World Cup 2019 : कोण ठरणार सर्वश्रेष्ठ ! (शैलेश नागवेकर)

shailesh nagvekar
shailesh nagvekar

विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे. त्यांच्यासह शर्यतीत असलेले इतरही खेळाडू सर्वोत्तम कसे ठरू शकतील, याचा हा ऊहापोह

क्रिकेट हा सांघिक खेळ. वैयक्तिक कामगिरी सामने जिंकून देत असते; परंतु सांघिक कामिगिरी स्पर्धा जिंकून देत असते. तरीही संपूर्ण स्पर्धेत असा एखादा खेळाडू असतो, की तो सिकंदर ठरत असतो. किंबहुना त्याच्या कामगिरीतील सातत्य, संघाला ऐनवेळी दिलेले योगदानच संघाला विजेतेपदापर्यंत नेत असते. अशा खेळाडूंना स्पर्धावीर म्हटलं जातं, कारण त्याची कामगिरी वीरोचित असते. बहुचर्चित विश्वकरंडक स्पर्धा आता हाकेच्या अंतरावर आली आहे. सर्व संघांची जोमाने तयारी सुरू झाली आहे आणि क्रिकेट चाहत्यांचीही उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. विजेता कोण होईल हा नंतरचा प्रश्न; पण प्रत्येक सामन्याचे अंदाज बांधणं सुरू झालंय, कोण स्पर्धा गाजवणार असे खेळाडूही अगदी सहजतेने सांगितले जात आहेत. जसं विजेता कोण हे कायमस्वरूपी लक्षात राहिलं जातं, तसं सर्वोत्तम कोण हे नाव अठवलं तरी संपूर्ण स्पर्धा नजरसमोर येते, एवढं महत्त्व या स्पर्धावीराला मिळतं. 2011चा विश्वकरंडक आणि सर्वोत्तम कोण, तर युवराज सिंग! नुसतं नाव घेतलं तरी युवीचा अष्टपैलू खेळ आणि त्याने दाखवलेली जिगर लगेचच आठवते. त्या वेळी अधूनमधून त्याला श्वसनाचा आणि पोटदुखीचा त्रास होत होता. कर्करोगाची ती सुरवात होती, हे त्यानंतर कळलं, त्यामुळे युवराजचा झुंझार खेळ अधिकच मनाला भावतो.

असो, काउंटडाउन सुरू झालेल्या या विश्वकरंडक स्पर्धेत कोण सर्वोत्तम ठरणार याचीही तेवढीच उत्सुकता आहे. ही 12वी विश्वकरंडक स्पर्धा आहे. या अगोदर झालेल्या 11 स्पर्धांपैकी पहिल्या चार म्हणजेच 1975, 1979, 1983 आणि 1987 च्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम खेळाडू निवडले गेले नाहीत. ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये झालेल्या 1992 च्या स्पर्धेने कात टाकली. लाल चेंडूंची स्पर्धा पांढऱ्या चेंडूंची झाली. रंगबिरंगी पोशाखांची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रकाशझोतातली झाली... आणि तेथूनच सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची प्रथा सुरू झाली. त्यानंतरची प्रत्येक स्पर्धा काही तरी नवे प्रयोग करणारी ठरली आहे. वाढत जाणारी सामन्यांची संख्या, तुल्यबळ लढती यामुळे सर्वोत्तम खेळाडूंसाठी होणारी स्पर्धा अधिकच तीव्र होते.
यंदाचा सर्वोत्तम खेळाडू कोण असेल याचा अंदाज बांधताना त्याला व्यवहार्यताही असणं गरजेचं आहे. स्पर्धा कोठे आहे, कोणत्या वातावरणात होणार आहे आणि फॉर्मात कोण आहे, याची गणितं जुळवणं महत्त्वाचं असलं तरी कोणीतरी अनपेक्षितपणे स्टार होऊ शकतो, मग तो नावाजलेला खेळाडू असेलच असं नाही किंवा त्याने अगोदरच्या स्पर्धा- मालिकांत लक्षवेधक कामगिरी केलेली असलेच असंही नाही. त्यामुळे यंदाच्या सर्वोत्तम खेळाडूचा विचार करण्यापूर्वी अगोदरच्या स्पर्धांमध्ये कोण सर्वोत्तम ठरलं आणि कसं ठरलं हे पाहू या मग, अंदाज बांधणं सोपं ठरेल.

