आंतरराज्य स्पर्धेत हिमा दासची माघार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

सध्या परदेशात सराव करणाऱ्या तसेच स्पर्धेत सहभागी होत असलेल्या हिमा दाससह काही धावपटू आंतरराज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेपासून दूर राहण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : सध्या परदेशात सराव करणाऱ्या तसेच स्पर्धेत सहभागी होत असलेल्या हिमा दाससह काही धावपटू आंतरराज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेपासून दूर राहण्याची शक्‍यता आहे. लखनौतील ही स्पर्धा जागतिक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे.

आंतरराज्य स्पर्धा लखनौत 27 ते 31 ऑगस्टदरम्यान आहे; तर जागतिक स्पर्धा 26 सप्टेंबरपासून दोहात आहे. हिमा तसेच काही ऍथलीटस्‌ सध्या पोलंडमध्ये आहेत. हिमा तसेच धावकांना नामवंत मार्गदर्शक गालिना बुखारिना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्याच बरोबर गोळाफेकीतील स्पर्धकही आहेत. भालाफेकीतील तेजिंदरपाल तूर स्पेनमध्ये प्रशिक्षण घेत आहे. परदेशात सराव करीत असलेल्या ऍथलीटस्‌नी जागतिक स्पर्धेपर्यंत तिथेच सराव करावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

परदेशात सराव कायम ठेवल्यास त्यांचा आंतरराज्य स्पर्धेत सहभाग नसेल; मात्र या स्पर्धेसाठी ते मायदेशात आल्यास त्यांचा सराव खंडित होईल. त्याचबरोबर काहींना जाहिरातीसाठी आग्रह होईल. यामुळे त्यांचा सराव खंडित होईल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक स्पर्धेची पात्रता साध्य केलेल्या खेळाडूंसाठी आंतरराज्य स्पर्धेचा उपयोग नाही असेही ते म्हणाले.

हिमाने अद्याप जागतिक स्पर्धेची पात्रता साध्य केलेली नाही. तिला या स्पर्धेचा फायदा झाला असता, असे काहींचे मत आहे; मात्र आगामी काही दिवसांत हिमा पुन्हा स्थानिक स्पर्धांत सहभागी होईल आणि जागतिक पात्रता साध्य करेल, असा विश्‍वास भारतीय ऍथलेटिक्‍स पदाधिकाऱ्यांना आहे.

चिंता पावसाची
भारताच्या प्रमुख ऍथलीटस्‌चा मुक्काम असलेल्या परिसरात पाऊस जास्त होतो. अर्थातच पावसाळ्यातील रोगांचे प्रमाणही जास्त असते. सुधा सिंगला त्यामुळेच फेडरेशन स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेस मुकावे लागले होते. त्यामुळे ऍथलीटस्‌नी या कालावधीत परदेशात सराव केला तर चांगलेच, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hima das may skip inter state meet