सिमोना हालेपचा ‘मास्टर स्ट्रोक’

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

खरंच सांगते, अजूनही माझा विश्‍वास बसत नाहीये. अखेरच्या गेमला तर मी मोकळा श्‍वास घेऊ शकत नव्हते. जेवढे मला करणे शक्‍य होते, तेवढे प्रयत्न केले. त्यानंतर जे काही घडले आहे, ते केवळ अवर्णनीय आहे.
-सिमोना हालेप

पॅरिस - रुमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हालेप हिने कारकिर्दीमधील एक जबरदस्त ‘मास्टर स्ट्रोक’ मारताना शनिवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. हालेपने अमेरिकेच्या स्लोआनी स्टिफन्स हिचे आव्हान ३-६, ६-४, ६-१ असे परतवून लावले. हालेपचे हे पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. 

कमालीचा संयमी खेळ हेच हालेपच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पहिला सेट सहज गमाविल्यानंतरही सिमोनाची एकाग्रता भंग पावली नव्हती. कमालीचा अचूक खेळ करताना तिने नंतरच्या दोन्ही सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. सिमोनाची सर्व्हिस कमालीची अचूक होती. तिच्याकडून एकही ‘डबल फॉल्ट’ झाला नाही. अर्थात, स्लोआनीचीदेखील सर्व्हिस अचूक होती; पण तिला फटक्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयशच तिच्या पराभवास कारणीभूत ठरले.

एखादी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारी सिमोना रुमानियाची ४० वर्षांतील पहिली टेनिसपटू ठरली. यापूर्वी १९७८ मध्ये येथेच रुमानियाच्या व्हर्जिनिया रुझीशी हिने विजेतेपद मिळविले होते. 

अंतिम लढतीत स्लोआनीने पहिला सेट जिंकून झकास सुरवात केली होती; पण नंतर कोर्टवर वेगळेच घडले. सिमोनाने अचूकतेला आक्रमकतेची जोड देत स्लोआनीवर दडपण आणले. दुसरा सेट गमावल्यावर स्लोआनीवर निर्णायक गेममध्ये हे दडपण इतके वाढले होते की ती एकवेळ ५-० अशी मागे होती. यानंतर तिला केवळ एक गेम जिंकल्याचेच समाधान लाभले. 

Web Title: French Open Simona Halep beats tennis