लाल मातीला गवसेना चंद्रहारचा वारसदार

अजित झळके
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

चंद्रहार पाटील यांच्यानंतर शंकर मोहिते (यंदा महाराष्ट्र केसरीला गटात दुसरा), जयपाल वाघमोडे, रवींद्र गायकवाड (पूर्वीचा गटविजेता), सूरज निकम, गणेश पवार अशी काही नावे चर्चेत आली, येताहेत. परंतु, तब्बल दहा वर्षांनंतर चंद्रहार पुन्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणीच्या आखाड्यात उतरतो आणि जिल्हा जिंकून पुढे जातो, त्याअर्थी या दहा वर्षांत चंद्रहारच्या तोडीचा कुणी तयारच झाला नाही का?

‘महाराष्ट्र केसरी’साठी भाळवणीच्या पोरानं शड्डू ठोकला आणि सांगली जिल्ह्याच्या लाल मातीतून नवा हिरा उदयाला आला, त्याचं नाव चंद्रहार पाटील. सन २००७ ला औरंगाबाद मुक्कामी आणि त्यानंतर २००८ ला कडेगाव मुक्कामी या पठ्ठ्याने चांदीची गदा उंचावत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला; मात्र त्यानंतरची दहा वर्षे जिल्ह्याच्या लाल मातीला चंद्रहारचा वारसदार गवसला नाही. या मातीतून बलदंड नाव पुढे येईना; शिवाय या मातीत शड्डू ठोकणाऱ्यांची संख्याही कमी होतेय. 

तज्ज्ञांचे निरीक्षण

  •  महागाईने वाढलाय मल्लांचा खर्च

  •  महिन्याकाठी लागतात २० हजारांवर

  •  आर्थिक प्रश्‍नांपुढे टेकलेत गुडघे

  •  नव्या मल्लांची संख्या कमीच होतेय

  •  तालमींसमोर आर्थिक प्रश्‍न मोठे

  •  भवितव्याविषयी मल्लांमध्ये चिंता

  •  कुस्तीचे ग्लॅमर कमी होतेय

  •  कंपन्या, संस्थांकडून आर्थिक रसद घटलीय

व्यंकाप्पा ते चंद्रहार
सांगली जिल्ह्याच्या लाल मातीला गौरवशाली परंपरा आहे. या मातीतून राज्य अन्‌ देश गाजवणारे हिरे उपजले. त्यात ‘दख्खन का काला मारुती’ म्हणून लौकिक पावलेले व्यंकाप्पा बुरूड यांच्यापासूनचा प्रवास सुरू होतो. तो ज्योतिरामदादा सावर्डेकर, हरिनाना पवार, बेलीफ डाकवाले, हिंदकेसरी मारुती माने, विष्णुपंत सावर्डेकर, शामराव मोरे, राम नलवडे, गणपतराव आंदळकर,  नारायण पवार, कुशाबा गवळी, मारुती मंगसुळीकर, दिनकर दह्यारी, भगवान मोरे, श्रीरंग शिंदे, संभाजी पवार अशी कित्येक नावे या माळेत ओवली गेली. हा प्रवास चंद्रहार पाटील या नावावर येऊन थांबतो. तो पुढे जात नाही. चंद्रहार चमकण्यापूर्वी काही वर्षे जिल्ह्यातील कुस्तीची तीच अवस्था होती. महाराष्ट्र केसरीच्या पटलावर सांगलीचा डंका वाजेल, असं काहीच होत नव्हतं. चंद्रहारने ती मरगळ झटकून टाकली. सलग दोन वर्षे महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहारची प्रेरणा घेऊन अनेक नवे मल्ल पुढे आले. कुस्तीला थोडी क्रेझही आली. पण, ना चंद्रहार पुढे सरकला, ना जिल्ह्याची कुस्ती. वैद्यकीय कारणाने चंद्रहारची काही वर्षे वाया गेली; मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर न जाता पुन्हा महाराष्ट्र केसरीचा अट्टहास का केला, याचा उलगडा काही झाला नाही. 

