शारापोवाची रोममध्ये विजयी सलामी

वृत्तसंस्था
Wednesday, 17 May 2017

या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास तिला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळू शकेल. 'ड्रग टेस्ट'मध्ये दोषी आढळल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर शारापोवाने पुनरागमन केले.

रोम : रशियाच्या मारिया शारापोवाने रोम डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने अमेरिकेच्या ख्रिस्तीना मॅक्‌हेल हिला 6-4, 6-2 असे हरविले. या विजयामुळे तिला विंबल्डनच्या पात्रता फेरीत प्रवेश मिळू शकेल. 

शारापोवाला या स्पर्धेत 'वाइल्ड कार्ड'द्वारे प्रवेश मिळाला आहे. सामन्याच्या सुरवातीला 17 मिनिटांत तीन ब्रेकची नोंद झाली. ख्रिस्तीनाने सुरवातीलाच ब्रेक मिळवीत 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र शारापोवाने खेळ उंचावला.

तिने ख्रिस्तीनाची सर्व्हिस सात वेळा भेदली. तिने कारकिर्दीत सर्व पाच सामन्यांत ख्रिस्तीनाला हरविले आहे. हा सामना तिने 90 मिनिटांत जिंकला. सात 'डबल-फॉल्ट' हेच थोडेफार काळजीचे कारण ठरले. दुसऱ्या सेटमध्ये 5-1 अशा आघाडीनंतर तिने सर्व्हिस गमावली; पण पुढील गेममध्ये तिने भरपाई केली. 

या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास तिला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळू शकेल. 'ड्रग टेस्ट'मध्ये दोषी आढळल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर शारापोवाने पुनरागमन केले. स्टुटगार्ट, माद्रिद आणि रोम अशा तीन स्पर्धांत तिला 'वाइल्ड कार्ड'मुळे प्रवेश मिळाला. स्टुटगार्टमध्ये तिने उपांत्य; तर माद्रिदमध्ये दुसरी फेरी गाठली. 

या स्पर्धेत शारापोवा नवव्या वेळी सहभागी झाली आहे. तिने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2011, 12 व 15 या वर्षी ती विजेती ठरली. क्‍ले कोर्टवर तिने 11 डब्ल्यूटीए स्पर्धा जिंकल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maria Sharapova may qualify for Wimbledon