हॉकी : आघाडी घेऊनही भारत बेल्जियमकडून पराभूत

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

निकाल
भारत : 1 (हर्मनप्रीत सिंग 38वा मिनीट) पराभूत वि. बेल्जियम : 2 (सेड्रीक चार्लीयर 52, टीम बून 55)

डसेलडॉल्फ (जर्मनी) : भारताला तिरंगी आमंत्रित हॉकी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बेल्जियमने 2-1 असे पराभूत केले. आघाडी घेतल्यानंतरही भारताला पराभूत व्हावे लागले.

तिसऱ्या सत्रात हर्मनप्रीत सिंग याने भारताचे खाते उघडले होते, पण चौथ्या सत्रात बेल्जियमने तीन मिनिटांत दोन गोलचा धडाका लावला. सेड्रीक चार्लीएर याने बरोबरी साधून दिली. त्यानंतर टीम बून याने केलेला गोल निर्णायक ठरला. बेल्जियमने पहिल्या सामन्यात जर्मनीवर 5-2 अशी मात केली होती. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले होते. यानंतरही भारतीय बचाव फळीने सुरवातीला त्यांना रोखले होते.

रुपींदरपाल सिंग, हर्मनप्रीत सिंग आणि सुरेंद्र कुमार यांनी बचाव कडेकोट ठेवला. पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी होती. 19व्या मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. ड्रॅगफ्लिकर हर्मनप्रीत याने त्यावर चांगला आणि ताकदवान फटका मारला, पण चेंडू बेल्जियमच्या खेळाडूच्या स्टीकला लागला. दुखापतीतून सावरलेला फॉरवर्ड रमणदीप सिंग याच्यामुळे दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याने तांत्रिक कौशल्य दाखवीत ड्रीबलिंग केले, पण चेंडू वर्तुळात बेल्जियमच्या बचाव फळीतील खेळाडूच्या पायाला लागला होता. बेल्जियमचा गोलरक्षक जेरेमी ग्युसासॉफ याने अचूक अंदाज घेत हर्मनप्रीतचा फटका रोखला.

मध्यंतराच्या दहा मिनिटांत मुख्य प्रशिक्षक रोलॅंट ऑल्टमन्स यांनी डावपेचांचा आढावा घेतला. तिसऱ्या सत्रात भारताच्या आक्रमणात धार आली. काही मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीही हर्मनप्रीतचा ताकदवान फटका बेल्जियमच्या बचावपटूंनी अडविला. रिबाउंडवर त्याने चपळाई दाखविली आणि रिव्हर्स हीट मारली, पण चेंडू 'क्रॉसबार'ला लागला. इतके प्रयत्न वाया गेल्यानंतरही हर्मनप्रीतचे मनोधैर्य खचले नाही. त्याने पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर लक्ष्य साधले.

चौथ्या सत्रात जोरदार खेळ झाला. भारताने बेल्जियमचा पहिला पेनल्टी कॉर्नर यशस्वी ठरू दिला नाही. त्यानंतर मात्र चार्लीयरने मैदानी गोल केला. सुरींदरने त्यानंतर दोन पेनल्टी कॉर्नरवर अचूक बचाव केला होता, पण बेल्जियमने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. तो बूनने सत्कारणी लावला. बचाव फळीतील सुरिंदर कुमार याच्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा त्याचा 50वा सामना होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports news hockey news Team India India versus Belgium