रुपिंदरपच्या गोलने भारताचा विजय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेस विजयी सुरवात केली. क्रीडा प्राधिकरण केंद्रावर गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 4-2 असा पराभव केला. 
 

बंगळूर - भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेस विजयी सुरवात केली. क्रीडा प्राधिकरण केंद्रावर गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 4-2 असा पराभव केला. 

भारताकडून रुपिंदर पाल सिंग याने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मनदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी अन्य गोल केले. न्यूझीलंडचे दोन्ही गोल स्टिफन जेन्नेस याने केले. 

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या रुपिंदरने भारताला धडाक्‍यात सुरवात करून दिली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला मिळालेला पहिला कॉर्नर त्याने सत्कारणी लावला. न्यूझीलंडला सातव्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र, भारताचा गोलरक्षक क्रिशन पाठक याने सुरेख बचाव करत त्यांचा प्रयत्न फोल ठरवला. 

त्यानंतर मनप्रीतकडून आलेल्या क्रॉस पासवर मनदीपने चेंडूला अचूक दिशा देत 15व्या मिनिटाला भारताची आघाडी वढवली. पूर्वार्धातील दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने आपला बचाव भक्कम राखला. त्यामुळे भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावण्यात अपयश आले. न्यूझीलंडने 26व्या मिनिटास आपले खाते उघडले. तेव्हा स्टिफन जेन्नेसने मैदानी गोल केला. 

उत्तरार्धात भारतीय आक्रमणे पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या बचावाची कसोटी पाहणारी ठरली. सुनीलने मिळविलेल्या तिसऱ्या कॉर्नरवर रुपिंदरने भारताची आघाडी वाढवली. सुनीलने पुन्हा एकदा कॉर्नर मिळवत भारताला संधी मिळवून दिली. या वेळी हरमनप्रीतने संधी साधत भारताची आघाडी भक्कम केली. भारताने उत्तरार्धात सूरज करकेरा याला गोलरक्षक म्हणून संधी दिली. न्यूझीलंडच्या जेन्नसनेच त्याला चकवले. पण, अखेरच्या सत्रात करकेरा याने न्यूझीलंडची आक्रमणे फोल ठरवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupinder Pal Singh scores a brace as India outplay New Zealand in hockey series