्यावरच होता.''

भारतीय कर्णधार व गोलरक्षक पी. श्रीजेश म्हणाला, ''भारत-पाकिस्तान लढत नेहमीच स्पेशल असते. त्यामुळे विजेतेपद मिळविल्यानंतर राखीव खेळाडूंची भावना काय असेल याची मला कल्पना आहे. त्यामुळे हा विजय विशेष आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India eyes World Hockey title now, says Hockey Coach