- 1992 मार्टिन क्रो (न्यूझीलंड, 456 धावा)
- 1996 सनथ जयसूर्या (श्रीलंका, 221 धावा, 7 विकेट)
- 1999 लान्स क्‍लुसनर (दक्षिण आफ्रिका, 281 धावा आणि 17 विकेट)
- 2003 सचिन तेंडुलकर (भारत, 673 धावा, 2 विकेट)
- 2007 ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया, 26 विकेट)
- 2011 युवराज सिंग (भारत, 362 धावा, 15 विकेट)
- 2015 मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया, 22 विकेट)

वरील सात स्पर्धांचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे ज्या देशांत स्पर्धा झाल्या, त्या त्या देशांचे किंवा तेथील वातावरणाशी मिळतेजुळते असलेले खेळाडू सर्वोत्तम ठरले आहेत. अपवाद मात्र 2003 (इंग्लंडमधील स्पर्धा, दक्षिण आफ्रिकेचा लान्स क्‍लुसनर), 2007 (वेस्ट इंडीजमधील स्पर्धा, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा) आणि 1999 (इंग्लंडमधीलच स्पर्धा, भारताचा सचिन तेंडुलकर). खरंतर सचिन हा असा खेळाडू आहे, की ज्याला केवळ भारताच्या किंवा उपखंडाच्या सीमेचं बंधन नव्हतं.

दुसरं वैशिष्ट्य असं, की सातपैकी चार स्पर्धांमध्ये अजिंक्‍य ठरलेल्या संघातील खेळाडू सर्वोत्तम होते, तर उर्वरित तीन खेळाडूंचे संघ एक तर अंतिम फेरीत किंवा उपांत्य फेरीत पराभूत झालेले होते. 1992 (न्यूझीलंड उपांत्य फेरीत पराभूत, खेळाडू मार्टिन क्रो), 1999 (दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पराभूत, खेळाडू लान्स क्‍लुसनर) आणि 2003 (भारत, उपविजेता खेळाडू सचिन तेंडुलकर).

तिसरं वैशिष्ट्य सातपैकी तीन स्पर्धांत 1992 (मार्टिन क्रो), 1996 (सनथ जयसूर्या) आणि 2003 (सचिन तेंडुलकर) हे फलंदाज म्हणून सर्वोत्तम ठरले. अर्थात, जयसूर्याने मिळवलेले सात आणि सचिनने मिळवलेले दोन विकेट हे बोनस होते. 1999 आणि 2011 मध्ये अनुक्रमे लान्स क्‍लुसनर आणि युवराज सिंग अष्टपैलू कामगिरीमुळे सर्वश्रेष्ठ ठरले होते, तर 2007 आणि 2015 मध्ये ग्लेन मॅकग्रा आणि मिशेल स्टार्क सर्वोत्तम ठरले.

आता बांधू या अंदाज
अगोदरच्या सर्वोत्तम खेळाडूंचे वरील तीन टप्प्यांवर विश्‍लेषण केल्यावर आता यंदाचा स्टार कोण ठरणार याचा अंदाज बांधणं सोपं ठरू शकेल. आत्ताची स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. अर्थात, यजमान संघातील खेळाडूंसाठी नेहमीचं हवामान. ऑस्ट्रेलियाचेही खेळाडू इंग्लंडमध्ये खेळत असतात, तसं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही येथे अनेकदा चांगली कामगिरी केलेली आहे. गतवर्षी भारताने कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली होती; परंतु विराट कोहली, हार्दिक पंड्यासारखे खेळाडू लक्षवेधक ठरले होते. शिवाय, येथे 2013 आणि 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विजेता आणि उपविजेता राहिलेला आहे, त्यामुळे भारतासाठी तसं अनुभव असलेलं वातावरण असू शकेल. शिवाय, या स्पर्धेसाठी फलंदाजीस उपयुक्त अशा खेळपट्ट्या असतील असं बोललं जातं. फक्त ढगाळ वातावरण असल्यास वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील असा अंदाज आहे.

