भारताची उपांत्य फेरीत धडक

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

लखनौ - अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत तर जिंकता येते, हेच भारतीय कुमार हॉकी संघाने दाखवून दिले. पंचावन्न मिनिटांपर्यंत मागे असलेल्या भारतीय कुमारांनी त्यानंतर दहा मिनिटांत दोन गोल करीत स्पेनला पराजित केले आणि विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

लखनौ - अखेरपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत तर जिंकता येते, हेच भारतीय कुमार हॉकी संघाने दाखवून दिले. पंचावन्न मिनिटांपर्यंत मागे असलेल्या भारतीय कुमारांनी त्यानंतर दहा मिनिटांत दोन गोल करीत स्पेनला पराजित केले आणि विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

लखनौत सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरवातीस भारतीयांना काही जमत नव्हते. तीनही साखळी लढतीत गोलपोस्टच्या दिशेने किमान ११ शॉट्‌स मारणाऱ्या भारतीयांना या वेळी पाऊण तासात केवळ दोनच शॉट्‌स मारता आले होते. स्पेनचा भक्कम बचाव, त्यांचे मॅन टू मॅन मार्किंग भारताची डोकेदुखी ठरत होते. त्यातच सेरीहम्मा याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताची डोकेदुखी वाढवली होती. या लढतीचे संभाव्य विजेते भारतास समजले जात होते, त्याचे दडपणच जणू खेळावर येत होते. मात्र स्पेनने वर्चस्व गाजवल्यानंतरही प्रोत्साहित करणाऱ्या चाहत्यांनी भारतीयांचा जोश कायम ठेवला होता.

उत्तरार्धात सुरवातीस स्पेनने वर्चस्व राखल्यानंतर भारतीयांनी केलेला प्रतिकार जबरदस्त होता. सिमरनजित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर चेंडू हुशारीने टॅप करीत भारतास बरोबरी साधून दिली, तर हरमनप्रीत सिंगने भारताचा आठवा पेनल्टी कॉर्नर ६६ व्या मिनिटास सत्कारणी लावला. या दोन गोलनी पूर्वार्धातील सदोष, तसेच निष्प्रभ खेळाची भरपाई केली.  

तत्पूर्वी, अन्य उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमने अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटवर ४-१ असे हरवले. या लढतीत निर्धारित वेळेनंतर १-१ बरोबरी होती. जर्मनीने इंग्लंडचे आव्हान ४-२ असे परतवले, तर ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्‌सचा २-१ असा पाडाव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Hockey Federation