World Cup 2019 : फोटोमागची कथा (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली...

तीन रनआउटने केली धमाल
(व्हिवियन रिचर्डस्‌)

१९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलियन संघाबरोबर होता. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार क्‍लाइव्ह लॉईडने जबरदस्त शतक झळकावले होते. तरीही चर्चेचा विषय तरुण व्हीव रिचर्डस्‌च्या क्षेत्ररक्षणाचा. त्या प्रसंगाबद्दल बोलताना सर व्हीव म्हणाले. रॉय फ्रेड्रीक्‍स, गॉर्डन ग्रिनीज, रोहन कन्हाय, आल्वीन कालीचरण आणि क्‍लाइव्ह लॉईडसारखे दादा फलंदाज विंडीज संघात असताना मला वर्ल्डकप खेळायला मिळणार या विचारांनी मी पुरता भारावलेला होतो. मला कमाल करून दाखवायची होती. दुर्दैवाने गॅरी गिलमोरने मला फलंदाजी करताना मामा बनवले, मी त्रिफाळाचीत झालो. नाराज झालो. लॉईडच्या शतकाच्या जोरावर आम्ही २९१ धावांचे आव्हान उभारले. ऑस्ट्रेलियन फलंदाजी मजबूत होती. फलंदाजीतील अपयश पुसून काढायला मला क्षेत्ररक्षण करताना काहीतरी कमाल करून दाखवायची होती. संधी मिळाली. नजर बसलेल्या टर्नरसह इयन आणि ग्रेग चॅपल बंधूंना मी धावचीत केले. तीनपैकी दोन धावचीत मी झपकन चेंडू पकडून थेट स्टंपवर चेंडू फेकल्याने झाले. ४० पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली त्या सामन्याला, पण ते क्षण मी आजही विसरू शकत नाही. फलंदाज म्हणून मला जे १९७५ च्या वर्ल्डकप अंतिम सामन्यात करता आले नाही ते १९७९च्या अंतिम सामन्यात मला करता आले. १३८ धावांची खेळी उभारताना मला कॉलिस किंगबरोबर मोठी भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढता आले होते. याच कारणाने दोन्ही क्षण माझ्या मनावर कोरले गेले आहेत.

‘त्या’ झेलची कहाणी
(कपिल देव)

१९८३ च्या वर्ल्डकपच्या आठवणी भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात कोंदणातील हिऱ्यासारख्या चपखल बसल्या आहेत. अंतिम सामन्यात कमी धावसंख्येची राखण करताना भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली होती. त्या सामन्याबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, प्रथम फलंदाजी करताना आम्हाला जेमतेम १८३ धावाच जमा करता आल्या होत्या. गोलंदाजी करताना धावा रोखण्याचा रणनीती आखणे चुकीचे ठरले असते. समोरच्या फलंदाजाला बाद करायचा सपाटा लावला तरच जिंकायची पुसटशी शक्‍यता तेव्हाच निर्माण होणार होती. भारतीय संघासमोर मुख्य अडसर होता व्हीवीयन रिचर्डस्‌ यांचा. फलंदाजीकरिता मैदानात पाऊल ठेवल्यापासून व्हीवने खास त्याच्या शैलीत सरळ फटकेबाजी चालू केली. सात खणखणीत चौकार मारून व्हीवने १८३ धावा सहजी काढण्याचा मनसुबा जाहीर केला. व्हीवच्या बॅटमधून फटके बाहेर पडत असल्याने त्याचा आत्मविश्‍वास दुणावला होता. त्याचवेळी मदनलालने टाकलेल्या काहीशा आखूड टप्प्याच्या चेंडूवर व्हीवने पुलचा फटका मारला. चेंडू अपेक्षेपेक्षा कमी वेगाने आल्याने चेंडू हवेत उडाला. मी मिडविकेटला उभा होतो. बाकी कोणताही विचार माझ्या मनात शिवला नाही. मी हवेत उडालेल्या चेंडूवर नजर कायम ठेवली आणि माझे पाय आपोआप वेग घेऊ लागले. जवळपास १५-२० यार्ड पळाल्यावर मला लक्षात आले की मी चेंडूपर्यंत पोहचू शकतो आहे. इंग्लंडमधल्या काहीशा गडद हवेमुळे चेंडू प्रवास वेगाने करत नाही, ज्याचा मला फायदा झाला. मी तो झेल पकडला. झेल पकडल्यावर पहिल्यांदा यशपाल शर्मा मला भेटला. क्षणार्धात अजून १० भारतीय संघाचे पाठीराखे बेभान होऊन मला शाब्बासकी द्यायला लागले. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेताना माझ्या नाकीनऊ आले. एक नक्की की व्हीव बाद झाल्यावर आमच्या आशा पल्लवीत झाल्या. तो झेल पकडण्याचा क्षण मनात कोरला गेला आहे.

