चला धावूयात...आरोग्यसंपन्न पुण्यासाठी! 

चला धावूयात...आरोग्यसंपन्न पुण्यासाठी! 

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल क्रीडांमधील विविध क्रीडा प्रकार या शहराने जोपासले, वाढविले. आशियाई स्पर्धा त्यानंतरच्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांनी पुण्याची क्रीडानगरी अशी ओळख जगभराला करून दिली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुरेश कलमाडी यांनी पुण्याला क्रीडानगरी म्हणून विकसित करण्यासाठी योगदान दिले. राज्य-केंद्र सरकारने त्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला. त्यातून पुण्याच्या क्रीडा जगताला निश्‍चित चालना मिळाली.

शहराचा सध्या झपाट्याने विकास होत आहे. शिक्षणाच्या अनेक संधींसोबत ‘आयटी’ उद्योगाचे शहर अशीही ओळख या शहराला प्राप्त झाली आहे. राहण्यासाठी सर्वांत चांगले शहर असा नावलौकिकही नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात पुण्याला मिळाला आहे. एका बाजूला औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या प्रगती होत असताना शहराची सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती राखणे एका चांगल्या शहरासाठी आवश्‍यक असते.

त्यामुळेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे  खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम होणे आवश्‍यक असतात. असे खेळ, कार्यक्रमच शहराची वेगळी ओळख जगभर निर्माण करीत असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या रविवारी शहरात ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ होत आहे. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने ‘फिट’ राहावे आणि पर्यायाने एक सदृश शहर निर्माण व्हावे, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने ९ डिसेंबर हा ‘पुणे हेल्थ डे’ जाहीर केला आहे. त्याची सुरवात ‘पुणे हाफ मॅरेथॉन’च्या निमित्ताने होत आहे. 

विविध वैशिष्ट्य असणाऱ्या या मॅरेथॉनचा मूळ गाभा पुणेकरांना एकत्र आणणे आणि स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या पर्यायाने शहराच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. एका बाजूला पुणे महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ पुणे सर्वेक्षण’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यात स्वच्छतेविषयी पुणेकरांच्या सवयी बदलण्यावर भर दिला जात आहे. रस्त्यावर थुंकण्यापासून घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यापर्यंत जनजागृतीच्या अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. स्वच्छता आणि आरोग्य या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी आहेत. आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्वच्छता राखणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच स्वतः तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. यात धावणे हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार जगमान्य आहे. त्याचमुळे जगभरात विविध ‘मॅरेथॉन’ स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय आणि अधिकाधिक संख्येने होत आहेत. 

मुंबईत होत असणारी मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबईकरांच्या उत्स्फूर्त सहभागासाठी जगभर प्रसिद्ध आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक या स्पर्धेत भाग घेऊन आनंद घेतात. ही स्पर्धा मुंबईचे वेगळे वैशिष्ट्य बनली आहे. याच धर्तीवर सर्व आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करून ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ होत आहे. या स्पर्धेतील दहा आणि एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत देशभरातील नामवंत धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे; पण स्पर्धेचे खरे आकर्षण ठरणार आहे, सहा किलोमीटर अंतराची ‘फॅमिली रन’ स्पर्धा. या स्पर्धेत शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, गृहनिर्माण सोसायट्यांचे सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव आदींचे साधक, ढोल-लेझीम पथके, नृत्य पथके, पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध घटक सहभागी होत आहेत. त्यामुळे धावपटूंना प्रोत्साहन देणे, त्यांचे जंगी स्वागत करणे आणि पुण्याची ‘मॅरेथॉन’ ही नवी ओळख निर्माण करण्यासाठी रविवारी पहाटे पुणेकरांना बालेवाडी-बाणेर- सावित्रीबाई फुले विद्यापीठ या मार्गावर उपस्थित राहावे लागणार आहे.

धावण्याचा करूया संकल्प ...
स्पर्धेतील नोंदणीला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणेकरांच्या सहभागाचा उच्चांकही या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ही आरोग्यपूर्ण पुण्याची सुरवात ठरणार आहे. त्यानंतर वर्षभरासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पुणेकरांच्या सर्व पातळीवरील सहभागातूनच हे साध्य होणार आहे. त्यामुळे धावण्याचा आनंद घेण्यासाठी, कुटुंबाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रविवारी पहाटे आपण धावण्याचा संकल्प करूयात. पुण्याची नवी ओळख निर्माण करूयात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com