कसे होतील सर्वोत्तम खेळाडू
- इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आणि तेथील इतिहास पहता सर्वोत्तम खेळाडू इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत किंवा दक्षिण आफ्रिका या देशातील असू शकेल.
- एकदिवसीय प्रकार हा फलंदाजांना अधिक प्राधान्य देणारा आहे, शिवाय सातपैकी तीन स्पर्धांत मार्टिन क्रो, सनथ जयसूर्या आणि सचिन तेंडुलकर सर्वोत्तम ठरले आहेत. जयसूर्या आणि तेंडुलकर सलामीला खेळायचे, तर मार्टिन क्रो तिसऱ्या किंवा फार फार तर चौथ्या क्रमांकावर खेळायचा, यावरून जर यंदा कोणी फलंदाज सर्वोत्तम ठरला, तर तो पहिल्या तीन क्रमांकांवर खेळणारा फलंदाज असू शकेल.
(अंदाज : विराट कोहली, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, ज्यो रूट, जॉस बटलर (यष्टिरक्षक अष्टपैलू), ख्रिल गेल)
- लान्स क्‍लुसनर आणि युवराज सिंग असे दोनच जण सात स्पर्धांमध्ये सर्वोत्तम ठरले आहेत. लान्स क्‍लुसनर हा जास्त प्रमाणात गोलंदाज आणि सहाव्या-सातव्या क्रमांकावर येऊन बेधडक फलंदाजी करायचा. 281 धावाच केल्या होत्या; पण त्याच्या 17 विकेटही होत्या. युवराज सिंगही अष्टपैलू कामगिरीमुळे सर्वोत्तम ठरला होता; पण 2011 ची स्पर्धा भारतात झाली होती. फलंदाजीत प्रत्येक वेळी त्याने मोठी खेळी केली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत अफलातून अर्धशतकी खेळी केली होती; पण पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, संपूर्ण स्पर्धेत भारताला गरज असताना गोलंदाजीत त्याने मिळवलेल्या 15 विकेट मौल्यवान ठरल्या होत्या. आता यंदाची स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असल्याने फिरकी अष्टपैलू सर्वोत्तम ठरण्याची शक्‍यता कमी आहे. वेगवान गोलंदाजी करणारा आणि मोक्‍याच्या वेळी धावाही करणारा फलंदाज सर्वोत्तम ठरू शकेल.
(अंदाज : हार्दिक पंड्या, बेन स्टोक्‍स; पण फिरकी अष्टपैलूंचा विचार केल्यास ग्लेन मॅक्‍सवेल आणि रशिद खान)
- सातपैकी दोन स्पर्धांत ग्लेन मॅकग्रा (2007 विंडीज) आणि मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) हे सर्वोत्तम ठरले होते. भारतातील 2011च्या स्पर्धेत झहीर खानचीही कामगिरी सर्वोत्तम ठरणारी होती. वेस्ट इंडीज असो वा ऑस्ट्रेलिया, जेथे वेगवान गोलंदाजांना साहाय्यक खेळपट्ट्या आहेत, हा विचार करता इंग्लंडमध्येही वेगवान गोलंदाज कमाल करू शकतात.
(अंदाज : मिशेल स्टार्क (महिनाभर विश्रांतीमुळे पुन्हा ताजातवाना झाला आहे), जसप्रीत बुमरा, कागिसो रबाडा, डेल स्टेन)

आत्तापर्यंतचे सर्वोत्तम खेळाडू आणि ते का सर्वोत्तम ठरले हा इतिहास आणि येणारी विश्वकरंडक स्पर्धा होत असलेले इंग्लंडचे हवामान आणि खेळपट्ट्या, तसंच खेळाडूंचा सध्याचा फॉर्म हे सर्व लक्षात घेऊन काही नावं निश्‍चित होतात, ती पुढीलप्रमाणे :
भारत : विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, ग्लेन मॅक्‍सवेल
दक्षिण आफ्रिका : कागिसो रबाडा
इंग्लंड : जॉस बटलर, बेन स्टोक्‍स, ज्यो रूट

