हॉकीतील ब्राँझनंतरही प्रश्‍न कायम

हॉकीतील ब्राँझनंतरही प्रश्‍न कायम

दोन वर्षांपूर्वीच्या रायपूर स्पर्धेत भारताने नेदरलॅंडस्‌ला हरवून जागतिक स्तरावरील स्पर्धेत ३३ वर्षांनंतर ब्राँझ जिंकले होते. त्या वेळी चाहते बेभान झाले होते. खेळाडू जल्लोष करीत होते. त्यांचा आवाज बसला. पार्टी रात्रभर सुरू होती. आता दोन वर्षांनी कटकलाही ब्राँझ जिंकल्यावर काही मिनिटांचाही जल्लोष झाला नाही. काही खेळाडूंनीच चाहत्यांचे आभार मानण्याची औपचारिकता पार पाडली. भारतीयही हे यश नव्हे तर एकप्रकारचे अपयश आहे हे जाणून होते. भारताने जर्मनीला हरवले हे खरे; पण त्यांच्याकडे राखीव खेळाडू नव्हते. भारताचे १६ विरुद्ध जर्मनीचे ११ खेळाडू अशी ही लढत झाली. त्यातही ते राखीव खेळाडू होते. राखीव गोलरक्षकास आक्रमक म्हणून खेळवण्याची त्यांच्यावर वेळ आली तरीही ते लढले. भारतास हरवणाऱ्या पाकिस्तानचे चांगल्या खेळाबद्दल २०१४ मध्ये कौतुक केलेल्या भुवनेश्‍वरवर रसिकांनी जर्मनीचे जास्त कौतुक केले नसते तरच नवल होते. 

भारतीय हॉकीच्या कामगिरीचा आढावा घेताना २०१५ आणि २०१७ च्या ब्राँझपदकाच्या कामगिरीची तुलना महत्त्वाची आहे. भुवनेश्‍वर स्पर्धेत पदक मिळत असतानाच मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट दिसत होत्या. कामगिरीतील टोकाची तफावत अधोरेखित होत होती. गोल होण्याची दहा टक्के संधी होताना गोल थोडक्‍यात चुकत होते आणि गोलपोस्ट रिकामा दिसत असतानाही गोल चुकत होते.

भारताचे आक्रमक युवा आहेत आणि खेळही जरा जास्तच सदोष आहे. ते शिकत आहेत. हे आक्रमक युवा असले तरी अनुभवात कमी नाहीत. गुरजांत यास अपवाद असेल. आता मनदीप कुमार संघातून नुकताच आल्याचे दिसत असेल; पण विश्‍वकरंडक कुमार स्पर्धेसाठीच तो सुरुवातीस भारतीय शिबिरातून कुमार शिबिरात गेला होता. एस. व्ही. सुनीलला दोनशे, तर आकाशदीप सिंगला अडीचशे सामन्यांचा अनुभव आहे. तरीही गोलांचा दुष्काळच कायम राहिला. पेनल्टी कॉर्नरवरील अपयश लक्षणीय आहे. काही वर्षांपूर्वी संदीप सिंग आणि रघुनाथ असताना यशाची टक्केवारी पन्नास टक्के होती. आता पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी संघात जास्त पर्याय आहेत; पण गोल दुरावले आहेत.

केवळ कौशल्याचा नाही तर नेतृत्वाचाही प्रश्‍न गंभीर आहे. कुमार स्तरावर यशस्वी ठरलेला मनप्रीत सिंगचा प्रभाव पडला नाही. आशिया कप स्पर्धेतही तोच कर्णधार होता; पण सोबत सरदारचे साह्य होते. आता सरदार दूर गेल्यावर मनप्रीत फारसे काही करू शकला नाही. आता कदाचित याच दडपणाखाली हा गुणवान मध्यरक्षक बहरलाच नाही. श्रीजेश, सरदार आणि रमणदीप सिंग हे मोटिव्हेटर नसल्याचा संघास फटका बसला. कदाचित त्यामुळेच फाऊल ओढवून घेतले गेले. हरमनप्रीतने चेंडू बॅकलाईनच्या बाहेर मारत पेनल्टी कॉर्नर ओढवून घेतला आहे. पंचांनी शिट्टी वाजवल्यानंतरही हिट घेतल्याबद्दल मनदीपला सामन्यातून काही वेळ बाहेर काढण्यात आले, तर स्लाईड करीत अवैधरीत्या रोखल्याबद्दल मनप्रीत दहा मिनिटे बाहेर बसला. खेळाच्या ओघात झालेल्या या चुकांचा संघास फटका बसला. नियमांचा पूर्ण अभ्यास नसल्यामुळेच हे घडते. मुंबईचा सूरज करकेरा आणि आकाश चिकटे यांनी श्रीजेशची उणीव जाणवू दिली नाही हीच जमेची बाब म्हणता येईल; मात्र बचावपटू प्रतिस्पर्धी आक्रमकांपासून जास्त दूर असल्यामुळे गमावलेला चेंडूवर ताबा चटकन मिळवता येत नव्हता.