पाय घसरला आणि मी हसलो
(महेंद्रसिंह धोनी)     
              
१९८३ नंतर विश्‍वविजेतेपदाच्या सर्वोच्च यशाची २८ वर्षांची प्रतीक्षा धोनीच्या संघाने २०११ मध्ये संपवली. त्या संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत युवराजसिंग भन्नाट फॉर्ममध्ये होता. वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात तीन फलंदाज बाद झाल्यावर सगळ्यांना अपेक्षा होती युवराज फलंदाजीला येण्याची. प्रत्यक्षात मैदानात उतरला महेंद्रसिंह धोनी. ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावांची खेळी धोनीने उभारली आणि उत्तुंग षटकार मारून भारतीय संघाच्या विजयाचे स्वप्न साकारले. त्या खेळीबद्दल आणि त्या विजयी फटक्‍याच्या फोटोबद्दल आठवणीत रमताना धोनी म्हणाला, मला चांगला आठवतो तो क्षण. युवराजसिंग खरच मस्त फलंदाजी करत असताना मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे कोणालाच अपेक्षित नव्हते. त्यामागचा विचार अगदी साधा होता. मैदानावर डावा-उजवा फलंदाज एकत्र खेळत असले की गोलंदाजांना टप्पा दिशा बदलत ठेवणे काहीसे कठीण जाते. तसेच कप्तानाला क्षेत्ररक्षण लावताना त्रास होतो. म्हणून आम्ही ठरवले होते की उजव्या हाताने खेळणारा फलंदाज बाद झाला तर मी फलंदाजीला जायचे आणि डावखुरा फलंदाज बाद झाला तर युवराजने जायचे. नेमका त्या सामन्यात विराट कोहली बाद झाला. त्या सामन्याअगोदर मी चांगली फलंदाज केली नव्हती. विचार केला की अपयशाला कशाला घाबरायचे. जास्तीत जास्त काय होईल मी बाद होईन. मग काय ठरल्या योजनेप्रमाणे मी फलंदाजीकरिता तयार झालो आणि तरातरा मैदानात उतरलो.
काही वेळ खेळपट्टीवर घालवल्यावर एका फटक्‍यावर दोन धावा पळायची शक्‍यता लक्षात घेऊन मी जोरात धावलो. नॉन स्ट्रायकिंग एंडला वळून परत पळताना माझा पाय घसरला आणि मला दुसरी धाव पळता आली नाही. मी स्वत:वर जाम चिडलो की, असा कसा मी मोक्‍याच्या सामन्यात पळताना पाय घसरून पडलो. म्हणून मी बुटांचे खिळे बरोबर आहेत ना बघायला पाय उचलला. पाय हिरवळीवर पडलेल्या दवाने भिजून गच्च भरला होता. मग मलाच हसू आले. मी ओव्हर संपल्यावर गौतम गंभीरला म्हणालो की, गौती आता आपण पुढच्या काही ओव्हर्स फक्त चेंडू जमिनीलगत मारून पळून धावा काढूयात. मैदानात दव पडले आहे. चेंडू गवतावरून मारला आणि ओला झाला की ना मलिंगा चेंडू स्विंग करून शकेल की मुरलीधरन वळवू शकेल. अब हमें कोई हरा नहीं सकता.
ठरल्याप्रमाणे आम्ही हिरवळीवरून चेंडू मारत धावा जमा केल्या. ज्याने चेंडू भरपूर ओला व्हायला लागला. कितीही पुसला तरी त्याची ओलसरपणा पूर्णपणे जात नाही हे श्रीलंकन गोलंदाजांना कळून चुकले. खेळपट्टीवर दव पडल्याने टप्पा पडल्यावर चेंडू मस्त बॅटवर यायला लागला. शतकी भागीदारी करून गंभीरसोबत मी सामना आटोक्‍यात आणला आणि मग युवराजसोबत भागीदारी करून सामना हाती घेतला. विजयी फटका मी कसा मारला माझे मलाच समजले नाही, इतका तो सहजी बॅटमधून निघाला. मी जणू विचारात मग्न होतो. सामना आम्ही जिंकला हेसुद्धा मला पटकन लक्षात आले नाही. युवराजने येऊन मला घट्ट मिठी मारली तेव्हा ध्यानात आले की आम्ही विश्‍वविजेते झालो आहोत.

