आमच्या जवानांसाठी पाकिस्तानला हरवूच: हॉकी संघ

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

पुढील महिन्यात 20 ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. यात साखळी फेरीत 23 ऑक्‍टोबर रोजी भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. 

बंगळूर : ‘हॉकीमध्ये पाकिस्तानला पराभूत करून उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊ‘ असा निर्धार भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आज (बुधवार) व्यक्त केला. पुढील महिन्यात मलेशियामध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा होणार आहे. यात 23 ऑक्‍टोबर रोजी भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. 

श्रीजेशने थेट उरी हल्ल्याचा उल्लेख केला नाही; मात्र ‘पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारून आम्ही आमच्या जवानांना निराश करणार नाही‘ असे उद्गार काढले. उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान हुतात्मा झाले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताने आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. 

या सामन्याविषयी श्रीजेश म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान सामन्याविषयी दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. या सामन्यात आम्ही शंभर टक्‍क्‍यांहून अधिक योगदान देऊ. सीमेपलीकडून होत असलेल्या गोळीबारात आमचे जवान हुतात्मा होत आहेत. पाकिस्तानविरुद्ध पराभूत होऊन आम्ही आमच्या जवानांना निराश करणार नाही. पाकिस्तानच्या खेळाचा दर्जा सध्या खूपच खालावलेला आहे. पण त्यांची मानसिकता भक्कम आहे. ते कधीही, कुठल्याही संघावर मात करू शकतात. हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या तुलनेत भारताची तयारी खूपच चांगली आहे. आम्ही सातत्याने जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळत आहोत. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघाला ऑलिंपिकसाठी पात्रही ठरता आले नव्हते.‘‘

Web Title: India to face Pakistan on 23rd October in Asian Champions trophy hockey