
ॲकापुल्को (मेक्सिको) - ऑस्ट्रेलियाचा बॅड बॉय निक किर्गिओस याने मेक्सिको ओपन स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली. त्याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याचा ७-६(११-९), ७-५ असा पराभव केला.
ॲकापुल्को (मेक्सिको) - ऑस्ट्रेलियाचा बॅड बॉय निक किर्गिओस याने मेक्सिको ओपन स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली. त्याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याचा ७-६(११-९), ७-५ असा पराभव केला.
या दोघांमधील ही आजपर्यंतची पहिलीच लढत होती. ऑस्ट्रेलियाच्या २१ वर्षीय किर्गिओस याने आपल्या ताकदवान सर्व्हिसने सातत्याने जोकोविचवर दडपण ठेवले. त्याने सामन्यात २१ बिनतोड सर्व्हिस करून जोकोविचला संधीच दिली नाही. किर्गिओसने आपल्या फर्स्ट सर्व्हिसवर ८१ टक्के यश मिळविले. ही लढत १ तास ४७ मिनिटे चालली. उपांत्य फेरीत आता त्याची गाठ सॅम क्युरेशी पडणार आहे. स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत रॅफेल नदाल आणि मरिन चिलीच यांच्यात होईल.
विजयानंतर किर्गिओस म्हणाला, ‘‘हा मोठा विजय आहे. जोकोविचशी माझा पहिलाच सामना होता. त्यामुळे मी काहिसा दडपणाखाली होतो. पण, पूर्ण आत्मविश्वासाने खेळलो. माझ्या विजयात सर्व्हिस निर्णायक ठरली. माझ्यामते इतकी अचूक सर्व्हिस प्रथमच झाली असावी.’’
सॅम क्युरे सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचला आहे. गेल्यावर्षी त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. या वेळी उपांत्यपूर्व फेरीतच क्युरेने गेल्यावर्षीच्या पराभवाची परतफेड केली. त्याने अवघ्या ६६ मिनिटांत लढत जिंकली. अन्य एका लढतीत नदालने जपानच्या निशिओका याचे आव्हान जवळपास दोन तासांत संपुष्टात आणले. घोट्याच्या दुखापतीमुळे स्टिव्ह जॉन्सनने मरिन चिलिचला पुढे चाल दिली.
अन्य निकाल : रॅफेल नदाल वि. वि. योशिहितो निशिओका ७-६(७-२), ६,३, मरिन चिलीच वि. वि. स्टिव्ह जॉन्सन (पुढे चाल), सॅम क्युरे वि. वि. डॉमिनिक थिएम ६-१, ७-५
असाही योगायोग
निक किर्गिओस आपल्या आक्रमक खेळाबरोबर कोर्टबाहेरील वर्तनाने अधिक गाजला. पण, त्याची कारकीर्द एका विलक्षण योगायोगाने लक्षात राहील. जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असणाऱ्या किर्गिओसने रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल यांच्यावरही त्यांच्याबरोबरच्या पहिल्या सामन्यात विजय मिळविला आहे. त्याने नदालला २०१४ विंबल्डन, तर फेडररला २०१५ मध्ये माद्रिद ओपन स्पर्धेत हरवले होते.