हॉकीचे सुवर्णयुग परतण्याची आशा

Hockey
Hockey

भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते.

काही वर्षांपूर्वीची ती बातमी अजूनही माझ्या लक्षात आहे. भारतीय पथक ऑलिंपिकला निघाले होते. हॉकी संघाने पदक जिंकले तर अन्य खेळातील अपयशाचा विसर पडेल, अशी भावना अनेक क्रीडापटूंची असल्याचे त्यात म्हटले होते. त्यावेळी हॉकीत पुन्हा यश मिळायला सुरुवात झाली होती.

भारताच्या हॉकी लढतींना अन्य खेळांतील भारतीय खेळाडू उपस्थित राहत होते, पण त्या ऑलिंपिकमध्येही पदक दुरावले आणि पुन्हा एकदा निराशाच पदरी आली. आता अन्य खेळात यश मिळत असले तरी हॉकी संघाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असते. आता त्याच भारताची विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील मोहीम काही दिवसांतच सुरू होईल.

विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्‍वरला सुरू होईल. भुवनेश्‍वरकडे आता भारतीय हॉकीचा केंद्रबिंदू सरकला आहे. तिथे देशातील गेल्या दोन महत्त्वाच्या हॉकी स्पर्धा झाल्या. ओडिशाच भारतीय हॉकी संघाचे पुरस्कर्ते आहेत. तिथे भारतीय हॉकीवर, भारताच्या संघावर मनापासून प्रेम करणारे चाहते गर्दी करतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक चालीसाठी प्रोत्साहन देतात. त्यांचे जोरजोरातील प्रोत्साहन ही भारताची खरी ताकद असेल.

थोडेथोडके नव्हे तर तब्बल अठरा दिवस चालणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्यावेळी भारतीय खेळाडू कसे फिट राहतात, तसेच घरच्या मैदानावरील या स्पर्धेच्या दडपणास कसे सामोरे जातात यावर सर्व काही अवलंबून आहे. भारताच्या दोन लढतींत प्रसंगी सहा दिवसांचे अंतर आहे. बेल्जियमविरुद्ध २ डिसेंबरला सामना झाल्यावर ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध लढत होईल.

बेल्जियम केवळ ऑलिंपिक उपविजेतेच नाहीत तर त्यांनी ऑलिंपिकमध्ये भारतास हरवले होते. एवढेच नव्हे तर कॅनडास दुबळे धरून चालणार नाही. त्यांनी वर्ल्ड हॉकी लीगच्या जोहान्सबर्ग येथील उपांत्य फेरीच्या टप्प्यात भारतास क्रमांक निश्‍चित करणाऱ्या लढतीत हरवले होते, ते १-२ पिछाडीनंतर.. एवढेच नव्हे तर भारताने त्याच स्पर्धेत कॅनडास साखळीत ३-० नमवले होते. त्यामुळे भारतासाठी गट सोपा आहे. बेल्जियमच केवळ आपल्याला आव्हान देतील असे समजण्याची गरज नाही. थोडेसे जरी गाफील राहिले तर काय होते हे आपण आशिया क्रीडा स्पर्धेत अनुभवले आहे. 

