सेरेना-शारापोवा चौथ्या फेरीत आमनेसामने?

वृत्तसंस्था
Saturday, 26 May 2018

पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते. 

पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते. 

36 वर्षांची सेरेना गुंतागुंतीच्या बाळंतपणानंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करेल, तर ड्रग टेस्टवरील बंदी संपल्यानंतर शारापोवा या स्पर्धेत प्रथमच खेळेल. या दोघींत 2013 मध्ये अंतिम सामना झाला होता. त्यात सेरेनाची सरशी झाली होती. सेरेनाने तीन वेळा, तर शारापोवाने दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. सेरेनाची सलामी चेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना प्लिस्कोवा हिच्याशी असेल. शारापोवा पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या प्रतिस्पर्ध्याशी खेळेल. सेरेनाची क्रमवारीत 453व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून कारकिर्दीतील 23वे विजेतेपद पटकावले. 

पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच याची सलामी पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या प्रतिस्पर्ध्याशी असेल. चौथ्या फेरीत त्याची ग्रिगॉर दिमित्रोव याच्याशी लढत होऊ शकते. 

अलेक्‍झांडरला खडतर ड्रॉ 
ग्रॅंड स्लॅम यशाची प्रतीक्षा असलेल्या जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेव याला दुसरे मानांकन आहे. त्याच्यासाठी ड्रॉ खडतर ठरला. जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉव्रींका यांच्यासह ऑस्ट्रीयाचा डॉमनिक थिम हे मातब्बर त्याच्याच "ड्रॉ'च्या भागात आहेत. 

नदालला ड्रॉ सोपा 
रोलॉं गॅरोवर 11वे विजेतेपद मिळविण्याच्या मोहिमेवर असलेल्या रॅफेल नदाल याच्यासाठी ड्रॉ सोपा आहे. त्याची सलामी 54व्या स्थानावरील अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याच्याशी होईल. नऊ सामन्यांत त्याने सातवेळा डोल्गोपोलोवला हरविले आहे. रोममधील विजेतेपदासह नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. नदाल म्हणाला की, "पॅरीसमध्ये आल्यानंतर नेहमीच खास वाटते. कारकिर्दीतील अनेक सुंदर क्षण येथे आले आहेत.' ड्रॉनुसार तिसऱ्या फेरीपासून अनुक्रमे रिचर्ड गास्के, डेनिस शापोवालोव, केव्हीन अँडरसन आणि मरिन चिलीच असे नदालचे प्रतिस्पर्धी असू शकतात. 

प्रमुख लढती 

  • अग्रमानांकित व दोन वेळच्या उपविजेत्या रुमानियाच्या सिमोना हालेप अमेरिकेच्या ऍलीसन रिस्केविरुद्ध खेळणार 
  • गतविजेती लॅट्वियाची जेलेना ऑस्टापेन्को युक्रेनच्या कॅटरीना कॉझ्लोवा हिच्याविरुद्ध झुंजणार 
  • द्वितीय मानांकित व ऑस्ट्रेलियन विजेती डेन्मार्कची कॅरोलीन वॉझ्नियाकी हिची अमेरिकेच्या डॅनिएली कॉलीन्सविरुद्ध सलामी 
  • 2015चा विजेता स्टॅन वॉव्रींका स्पेनच्या गुलेर्मो गार्सिया लोपेझविरुद्ध खेळणार 
  • 2016ची विजेती गार्बीन मुगुरुझा आणि 2009ची विजेती स्वेतलाना कुझ्नेत्सोवा यांच्यात लढत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maria Sharapova may have to face Serena Williams in fourth round of French Open Tennis