पेस-भूपतीला भेटून वाद मिटवेन - गोयल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 April 2017

नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते लवकरच दोघांना भेटणार आहेत.

नवी दिल्ली - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वादाचे पडसाद केंद्र सरकारच्या पातळीवरही उमटले. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी याची दखल घेतली आहे. हा वाद मिटावा म्हणून पुढाकार घेण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते लवकरच दोघांना भेटणार आहेत.

डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेतील आशिया-ओशेनिया विभागातील उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी पेसला कर्णधार भूपतीने वगळले. "पेसने चिडण्याचे कारण नाही, कारण रोहन बोपण्णा दुहेरीतील अव्वल खेळाडू आहे,' असे स्पष्ट करून भूपतीने, "आमची कार्यपद्धती आवडत नसेल तर संघापासून दूर राहावे,' अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पेसने म्हटले आहे, 'मला संघात खेळविणार नाही असे भूपतीने स्पष्टपणे सांगितलेच नाही.'' त्यावर भूपतीने प्रत्युत्तर दिले, 'संघातील स्थान नक्की असेल असे आश्‍वासन मी पेसला कधीच दिले नव्हते.'' पेसशी "व्हॉट्‌सऍप'वर झालेले खासगी संभाषणही त्याने फेसबुकवर टाकले. माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत असल्यामुळे वादात भर पडली आहे.

या पार्श्‍वभूमीवर गोयल यांनी सांगितले, 'संघ कसा निवडायचा हा अधिकार कर्णधाराचा आहे. दोन खेळाडूंमधील वादाबाबत बोलायचे झाल्यास मी दोघांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.''

या वादामुळे भारताचा 4-1 असा विजय झाकोळला गेला का, या प्रश्‍नावर गोयल म्हणाले, 'मला तसे वाटत नाही; पण या दोघांमध्ये काहीतरी मतभेद आहेत, असे लोकांचे मत का बनले आहे, हे मी त्यांना भेटून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन.''

खेळासंदर्भात मात्र मी हस्तक्षेप करणार नाही, कारण खेळासाठी काय चांगले आहे याचा निर्णय कर्णधाराचा असतो, असे त्यांनी पुन्हा नमूद केले.

अमृतराज यांच्याशी चर्चा
माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी गोयल यांची भेट घेतली. "भारतीय टेनिसच्या विकासाचा कृती आराखडा' या विषयावर त्यांनी चर्चा केली. गोयल म्हणाले, 'रिओ ऑलिंपिकनंतर मी अनेक माजी खेळाडूंना भेटून त्यांची मते जाणून घेत आहे. त्यासाठीच अमृतराज यांना भेटलो. ते महान टेनिसपटू आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paes-Bhupathi counsel contended erasure