महिला हॉकी संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली - महिला हॉकी वर्ल्ड लीगच्या दुसऱ्या फेरीसाठी "हॉकी इंडिया'ने 18 जणींचा संघ जाहीर केला. एक एप्रिलपासून कॅनडातील पश्‍चिम व्हॅंकुवरमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. मध्य फळीतील रितू राणीने सात महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन केले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये लग्नानंतर तिने निवृत्ती जाहीर केली होती; पण आता तिने पुन्हा खेळायचे ठरविले आहे. त्यासाठी संधी दिल्याबद्दल तिने महासंघ तसेच कुटुंबीयांचे आभार मानले. "महिला हॉकी संघ आता उत्साहवर्धक कामगिरी करीत आहे. त्यामुळे मला पुन्हा खेळण्याची इच्छा निर्माण झाली,' असे ती म्हणाली. या स्पर्धेत बेलारुस, कॅनडा, मेक्‍सिको, त्रिनिदाद-टोबॅगो, उरुग्वे आणि चिली अशा संघांचा सहभाग असेल. भारतीय संघाचे सराव शिबिर भोपाळमध्ये होईल. त्यात तंदुरुस्ती आणि डावपेचांचे नियोजन करण्यावर भर असेल, असे नवे प्रशिक्षक जोरेड मरिने यांनी सांगितले. बेलारुसविरुद्धच्या मालिकेतील धवल यशामुळे संघाचे मनोधैर्य उंचावल्याचे त्यांनी नमूद केले.

संघ - गोलरक्षक - सविता, रजनी एटीमार्पू. बचाव फळी ः दीप ग्रेस एक्का, सुनीता लाक्रा, गुरजित कौर, रेणुका यादव, लालहलुन्मावी. मध्य फळी ः दीपिका, नवज्योत कौर, रितू राणी, मोनिका, लीली चानू मायेंग्बाम, नमिता टोप्पो. आघाडी फळी - राणी, वंदना कटारिया, पूनम राणी, सोनिका, अनुपा बार्ला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women hockey team declare