वन-टच हॉकी हा मरिन यांचा मंत्र; पण त्याचा अर्थ कायम आक्रमण नव्हे. अर्थात त्याचबरोबर अचूक पासही मोलाचे असतात. प्रतिआक्रमण महत्त्वाचे असते; पण त्यावरच भारतीय जास्त भर देत आहेत. आक्रमणासाठी प्रसंगी पुढाकार घेऊन धक्का देता येतो हेच विसरले जात आहे. भारतीय मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी खेळाडूंना व्यूहरचनेत जास्त महत्त्व दिले आहे. प्रत्यक्ष मैदानात त्यांनाच योजनेत बदल करावा लागतो. त्यामुळे त्यांनीच याबाबत विचार करावा, असेच मरीन यांचे मत आहे. आता काही महिन्यांपूर्वीच सूत्रे देण्यात आलेल्या मरीन यांनी माजी मार्गदर्शक रोएलॅंत ऑल्तमन्स यांच्या हाताखालीच आधुनिक हॉकी शिकलेल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणे एकप्रकारे स्वाभाविकच आहे. खेळातील उणिवांची जाणीव असल्यास त्यावर मात करणे सोपे होते; पण नेमके हेच सुरुवातीच्या लढतीनंतर दिसले नाही. आता गोलच्या संधी दवडल्या; पण सरस संघाविरुद्ध त्या सातत्याने निर्माण केल्या, असे सांगत मरीन खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावत आहेत; पण ते पुरेसे नाही. भारतीय खेळाडू युवा असल्यामुळे चुका होतात, हे कसे स्वीकारणार. बेल्जियम संघातील खेळाडू आणि भारतीय यांच्या वयात फारसा फरक नाही, तरीही बेल्जियम संघ जास्त परिपक्व दिसतो. हेच काही प्रमाणात जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाबाबत आहे.

मरीन खेळाडूंवर दाखवत असलेला विश्‍वास, त्यांच्या सांगत असलेल्या जमेच्या बाजू हाच ऑल्तमन्स आणि मरिन यांच्यातील फरक आहे. ऑल्तमन्स चुका जाहीरपणे सांगत होते. मरिन हे टाळत आहेत. मरिन यांची ही योजना कितपत यशस्वी ठरते, याचे खरे उत्तर आता आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळेल; पण तोपर्यंत तरी जागतिक हॉकी लीगमध्ये भारताची पाटी कोरी राहिली नाही याचेच समाधान मानावे लागेल.

तज्ज्ञ म्हणतात.... 
कोणता क्रमांक आला, त्यावरून विश्‍लेषण चुकीचे आहे. बेल्जियम पाचपैकी एकाच सामन्यात हरले तरी पाचवे आले, तर भारत निर्धारित वेळेत एकदाच जिंकला तरी ब्राँझ जिंकले. विश्‍वकरंडकाची तयारी होत असताना प्रगती किती झाली हे महत्त्वाचे. खेळात खूप सुधारणा होण्याची गरज आहे हेच अधोरेखित झाले. सातत्याचा अभाव ही चिंतेची बाब आहे.
- वीरेन रस्किन्हा

भारतीय हॉकीची नक्कीच प्रगती झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनीस आपण आव्हान देत आहोत. हिटिंग आणि स्टॉपिंगकडे लक्ष द्यायला हवे. योग्यवेळी पास करणेही आत्मसात करायला हवे.
- धनराज पिल्ले

मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावणे महत्त्वाचे असते. प्रत्येक सामना जिंकण्याचे लक्ष्य हवे. खेळातच नव्हे तर जागतिक स्तरावर पदक मिळवण्यात सातत्य हवे.
- जोकिम कार्व्हालो

मार्गदर्शक मरिन यांचे विश्‍लेषण 
संघाच्या कामगिरीबद्दल - पेनल्टी कॉर्नर
तसेच मैदान गोल वाढण्याची गरज. जास्तीत जास्त संधी साधण्याची गरज तसेच अधिक सातत्यपूर्ण खेळ हवा. खेळात खूपच चढ-उतार. अर्थात भारताचे मानांकन बघितल्यास ब्राँझपदक नक्कीच प्रगती
कामगिरीत सातत्याचा अभाव - प्रश्‍न हाच नव्हे तर क्षमतेनुसार खेळ होण्याची गरज. अर्थात क्षमता नसती तर प्रश्‍न जास्त गंभीर
साखळीत गटात तळाला - फारसा निराश नव्हतो. त्या वेळीही मी संघाला दहापैकी सात गुण दिले होते. सर्वांची कामगिरी चांगली झाली तर काहीही घडू शकते, हे बेल्जियमविरुद्ध दिसले. पाऊस नसता तर अर्जेंटिनाविरुद्धही दिसले असते
आघाडीवर असताना दिलेले गोल - ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे घडले; पण त्यांनी आपल्याविरुद्ध केवळ दहावेळाच गोलक्षेत्रात प्रवेश केला, तर अन्य संघांविरुद्ध किमान पंधरा वेळा
सातत्य नसल्याचे कारण - खेळाचा हा भाग, तसेच त्याची कारणेही अनेक. मैदानावरील आपले पहिले प्रतिस्पर्धी आपणच असतो. रॉजर फेडरर स्वत-वर जास्त विजय मिळवतो, म्हणूनच जास्त यशस्वी
प्रश्‍नावरील उपाय - खेळाडू प्रामुख्याने नवोदित. अनुभव आल्यावर यावर मात करण्यास सुरुवात होते. 
खेळाडूंच्या प्रतिसादाबद्दल - माझी मार्गदर्शनाची शैली त्यांना आवडत असणार. खेळाडूंना केंद्रित ठेवूनच सर्व काही ठरवतो. त्यांनाच निर्णयासाठी प्रेरित करणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे मोलाचे असते. कधीही त्यांनी माझ्याकडे यावे असे त्यांना सांगितले आहे. 
ब्राँझ ही सुरुवात - ब्राँझपदक जिंकताना सरस संघांना दिलेले आव्हान खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावत आहे. आपण कोणापेक्षा कमी नाही, तर त्यांच्या तोडीस तोड आहोत हेच दाखवले. आपण त्यांना हरवू शकतो हा विश्‍वास जास्त मोलाचा आहे. दोन स्पर्धांतील दोन पदकांपेक्षा खेळाडूंशी संवाद जुळणे महत्त्वाचे असते. 
नव्या वर्षातील लक्ष्य - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरी मोलाची असेल. त्याद्वारे त्याहून महत्त्वाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी होईल.

हे यश कसे
भारताने सहापैकी केवळ दोनच लढती जिंकल्या, तरीही ब्राँझ
बाद फेरीच्या तीनपैकी दोन लढती जिंकल्या हे पुरेसे कसे
भारताने स्पर्धेत आठच गोल केले. बेल्जियमच्या लॉईक लुईपार्फ याने एकट्याने एवढेच स्पर्धेत
भारतास २१ पेनल्टी कॉर्नर, त्यावर पाचच गोल
भारताचे पेनल्टी कॉर्नरवरील गोलाचे प्रमाण २३.८
जागतिक स्तरावर हॉकीत वर्चस्व राखणारे देशांचा स्ट्राईक रेट ३० ते ३५ टक्के असतो. हाच स्ट्राईक रेट ४० टक्के असला तरी चांगला समजला जातो. 
चेंडूवर ताबा राखला की भारत कोलमडतो हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडने दाखवले
जर्मनीविरुद्ध चेंडूवर ताबाही दुरापास्त झाला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com