
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा 21-15, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
बँकॉक (थायलंड) - थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा 21-15, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
पी. व्ही. सिंधूला पहिल्या गेममध्ये साजेसा खेळ करता आला नाही. दुसऱ्या गेममध्ये तिनं चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला पराभवाचा सामना करावा लागला. सिंधू पहिल्यांदाच या मालिकेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. 2012 साली ही मालिका जिंकणाऱ्या सायना नेहवालच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सिंधूला होती. परंतु, तिची झुंज अपयशी ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि जपानच्या नोझुमी ओकुहारा यांच्यात आतापर्यंत 11 सामने झाले असून 5 सामन्यात सिंधूला विजय मिळवता आला आहे. तर नोझुमीने 6 वेळा विजय मिळवला आहे.
सिंधूच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करुन आलेल्या नोझुमीने आक्रमक खेळ करत पहिल्या आणि दुसऱ्याही सेटवर आपलं वर्चस्व गाजवलं. सिंधूला वारंवार नेटजवळ गुंतवून ठेवत नोझुमीने झटपट गुण मिळविले. पहिल्या गेमच्या मध्यांतरापर्यंत ओकुहाराकडे 11-8 अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधू नोझुमीला आव्हान देईल अशी आशा होती. मात्र ओकुहाराने आपली पकड ढिली न होऊ देता 21-15 च्या फरकाने पहिला गेम आपल्या खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आपल्याकडे आघाडी घेतली. दुसरा गेम सुरु झाल्यानंतर काही मिनीटांमध्ये सिंधूकडे 4 गुणांची आघाडी होती. मात्र ओकुहाराने शांतपणे खेळ करत सिंधूची झुंज मोडून काढत आघाडी कमी केली. मध्यांतरानंतर ओकुहाराने दमदार पुनरागमन करत सिंधूला मागे टाकलं. अखेर 21-18 च्या फरकाने गेम जिंकत ओकुहाराने सामनाही आपल्या नावे केला.
दरम्यान, सेमीफायनलमध्ये सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली होती. तर सेमीफायनलमध्ये बेईवेन झांगचा 21-17, 21-10 असा पराभव करून ओकुहारा फायनलमध्ये पोहोचली होती.