फिटनेस उत्तम
विश्‍वकरंडक विजेत्या संघातून आलेल्या खेळाडूंचाच नव्हे तर सर्वच खेळाडूंचा फिटनेस चांगला आहे. संघ प्रामुख्याने नवोदितांचा आहे. हॉकीच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर आपला बचाव पूर्वीइतका कमकुवत राहिलेला नाही. हरमनप्रीत, सुरेंदर, बिरेंदर, कोथाजीत, अरुण आणि अमित रोहिदास यांच्यावर नक्कीच विसंबून राहता येते. त्यांचा बचाव भक्कमच नाही तर ते वेगवान प्रतिआक्रमण सुरू करण्यातही मोलाची कामगिरी बजावतात. बचावाचा विचार करताना गोलरक्षक श्रीजेशला विसरून चालणार नाही. भारताचे सर्वच प्रतिस्पर्धी संघ व्यूहरचना तयार करताना श्रीजेश गोलरक्षक आहे हे विचारात घेतात. त्याचे मैदानात असणारे चौफेर लक्ष संघास अनेक दृष्टीने उपयुक्त ठरते. 
कर्णधार मनप्रीत सिंग असलेल्या मधल्या फळीच्या कामगिरीवरच संघाचे यशापयश अवलंबून असेल. अर्थात हॉकी फुटबॉलमध्ये मधली फळीच मोलाची असते. पण भारतीय आक्रमणाचा वेग, दिशा मधली फळी ठरवणार आहे. यात मनप्रीतकडून निर्णायक कामगिरी अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्याला चिंगलेनसाना, सुनील, नीलकांता यांची साथ लाभेलच. मनदीप, आकाशदीप आणि ललितसारखे चांगले आक्रमक आपल्याकडे आहेत. भारतीय संघातील सहा कुमार खेळाडू विश्‍वकरंडक हॉकीच्या दडपणास, आव्हानास कसे सामोरे जातात यावर खूप काही अवलंबून आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू सारखेच असतात, पण या नवोदितांवर नाही म्हटले तरी विश्‍वकरंडक स्पर्धेचे दडपण असणार आणि त्यांच्या कौशल्याचा योग्य उपयोग करून घेण्याचे आव्हान असेल. रमणदीप सिंग, एस. व्ही. सुनील तसेच रुपींदर दुखापतीमुळे या स्पर्धेत नसतील. सरदारा सिंग निवृत्त झाला आहे. या परिस्थितीत मनप्रीतवरील जबाबदारी वाढणार आहे. 

प्रेक्षकांची साथ मोलाची
भारतीय कामगिरीचा विचार करताना या स्पर्धेच्यावेळी असणारे प्रेक्षक हाही संघाचा एक प्रकारचा भाग असतील. त्यांची साथ खेळाडू कसे घेतात ते महत्त्वाचे असेल. प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा असतो तसेच दडपणही. भुवनेश्‍वरचे चाहते प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही सामन्याचा निकाल अखेरच्या मिनिटापर्यंत होत नसतो, त्यामुळे आपण लढायला हवे, अशी त्यांची भावना असते, त्यामुळेच भारत मागे असतानाही ते संघासोबतच असतात. पराजित झाल्यावरही आपण पुढची मॅच नक्कीच जिंकणार, असा दिलासा देत असतात. मात्र याचे दडपण नवोदित खेळाडूंवर येऊ शकेल हेही लक्षात घ्यायला हवे. एक मात्र खरे प्रेक्षकांचा भरभक्कम पाठिंबा असल्यामुळे आपण या स्पर्धेतील डार्क हॉर्स आहोत हे नक्कीच. 

या स्पर्धेत केवळ हॉकीतील गुणवत्ता आणि त्यातील कामगिरी याचा विचार केल्यास खरी चुरस असेल ती बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅंड्‌स आणि अर्जेंटिना तसेच भारत यांच्यात. ऑलिंपिक उपविजेते बेल्जियम आपल्याच गटात आहेत. त्यांची विश्‍वकरंडक स्पर्धेची पूर्वतयारी २०१४ पासून सुरू आहे. त्यांचा बचाव जगात सर्वोत्तम मानला जातो. त्यांची कमालीची वेगवान प्रतिआक्रमणे कोणत्याही संघाची गणिते बिघडवू शकतात. उत्तम सांघिक कौशल्य ही त्यांची खास बाब. आपल्याला त्यांची विश्‍वकरंडक पूर्वतयारीची कल्पना साखळीतील लढतीतच येऊ शकेल. 

गेली कित्येक वर्षे ऑस्ट्रेलिया जागतिक हॉकीतील दादा आहेत. रिओ ऑलिंपिकमधील सहाव्या स्थानाचा डाग त्यांनी यंदा चॅम्पियन्स करंडक पंधराव्यांदा जिंकत पुसला आहे. देशांतर्गत दर्जेदार हॉकी स्पर्धांतून तयार झालेले खेळाडू एकमेकांना साह्य करीत धडाकेबाज खेळ करतात. त्यांची वेगवान आक्रमणे प्रतिस्पर्ध्यांनाही मोहात पाडतात. 

एक मात्र खरे या स्पर्धेत दर्जेदार हॉकीचा आनंद मिळणार आहे. बुद्धिबळासारख्या आगळ्या चाली दिसतील. या भुवनेश्‍वरच्या हॉकी जल्लोषात डार्क हॉर्सने भारताच्या ४३ वर्षांचा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com