आता हे वरील खेळाडू का सर्वोत्तम ठरू शकतील याचा आढावा घेऊ या
विराट कोहली : 2105च्या इंग्लंड दौऱ्यात जिमी अँडरसनने विराट कोहलीला उजव्या यष्टीबाहेर वारंवार बाद केले होते, त्यानंतर 2018च्या याच इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला, त्यामुळे इंग्लंडची भीती आता राहिलेली नाही. शिवाय, विराट सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधला आयसीसीचा सर्वोत्तम फलंदाज आहे, हे त्याच्या 2018 मधील सातत्यपूर्ण कामगिरीचं फलित आहे. विश्वकरंडकसारख्या स्पर्धांत विराटसारखे फलंदाज हमखास यशस्वी होत असतात, त्यामुळे यंदा तो सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत सर्वांत पुढे असेल.
हार्दिक पंड्या : हार्दिक पंड्या काय करू शकतो हे आपण आयपीएलमध्ये पाहिलं आहे. त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे. शेवटच्या 15 षटकांत त्याला फलंदाजी मिळाली, की तो सामन्याचं पारडं बदलू शकतो. गोलंदाजीतही चमक दाखवली तर तो निश्‍चितच अष्टपैलू म्हणून सर्वोत्तम ठरू शकतो.
जसप्रीत बुमरा : सध्याचा हा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा वेगात गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत; पण बुमराची अचूकता आणि भेदकता भन्नाट आहे. डेथ ओव्हरमध्ये तो भल्याभल्या फलंदाजांचा बचाव भेदू शकतो, संपूर्ण स्पर्धेत त्याची भेदकता कायम राहायला हवी.
डेव्हिड वॉर्नर : हा भलतीच स्फोटक फलंदाजी करू शकतो. चेंडू कुरतडल्याप्रकरणी एका वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागल्यामुळे अहंकार दुखावला आहे. सर्व राग आपल्या बॅटमधून काढण्यासाठी सज्ज असेल. वर्षभर क्रिकेटपासून दूर असला तरी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, याचाच अर्थ फॉर्म सापडला आहे. यंदाची विश्वकरंडक वॉर्नर गाजवू शकतो.
मिशेल स्टार्क : गतस्पर्धेत हा सर्वोत्तम ठरला होता, त्यामुळे सर्वश्रेष्ठ कामगिरी करणं त्याच्यासाठी नवं नाही. शिवाय, दोन- अडीच महिने चांगली विश्वांती घेतलेली आहे. तंदुरुस्ती मात्र त्याच्यासाठी अडसर ठरू शकते.
ग्लेन मॅक्‍सवेल : कामगिरीत सातत्य नसणं हा मॅक्‍सवेलचा कच्चा दुवा आहे, अन्यथा मॅचविनर आहे. सातत्यपूर्ण कामगिरी केली तर तोही सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत येऊ शकतो, शिवाय ऑफस्पिन गोलंदाजी त्याच्यासाठी बोनस असेल.
कागिसो रबाडा : सध्याच्या घडीला वेगवान गोलंदाजांमध्ये बुमरा आणि रबाडा यांचा दरारा आहे. यंदा सर्वाधिक विकेट मिळवण्याची क्षमता रबाडामध्ये आहे.
जॉस बटलर, ज्यो रूट : इंग्लंड घरच्या मैदानावर विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. जॉस बटलर आणि रूट यांच्याकडे तंत्रशुद्ध फलंदाजीबरोबर हवेत फटके मारण्याची क्षमता आहे. हे दोन्ही फलंदाज सर्वाधिक धोकादायक ठरू शकतील.
बेन स्टोक्‍स : या खेळाडूकडे चांगली अष्टपैलू गुणवत्ता आहे; पण त्याला न्याय देता आलेला नाही. कदाचित यंदाची विश्वकरंडक स्पर्धा त्याच्यासाठी फलदायी ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com