भूपतीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल - पेस

- मुकुंद पोतदार
Thursday, 2 February 2017

पुणे - महेश भूपती कर्णधार झाल्यामुळे त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मला आवडेल, असे वक्तव्य करीत लिअँडर पेसने रॅकेट म्यान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पेस आणि भूपती यांची जोडी एकत्र येऊन अव्वल बनून तुटणे आणि पुन्हा एकत्र येऊन विघटित होणे इतके सारे घडले आहे. अशावेळी पेसचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले.

पुणे - महेश भूपती कर्णधार झाल्यामुळे त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळायला मला आवडेल, असे वक्तव्य करीत लिअँडर पेसने रॅकेट म्यान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. पेस आणि भूपती यांची जोडी एकत्र येऊन अव्वल बनून तुटणे आणि पुन्हा एकत्र येऊन विघटित होणे इतके सारे घडले आहे. अशावेळी पेसचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी पेसने बुधवारी सराव केला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. पेसला या लढतीत विक्रमाची संधी आहे. त्याचवेळी त्याने निवृत्त व्हावे, असे मत अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस हिरण्मय चटर्जी यांनी व्यक्त केले आहे. भूपती कर्णधार झाल्यामुळे पेसला संघात संधी मिळणार का, इथपर्यंत चर्चा झडत आहे. या पार्श्वभूमीवर पेस म्हणाला की, भूपतीबरोबर मी बराच खेळलो. आता तो मला मार्गदर्शन करेल.

प्रतिस्पर्धी जोडी कशी आहे, सर्व्हिसच्या वेळी चेंडू कसा टॉस होतो आहे, आदींविषयी तो टिप्स देईल.

मला टेनिस खेळायला आवडते. मी तंदुरुस्त आहे, आनंदी आहे. तोपर्यंत मी खेळत राहणार. लोकांना काय वाटते, याची फिकीर करीत नाही. त्याचा विचार केला असता तर एकही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकू शकलो नसतो. मला कुणासाठीच काही सिद्ध करून दाखवायचे नाही, असे प्रत्त्युत्तरही त्याने टीकाकारांना दिले. मला आणखी संधी मिळेल का, की मिळणार नाही, हा वेगळा प्रश्‍न आहे. अर्थात देशासाठी खेळण्याकरिता पाचारण केले जाईल तेव्हा मी उपलब्ध असेल, असे सांगत त्याने निवृत्तीचे पुन्हा एकदा खंडन केले.

विक्रमाच्या संधीविषयी आणि जोडीदाराविषयी पेस म्हणाला की, साकेत मायनेनीच्या तंदुरुस्तीचा कर्णधाराला अंदाज घ्यावा लागेल. मला विक्रमासाठीच नव्हे तर देशासाठी सर्वोत्तम जोडीदारासह खेळायला आवडेल. साकेतने स्पेनविरुद्धच्या लढतीत सुवर्णपदक विजेत्या जोडीविरुद्ध झुंजार खेळ केला.

रामकुमार रामनाथन याच्यासाठी मोसमाचा प्रारंभ चांगला ठरला नाही, तो दडपणाखाली होता, पण मी त्याच्याशी संवाद साधला. त्याला पाठीवर थोपटले आणि सांगितले की, जा कोर्टवर उतर आणि धडाधड चेंडू मार. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता तो जोशात सराव करीत आहे, असेही पेसने नमूद केले.

युकीला खेळवावेच
सलामीच्या एकेरीत युकी भांब्रीने खेळायलाच हवे, असे आग्रही मत त्याने व्यक्त केले. तो म्हणाला की, युकी चांगल्या फॉर्मात आहे. तो तंदुरुस्त झाला आहे. चेन्नई आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांत त्याने उल्लेखनीय खेळ केला. तो काही अटीतटीचे सामने खेळला. त्याने ऑस्ट्रेलियन ज्युनियर जिंकले तेव्हाच मी भाकीत केले होते की, वरिष्ठ पातळीवरसुद्धा हा मुलगा गुणवत्ता प्रदर्शित करेल. त्याच्या वाटचालीत कुटुंबीयांचा त्यागही महत्त्वाचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhupathi's leadership would love to play