नवा दम आहे कुठे?
चंद्रहार पाटील यांच्यानंतर शंकर मोहिते (यंदा महाराष्ट्र केसरीला गटात दुसरा), जयपाल वाघमोडे, रवींद्र गायकवाड (पूर्वीचा गटविजेता), सूरज निकम, गणेश पवार अशी काही नावे चर्चेत आली, येताहेत. परंतु, तब्बल दहा वर्षांनंतर चंद्रहार पुन्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणीच्या आखाड्यात उतरतो आणि जिल्हा जिंकून पुढे जातो, त्याअर्थी या दहा वर्षांत चंद्रहारच्या तोडीचा कुणी तयारच झाला नाही का? चंद्रहारने पुन्हा महाराष्ट्र  केसरीच्या आखाड्यात शड्डू का ठोकला, हा स्वतंत्र चर्चेचा विषय होईल; मात्र चंद्रहारचा वारसदारच नसेल तर सांगलीच्या मातीचा कस कमी झालाय का?

भवितव्य... अंधार
एकेकाळी लाल माती गाजवलेल्या मल्लांची आजची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर पोराला शड्डू ठोकायला लाल मातीत धाडावं का, असा प्रश्‍न कुठल्याही शहाण्या पालकाला पडेल. काही महान मल्लांनी राजकारण आणि अन्य क्षेत्रात नाव आणि दौलत कमावली. ते साऱ्यांनाच जमलं नाही. त्या नकारात्मक प्रभावातून कुस्ती आजही बाहेर आलेली नाही, असं निरीक्षण ज्येष्ठ मल्ल नामदेवराव मोहिते, राम नलवडे, कुस्ती कोच उत्तम पाटील यांनी सतत नोंदवलेले आहे. भवितव्याविषयीचा अंधार भीती घालणारा आहे, असे बहुतांश मल्ल उघडपणे सांगतात. ज्याच्या घरचं बरं आहे, तो कुस्तीत यायची शक्‍यता फार कमी. त्यामुळे कुस्ती गर्तेत सापडली आहे.

महापालिका ढिम्म
सांगली, मिरज शहरात सहा तालमी आहेत. त्याची पाणीपट्टी, घरपट्टी माफ करा, एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली गेली. महाआघाडीची सत्ता असल्यापासून त्याचा पाठपुरावा केला गेला. कोट्यवधींचा गफला करणाऱ्यांनी या गोष्टीला कधी गांभीर्याने घेतलेच नाही. इथले मल्ल शंभर-दोनशे वर्गणी काढून ही रक्कम भरतात. प्रश्‍न खूप मोठा नसला तरी लाल मातीला आधार देण्याचा विषय येतो तेव्हा सारेच हात वर करतात, ही वस्तुस्थिती वेदनादायी असल्याचा संताप व्यक्त केला जातो.

अपेक्षा छोट्या... पण!

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, ‘‘केवळ सांगलीत नव्हे तर राज्यभरात नवीन मल्ल तयार होण्याच्या प्रमाणात चिंताजनक घट दिसतेय. हे चित्र बदलण्यासाठी सर्व पातळीवर सकारात्मक धोरण राबवण्याची गरज आहे. मल्लांचे भवितव्य सुरक्षित होईल, असे काही निर्णय राज्य शासन आणि शासनाच्या प्रभावाखाली संस्थांनी 
घेतले तर हे चित्र बदलू शकेल. ‘महाराष्ट्र केसरी’ना पोलिस दलात महत्त्वाच्या पदावर घेण्याची विनंती मान्य झाली. त्यासोबत वजनी गटविजेत्यांना द्वितीय श्रेणीच्या नोकऱ्या द्याव्यात, ते आर्थिक विवंचनेतून बाहेर पडतील. वेगवेगळ्या ‘नामांकित’ स्पर्धा गाजवणाऱ्यांना वसंतदादा, राजारामबापू, वारणा कारखान्यांत पूर्वी दिल्या जायच्या तशा नोकऱ्या द्याव्यात.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News special story on wrestling