कविता राऊत इगतपुरीमधून लढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

नाशिक ः इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्या. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत हिचे नाव चर्चेत आले आहे. सौ. गावित यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याने कविता निवडणूक लढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नाशिक ः इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाल्या. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली दोन्ही तालुक्‍यांत गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच ऑलिंपिकपर्यंत पोचलेल्या सावरपाडा एक्‍स्प्रेस कविता राऊत हिचे नाव चर्चेत आले आहे. सौ. गावित यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याने कविता निवडणूक लढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
भाजपमधील मेगाभरती अन्‌ शिवसेनेतील प्रवेशाची लगीनघाई या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल की नाही, याबद्दल स्थानिकांच्या तंबूत धास्तीचे वातावरण आहे. त्यास मात्र इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर विधानसभा मतदारसंघ अपवाद राहणार काय? या दृष्टीने कविताचे नाव चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजकीय इच्छा-आकांक्षाच्या पार्श्‍वभूमीवर एकास एक उमेदवार देण्याचे सूत्र कितपत जुळणार याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. मुळातच, काशीनाथ मेंगाळ शिवसेनेकडून, तर युती न झाल्यास शिवराम झोले आणि विनायक माळेकर भाजपकडून उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. सौ. गावित यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे श्री. मेंगाळ यांच्या समर्थकांना उमेदवारीसाठी मुरड घालावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वावड्या उठत असताना सौ. गावित यांच्या समर्थकांच्या भुजबळांच्या भूमिकेकडे नजरा लागल्या आहेत. भुजबळांच्या भूमिकेवर जिल्हा परिषदेचे माजी सभापती हिरामण खोसकर निवडणूक लढवणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. जर युती निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाल्यास कविताच्या नावावर सौ. गावित यांच्या विरोधकांकडून एकमत होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

कविताच्या कुटुंबीयांचे कानावर हात 
धावण्याच्या "ट्रॅक'वरून "पॉलिटिक्‍स ट्रॅक'वर सावरपाडा एक्‍स्प्रेस नशीब आजमावणार काय? याबद्दल कविताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्या वेळी कुटुंबीयांनी कानावर हात ठेवले. कविताचे नाव उमेदवारीसाठी जोडले जात असल्याने राजकारणाचा गंध नसल्याने आम्ही द्विधाःमनस्थितीत आहोत. एकीकडे चर्चा सुरू झाल्याने इतरांप्रमाणे आम्हाला आनंद वाटणे स्वाभाविक आहे. मात्र उमेदवारीसाठी आमच्याशी अद्याप कुणीही संपर्क केला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, कविता राऊत यांच्या उमेदवारीसाठी आम्ही विचार करत आहोत आणि चार ते पाच नावांवर आमचा विचार सुरू असल्याचे सांगितले. फोडाफोडीच्या राजकारणात आम्ही कुणाचे नाव जाहीर करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शारीरिक तंदुरुस्तीसाठी सराव 
मूळचे दिंडोरी तालुक्‍यातील अभियंता महेश तुंगार यांच्याशी कविताचा विवाह झाला. कविताला अपत्य असून, हे बाळ दहा महिन्यांचे आहे. त्यामुळे कुटुंबाने बाळाच्या संगोपनाला महत्त्व दिले आहे. बाळ ठणठणीत होताच, कविता शारीरिक तंदुरुस्तीसाठी पुन्हा सरावाला सुरवात करणार असल्याचे तिच्या पतीने सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Politics