World Cup 2019 : 'गब्बर'ने ठोकावा शड्डू (सुवजीत मुस्तफी)

suvajit mustafi
suvajit mustafi

विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा...

विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाली आहे. इकडे क्रिकेटप्रेमींना अनेक प्रश्‍न पडले आहेत. कोहली-रोहित धडाकेबाज फॉर्म राखणार का? धोनी आयपीएलप्रमाणेच चमकदार कामगिरी कायम ठेवणार का? कुलदीप-चहलची फिरकी दुकली जगातील सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्यांना चकवणार का? बुमरा-शमी, बुमरा-भुवी यापैकी कोण जास्त भेदक ठरणार? चौथ्या नंबरवर कोण खेळणार?
अशा चर्चेत संघातील एक महत्त्वाचा दुवा नेहमीच दुर्लक्षित राहतो, जो भारताच्या मोहिमेत निर्णायक फरक पाडू शकतो व तो म्हणजे शिखर धवन!
128 सामने, 5,355 धावा, 44.6 ऍव्हरेज, 143 सर्वोच्च, 93.8 स्ट्राईक रेट, 16 शतकं, 27 अर्धशतकं अशी त्याच्या कारकीर्दीची आकडेवारी आहे.

विशेष नोंद ः वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, राहुल द्रविड, गौतम गंभीर, महेंद्रसिंह धोनी आणि महंमद अझरुद्दीन यांच्यापेक्षा त्यानं जास्त शतकं काढली आहेत.
आता आपण 2015 च्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊ या. सिडनीतील स्टेडियममध्ये पिवळ्या जर्सींपेक्षा निळ्या जर्सींची संख्या जास्त आहे. मिचेल जॉन्सन विरुद्ध विराट कोहली लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. डावखुऱ्या स्टार्कनं आखूड टप्प्याचा चेंडू टाकत विराटला चुचकारलं. विराटचा "इगो' दुखावला गेला. त्यानं त्वेषात प्रत्युत्तर दिलं; पण त्याचा "पूल' चुकला. उंच झेल उडून यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनच्या हातात स्थिरावला. क्रिकेटमधील सर्वोच्च प्रतिष्ठेचा "कप' भारताच्या हातून निसटत होता, तर कांगारूंचं आणखी एक सोनेरी यश साकार होत होतं.
विराटचं अपयश आणि अनुष्का शर्माची उपस्थिती यावरून बरंच "ट्रोलिंग' झालं. क्रिकेटच्या संदर्भात मात्र खेळातील निर्णायक क्षण 16 चेंडूंपूर्वी घडला होता. 329 धावांच्या आव्हानासमोर भारतानं 12.4 षटकांत बिनबाद 76 अशी सुरवात केली होती. धवननं जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध त्यांच्याच मैदानावर तोफ डागली होती. धवननं दहाव्या षटकात जेम्स फॉकनरला सलग दोन चौकार व एक षटकार खेचला होता. 12 व्या षटकापर्यंत त्यानं आक्रमण सुरू ठेवलं. पुढील षटकात मात्र जॉश हेझलवूडचा चेंडू घाईनं डीप एक्‍स्ट्रॉ कव्हरला फटकावण्याच्या प्रयत्नात धवनचा ग्लेन मॅक्‍सवेलकडे झेल गेला. धवनच्या 41 चेंडूंमधील 45 धावा निराशाजनक धावफलकात उल्लेखनीय ठरल्या. तोच आशेचा एकमेव किरण होता. भारताची सात विजयांची यशोमालिका खंडित होऊन मोहीम फसली होती.
***
त्यानंतर वर्षभराच्या आत याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध कॅनबेरातील सामन्यात 349 धावांचा पाठलाग करायचा होता. 38 व्या षटकात 2 बाद 277 अशी भक्कम स्थिती होती. विराट आणि धवनची शतकं झाली होती. "76 चेंडूंत 72 धावा' असं समीकरण होतं. पारडं कुणाचं जड होतं हे सांगण्याची गरज नव्हती, तोच धवन बाद झाला. अखेरीस भारताचा डाव 323 धावांत आटोपला. अशा अनेक वेळा धवनची विकेट निर्णायक ठरली आहे.
चांगले खेळाडू प्रामुख्यानं झटपट क्रिकेटमध्ये भरपूर चौकार मारू शकतात. धवन हा शैलीदार फलंदाज आहे. तो "ऑफ'ला भक्कम खेळ करू शकतो आणि सुतराम शक्‍यता वाटत नसताना "गॅप' काढू शकतो. चेंडूचा अंदाज आधी घेण्याची निसर्गदत्त देणगी त्याला लाभली आहे. "लेग'चा त्याचा खेळही संघटित असतो. मग वर्तुळातील क्षेत्ररक्षकांच्या डोक्‍यावरूनही तो चेंडू फटकावू शकतो, पूल किंवा स्वीप तो सफाईनं करू शकतो.
धवनविषयी प्रेक्षकांची भावना आनंद-निराशा अशा टोकाची असते. सातत्य आणि दृष्टिकोनाबद्दल सर्वांनाच विराटचं कौतुक वाटू शकतं. धवनच्या फलंदाजीबाबत मात्र "वाह' अशी प्रतिक्रिया जास्त असते. सौरव गांगुलीप्रमाणे तो मनगटाचा कलात्मक वापर करून आकर्षक फटके मारू शकतो. त्याच्या दृष्टिकोनात सेहवागइतकी बेफिकिरी नाही. धवनच्या आकर्षक शैलीत दोन मुख्य त्रुटी आहेत आणि त्या म्हणजे दृष्टिकोन आणि क्रीजवरील फूटवर्क. "सीम' अन्‌ "स्विंग' होणारे चेंडू ही त्याची डोकेदुखी ठरू शकते. अर्थात इंग्लंडमध्येच 1999 मध्ये झालेल्या स्पर्धेच्या तुलनेत हा विश्‍वकरंडक सर्वस्वी वेगळा असेल. त्यानंतरच्या वर्षांत इंग्लंडमधील खेळपट्ट्या ठणठणीत झाल्या आहेत, ज्या धवनच्या शैलीला अनुकूल ठरतील.

