अझलन करंडक हॉकी : भारताची आज ब्रिटनशी सलामी 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. आशियामध्ये हा सर्वोत्तम क्रमांक आहे. या तुलनेत दक्षिण कोरियाची 12व्या, पाकिस्तानची 13व्या, तर मलेशियाची 14व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. कर्णधार पी. आर. श्रीजेश आणि प्रशिक्षक ऑल्टमन्स यांनी नव्या गोष्टींवर भर दिला आहे.

इपोह (मलेशिया) : अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ होत आहे. भारतासमोर सलामीला ब्रिटनचे आव्हान असेल. अलीकडच्या स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय संघाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. 

भारतीय खेळाडूंनी शैलीदार खेळ करतानाच कामगिरीत प्रगती केली असली तरी विजेतेपदांच्या खात्यात अपेक्षित भर पडलेली नाही. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक रोलॅंट ऑल्टमन्स यांनी झुंजार खेळ करून हरण्यापेक्षा जिंकणे महत्त्वाचे असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. 

भारताशिवाय यजमान मलेशियासह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि जपान अशा सहा संघांचा सहभाग आहे. मागील स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने हरविले होते. या अपयशाची भरपाई करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. 

नवोदितांकडे लक्ष 
नव्या मोसमातील ही पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे भारताने नवोदितांना संधी देतानाच नवे डावपेचही आखले आहेत. फॉर्म, अनुभव आणि डावपेचांची अंमलबजावणी यानुसार संघ किती मजल मारेल हे ठरेल. ही 26वी स्पर्धा आहे. नवोदितांना संधी देण्याचे व्यासपीठ यादृष्टीने या स्पर्धेकडे पाहिले जाते.

गेल्या सात वर्षांत भारताला विजेतेपदाचा करंडक उंचावता आलेला नाही. अर्थात या कालावधीत लंडन ऑलिंपिकमधील अखेरच्या क्रमांकापासून इंचॉन हॉकी स्पर्धेतील सुवर्ण आणि गेल्या वर्षी मिळविलेले ज्युनियर जगज्जेतेपद असे टप्पे भारतीय हॉकीने पार केले. 

आशियात अव्वल 
भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. आशियामध्ये हा सर्वोत्तम क्रमांक आहे. या तुलनेत दक्षिण कोरियाची 12व्या, पाकिस्तानची 13व्या, तर मलेशियाची 14व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. कर्णधार पी. आर. श्रीजेश आणि प्रशिक्षक ऑल्टमन्स यांनी नव्या गोष्टींवर भर दिला आहे. 

जुगराजचे मार्गदर्शन 
पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघाला अनेकदा अपयश आले आहे. त्यावर मात करण्यासाठी माजी बचावपटू जुगराज सिंग याची ड्रॅगफ्लिक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल्टमन्स यांनी सांगितले, की आम्ही शिबिरात सराव केलेल्या तंत्राचा या स्पर्धेत अवलंब करू. कागदावर आमचे डावपेच चांगले वाटतात; पण प्रत्यक्ष मैदानावर त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

ड्रॅग-फ्लिक्‍स शिकविण्याशिवाय जुगराजला विशिष्ट सूचना दिल्या आहेत. बचावाच्या रचनेमध्येसुद्धा जुगराज खेळाडूंना मदत करीत आहे. भारतीय शैलीत प्रामुख्याने बचावावर भर दिला जातो. त्यात थोडा बदल अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India to face Briton in Azlan Shah hockey opening game