'पापा फेडरर' सर्वाधिक बुजुर्ग नंबर वन! 

वृत्तसंस्था
Sunday, 18 February 2018

रॉटरडॅम : स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडरर याने जागतिक क्रमवारीत सर्वाधिक वयात अव्वल स्थान मिळविण्याचा पराक्रम केला. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली.

एबीएन ऍम्रो जागतिक टेनिस स्पर्धेत नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीला 4-6, 6-1, 6-1 असे हरवून उपांत्य फेरी गाठत त्याने अव्वल क्रमांक नक्की केला. सोमवारी जाहीर होणाऱ्या अद्ययावत क्रमवारीत स्पेनचा प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल याला त्याने मागे टाकलेले असेल.

दोन जुळ्या मुली आणि दोन जुळ्या मुलांचा पिता असलेल्या फेडररची कामगिरी टेनिसच्याच नव्हे तर आधुनिक क्रीडा इतिहासातील सोनेरी पान ठरेल. 

एक तास 29 मिनिटे चाललेल्या सामन्यात फेडररची सुरवात खराब झाली. पहिला सेट गमावल्यामुळे तो पिछाडीवर पडला, पण त्याने नंतर दोनच गेम गमावले. त्याने सहा बिनतोड सर्व्हिस केल्या. फेडररची यानंतर इटलीच्या अँड्रीयस सेप्पी याच्याशी लढत होईल. 

फास्ट फॉरवर्ड फेडरर 

  • फेडररचे वय 36 वर्षे व 195 दिवस. 
  • आंद्रे आगासी 2003 मध्ये 33 वर्षे व 131 दिवसांचा अव्वल होता. 
  • फेडरर ऑक्‍टोबर 2012 नंतर प्रथमच अव्वल. 
  • सर्वप्रथम 2004 मध्ये अव्वल क्रमांकाचा बहुमान. 
  • गेल्या वर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे प्रदीर्घ ब्रेक. 
  • यंदा जानेवारीत 17व्या क्रमांकापर्यंत घसरण. 
  • ऑस्ट्रेलियन जेतेपद राखून कारकिर्दीतील 20वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद. 

वयाच्या या टप्प्यास ही कामगिरी करणे फार छान वाटते. मी जवळपास 37 वर्षांचा आहे. 1998 मध्ये याच स्पर्धेत मला पहिले 'वाइल्ड कार्ड' मिळाले होते. तेथेच ही कामगिरी साकार होणे आनंददायक आहे. अव्वल क्रमांक ही टेनिसमधील परमोच्च कामगिरी आहे. जेव्हा तुमचे वय जास्त असते तेव्हा दुप्पट सराव करावा लागतो. कसून सराव केलेल्या दुसऱ्या कुणाला तरी मागे टाकून तुम्हाला हा क्रमांक कमवावा लागतो. पुन्हा नंबर वन बनणे अनोखे आहे. या वाटचालीमुळे माझे स्वप्न साकार झाले आहे. 
- रॉजर फेडरर 

36 वर्षे आणि 195 दिवसांनीसुद्धा रॉजर फेडररनामक क्रीडापटू आमच्या खेळामधील मापदंड उंचावतो आहे. आणखी एका अतुलनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!! 
- आंद्रे आगासी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Roger Federer Tennis Rafel Nadal