आयसीसी स्पर्धा आवडत्या
धवनला कामगिरी उंचावण्यासाठी "आयसीसी'च्या विश्‍वकरंडक व चॅंपियन्स ट्रॉफी या स्पर्धा आवडतात. भारताच्या "टॉप टेन' यादीत धावांच्या निकषावर त्याचा सातवा क्रमांक आहे; पण त्याच्यावर असलेल्या खेळाडूंच्या तुलनेत बरेच कमी सामने खेळूनही त्याच्या धावा त्या तुलनेत फार कमी नाहीत. धवननं 18 सामन्यांत 1113 धावा काढल्या आहेत, तर द्रविडनं 41 सामन्यांत 1487, सेहवागनं 32 सामन्यांत 1232, तर विराटने 30 सामन्यांत 1116 धावा अशी कामगिरी केली आहे. धवनचा स्ट्राईक रेट उल्लेखनीय आहे. 2013 च्या चॅंपियन्स ट्रॉफीत त्यानं "स्पर्धावीर' पुरस्कार मिळवला. त्यानं 101.4 च्या स्ट्राइकरेटनं 363 धावा केल्या. त्या स्पर्धेत 300 चा टप्पा पार केलेला तो एकमेव होता. 2015 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यानं भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. 2017 च्या चॅंपियन्स ट्रॉफीत तो सर्वोत्तम फलंदाज ठरला. खरं तर आयसीसी स्पर्धांतील त्याची यशोमालिका युवापातळीपासूनच सुरू झाली. 2004 च्या युवा विश्‍वकरंडकात त्यानं सर्वाधिक 505 धावा केल्या. यात तीन शतकांचा समावेश होता. त्याचा 84.2 स्ट्राईक रेटही सर्वोत्तम होता. तेव्हा इंग्लंडचा ऍलिस्टर कूक (383) दुसरा होता. उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध मात्र धवन केवळ आठ धावा करू शकला. त्या वेळी "स्पर्धेचा मानकरी' अर्थातच धवन ठरला.

धवनच्या धडाक्‍यामुळं रोहितला स्थिरावण्यास वेळ मिळतो. गेल्या वर्षी धवननं आशिया करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळवला. त्यानंतर त्याच्या फॉर्मला ओहोटी लागली. आयपीएलमध्ये मात्र दिल्ली कॅपिटल्सकडून त्यानं भरीव कामगिरी केली. आधुनिक वन-डेमध्ये धवनची सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. तो "प्रमुख फळीत पुढाकार घेणारा फलंदाज' ही भूमिका पुढं सुरू ठेवेल. त्याचं सातत्य कदाचित कमी होऊ शकेल; पण ही "आयसीसी'ची स्पर्धा आहे, म्हणजे धवनचा प्रांत आहे. त्यानं मिश्‍यांना पीळ द्यावा आणि शड्डू ठोकावा, तसं दृश्‍य वारंवार दिसायला मिळो, जे भारताच्या फायद्याचे ठरेल. "गब्बर'च्या "आयसीसी' स्पर्धांतील सातत्याला जगज्जेतेपदाच्या रूपानं प्रमाणपण मिळो हीच सदिच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com