हॉकी खेळाडूंची निवड "आयओए' नाकारणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. हॉकी खेळाडूंची निवड "खेलो इंडिया' गुणवत्ता प्रसार कार्यक्रमांतर्गत होणार असेल, तर त्याला आमची मान्यता नसेल, असे "आयओए' अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सोमवारी सांगितले. 
 

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. हॉकी खेळाडूंची निवड "खेलो इंडिया' गुणवत्ता प्रसार कार्यक्रमांतर्गत होणार असेल, तर त्याला आमची मान्यता नसेल, असे "आयओए' अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सोमवारी सांगितले. 

राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा खेळाडू निवडीत सहभाग नसेल, तर आम्ही त्याला मान्यता देणार नाही, अशी भूमिका "आयओए'ने घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाने "खेलो इंडिया'अंतर्गत करण्यात आलेल्या गुणवत्ता शोध मोहिमेतून प्रत्येकी 50 मुले आणि मुलींच्या नावाची यादी 25 जून रोजी "आयओए'कडे मान्यतेसाठी दिली होती. यावर उत्तर देताना बात्रा म्हणाले, ""या खेळाडूंच्या निवडीत राष्ट्रीय संघटनेच्या निवड समिती किंवा क्रीडा प्राधिकरणाचा सहभाग आहे किंवा नाही हे समजल्याशिवाय आम्ही या यादीस मान्यता देणार नाही.'' 

काही महिन्यांपूर्वी बात्रा यांनी सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना "खेलो इंडिया'शी नाते तोडण्यास सांगितले होते. त्यांच्याशी नाते जोडणे म्हणजे क्रीडा महासंघाच्या स्वायत्ततेवर घाला असल्यासारखे आहे, असे बात्रा यांचे म्हणणे होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IOA Chief Disapproves of Khelo India Selecting Hockey Players