लेस सुटली आणि गंमत झाली
(जाँटी ऱ्होडस्‌)

वर्णद्वेषाची राजवट गेली आणि १९९० ला दक्षिण आफ्रिकन संघाला क्रिकेटजगतात पुनरागमन करायची संधी मिळाली. लगेचच १९९२ मधील वर्ल्डकप आला. सगळ्या क्रिकेटजगताच्या नजरा पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघावर होत्या. त्याच वर्ल्डकप स्पर्धेत विविध फलंदाज आणि गोलंदाज चमकले, पण सगळ्यांच्या स्मरणात राहिला तो क्षण जेव्हा जाँटी ऱ्होडस्‌ने इंझमाम उल हकला रनआउट केले. त्याच क्षणाबद्दल स्वत: जाँटी ऱ्होडस्‌ म्हणाला...
केपलर वेसेल्सच्या नेतृत्वाखाली दर्जेदार दक्षिण आफ्रिकन संघात मला जागा मिळाली हीच आश्‍चर्याची बाब होती. एव्हाना माझ्या क्षेत्ररक्षणातील प्रावीण्याची चर्चा व्हायला लागली होती. संघात मी फलंदाज म्हणून खेळत होतो. अगदी प्रांजळ कबुली द्यायची तर भरपूर धावा मला करता येत नव्हत्या. फलंदाजीतील कमतरता किंवा अपयश चपळ क्षेत्ररक्षण करून पुसायचा मी प्रयत्न करायचो. मला आठवतो तो सामना जेव्हा आम्ही पाकिस्तानसमोर ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर खेळत होतो. दर्जेदार पाकिस्तानी गोलंदाजांनी आम्हाला २११ धावांवर रोखले होते.
आमच्या गोलंदाजीची वेळ आली तेव्हा चांगल्या सुरुवातीनंतर आम्हाला पाठोपाठ दोघा सलामीच्या फलंदाजांना बाद करता आले होते. मग कर्णधार इम्रान खान आणि गुणवान तरुण फलंदाज इंझमाम उल हकची जोडी जमली. दोघांनी सुंदर फलंदाजी करत आम्हाला संधी नाकारली. भागीदारी रंगली असताना एक चेंडू इंझमामच्या पायावर आदळला. चोरटी एकेरी धावा आहे असा विचार करून इंझमाम पळाला तेव्हा मी वेगाने पुढे पळत येत चेंडू पकडला ते बघून इम्रान खानने धाव पळायला नकार दिला. मला वाटले की इंझमामला केवळ चपळाईत मागे टाकून मी चेंडू फेकण्यापेक्षा पळत जाऊन त्याला रनआउट करेन. अपेक्षेपेक्षा इंझमाम पटकन उलटा फिरला. एव्हाना मी चेंडू यष्टींवर फेकायच्या निर्णयापासून लांब गेलो होतो. मग माझ्यासमोर एकच उपाय होता तो म्हणजे यष्टीपासून ८-१० फुटांवरून उडी मारून स्टंपवर झेप घ्यायची. तो विचार पक्का झाला, नेमकी तेव्हाच माझ्या उजव्या बुटाची लेस किंचित सुटली. माझा डावा पाय त्यात अडखळला. त्याचा फायदा असा झाला की माझी उडी लांब झाली आणि उजव्या हातात चेंडू धरत मी तिन्ही यष्टी उडवल्या. फोटोग्राफरचे लक्ष इंझमाम होते, त्याच्या फ्रेममधे मी उगाच घुसलो. नंतर तो फोटो जगात खूप गाजला. बुटाची लेस किंचित ढिली झाली आणि माझी उडी लांब गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com