इंग्लंडविरुद्ध काय साधले, ते पाहा ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली. 

लंडन / मुंबई-  भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली. 

विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला रोखेल, अशी कट्टर चाहत्यांनाही अपेक्षा नव्हती. प्रत्यक्षात साडेसात मिनिटे असताना भारतीय बचावपटूंकडून सामन्यातील एकमेव चूक झाली. त्यामुळे इंग्लंडला बरोबरी साधता आली. आपल्याकडून झालेली ही चूक त्यांना खूपच सलत होती. त्यांना अश्रूही आवरत नव्हते. इंग्लंडच्या आक्रमणास प्रतिआक्रमणाने उत्तर देत भारतीय संघाने सर्वांनाच धक्का दिला. 

आमचा खेळ चांगला झाला. इंग्लंड ऑलिंपिक विजेते आहेत. दोन्ही संघाच्या जागतिक मानांकनातील तफावत लढतीत कुठेच दिसली नाही. सलामीच्या लढतीतील खेळाने मला संघाचा अभिमानच वाटला. आता भारतीय पाठीराखे, टीकाकार, तज्ज्ञ यांनाही चांगल्या गोष्टी दिसल्या असतील आणि त्यानंतर ते सल्ला देतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाने ऑलिंपिक विजेत्यांना रोखले. त्यांचा खेळ विजयास साजेसाच होता. एक चूक झाली नसती, तर सुखद धक्का लाभला असता, असेही त्यांनी सांगितले. 

भारतीयांनी नकारात्मक खेळ केला, असे इंग्लंडचे मार्गदर्शक डॅनी केरी यांनी सांगितले. प्रत्यक्षात ते भारतीयांनी धक्का दिल्याचेच मान्य करीत होते. ते म्हणाले, आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही कधीही हार मानत नाही. बरोबरी निराशा करणारीच आहे; पण उत्तरार्धात आम्ही खेळ खूपच उंचावला. त्या वेळी आम्ही एकतर्फी वर्चस्व राखले, त्यामुळे चाहत्यांचेही प्रोत्साहन लाभले. एकंदरीत लढत, आमचा खेळ पाहता मी समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Indian hocky guide Shuard Marin attacked the critics