esakal | रामकुमार रामनाथनला युकी भांब्रीकडून शह
sakal

बोलून बातमी शोधा

रामकुमार रामनाथनला युकी भांब्रीकडून शह

रामकुमार रामनाथनला युकी भांब्रीकडून शह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेन्नई - भारताच्या युकी भांब्रीने देशबांधव रामकुमार रामनाथन याला 6-1, 6-1 असा जोरदार शह देत चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. रामकुमारला "वाइल्ड कार्ड'द्वारे प्रवेश मिळाला होता, तर युकीने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. "टेनिस एल्बो'च्या दुखापतीमुळे युकी सहा महिने कोर्टपासून दूर होता. वर्षाच्या अंतिम टप्यात तो तंदुरुस्त झाला. त्याने पूर्वतयारी कसून केल्याचे दिसून आले. रामकुमारच्या खेळात सातत्य नव्हते.

रामकुमारने सांगितले, की माझी "फर्स्ट सर्व्ह' चांगली होत नव्हती. हा दिवस वाईट ठरला. मला याविषयी फार काही बोलायचे नाही. युकीने भक्कम खेळ केला. त्याने पहिल्या गेमपासून पकड घेतली. त्याने धुर्त खेळ केला. मी प्रेक्षकांची निराशा केल्याची जाणीव आहे. मला काही दिवस "ब्रेक' घेऊन कसून सराव करावा लागेल.'

हा सामना 52 मिनिटे चालला. युकीने सर्व्हिसवर केवळ सात गुण गमावले. पहिल्या सेटमध्ये त्याने दोनच गुण गमावले. हा सेट त्याने 26 मिनिटांत जिंकला.

युकीचा हा एटीपी टूरवरील फेब्रुवारीनंतरचा पहिलाच सामना होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीत दुबईत तो पहिल्या फेरीत हरला होता. त्याने नेटजवळ धाव घेत जोरदार खेळ केला. युकीची आता फ्रान्सच्या बेनॉईट पैरेशी लढत होईल. पैरे क्रमवारीत 47वा आहे. पैरेने रशियाच्या कॉंस्टंटीन क्रावचूकला 6-3, 6-4 असे हरविले.