नदालविरुद्ध फेडरर "मास्टर'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 April 2017

मोसमात सलग तिसऱ्यांदा सरशी
मायामी, फ्लोरिडा - रॉजर फेडररने कट्टर प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल याच्यावरील वर्चस्व कायम राखले. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने दोन सेटमध्येच विजय मिळविला. मोसमात सलग तिसऱ्यांदा त्याने नदालवर मात केली.

मोसमात सलग तिसऱ्यांदा सरशी
मायामी, फ्लोरिडा - रॉजर फेडररने कट्टर प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल याच्यावरील वर्चस्व कायम राखले. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने दोन सेटमध्येच विजय मिळविला. मोसमात सलग तिसऱ्यांदा त्याने नदालवर मात केली.

फेडररने पहिल्या सेटमध्ये एकमेव ब्रेकसह 5-3 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये त्याने 4-4 अशा स्थितीस ब्रेक मिळविला; मग सर्व्हिस राखत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या गेममध्ये त्याने मारलेला "स्वीपिंग बॅकहॅंड' त्याचा आत्मविश्‍वास दाखवीत होता. असे फटके त्याने सुरवातीपासून मारले.

फेडररने पहिल्या सेटमध्ये सर्व चार ब्रेकपॉइंट वाचविले, तर नदालने सहापैकी एक गमावला; पण तो पिछाडीस कारणीभूत ठरला. दुसऱ्या सेटमध्ये नदालला एकही ब्रेकपॉइंट मिळविता आला नाही.

'स्वप्न सुरूच'
फेडररने गेल्या वर्षी गुडघ्यावरील दुखापतीनंतर जवळपास अर्धा मोसम ब्रेक घेतला. त्यानंतर त्याला विलक्षण फॉर्म गवसला आहे. ऑस्ट्रेलियन विजेतेपदासह त्याने मोसमाला सनसनाटी सुरवात केली. तो म्हणाला, की "या स्पर्धेतील विजेतेपदासह स्वप्न सुरूच राहिले आहे. मोसमाला भन्नाट प्रारंभ झाला आहे. मी माझ्या "टीम'चं तसेच प्रामुख्याने मागील वर्षी आव्हानात्मक काळात मला पाठिंबा दिलेल्यांचा आभारी आहे.'

नदालचे अपयश
नदालची या स्पर्धेतील अपयशाची मालिका कायम राहिली. त्याने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली होती; पण दरवेळी त्याला पराभूत व्हावे लागले आहे. तो म्हणाला, की "कारकिर्दीत दरवेळी मला येथे छोट्या करंडकावर समाधान मानावे लागले आहे. हे निराशाजनक आहे. मी वर्षात तिसऱ्यांदा रॉजरविरुद्ध हरलो असलो तरी एकूण सुरवात चांगली आहे. मी तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे.'

नदालला यापूर्वी मेक्‍सिकन ओपन स्पर्धेतही अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या वेळी त्याला संधी होती, पण त्याने पहिल्याच गेममध्ये दोन ब्रेकपॉइंट गमावले. चौथ्या गेममध्ये त्याने दोन वाचवीत 2-2 अशी बरोबरी साधली होती. दुसऱ्या सेटमध्ये फेडररला सर्व्हिस राखण्यासाठी फारसे प्रयास पडत नव्हते. 3-3 अशा बरोबरीनंतर नदालने एक ब्रेकपॉइंट मिळविला होता. तेव्हा त्याने मुठी आवळत उडी घेत जिगरबाज जल्लोष केला. त्यानंतर तो प्रतिआक्रमण रचण्याची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही.

क्रमवारीत चौथा
या कामगिरीसह फेडररने जागतिक क्रमवारीत दोन क्रमांक प्रगती केली. आता तो चौथ्या स्थानावर आला आहे. नदाल पाचवा आहे. त्यानेसुद्धा दोन क्रमांक प्रगती केली. जपानच्या केई निशीकोरीची तीन क्रमांक घसरण झाली. तो सातवा आहे. ब्रिटनच्या अँडी मरेने अव्वल स्थान कायम राखले आहे.

फ्रेंच ओपनपर्यंत ब्रेक
फेडररने फ्रेंच ओपनपर्यंत ब्रेक घेण्याचे ठरविले आहे. तो सुमारे दोन महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असेल. फ्रेंच ओपन 28 मेपासून सुरू होणार आहे. इतक्‍या विश्रांतीमुळे फ्रेंच ओपनसाठी चांगली तयारी करता येईल, असे फेडररला वाटते. तो म्हणाला, की "तंदुरुस्ती चांगली असते तेव्हा मायामीत केला तसा खेळ करू शकतो. तंदुरुस्ती चांगली नसेल तर तर नदालविरुद्धच्या लढतीत संधी नसते. त्यामुळेच मी क्‍ले-कोर्ट मोसमात ब्रेक घेत आहे. त्यामुळे मी फ्रेंच ओपन, त्यानंतर ग्रास कोर्ट आणि नतंर हार्ड कोर्टवरील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी आता काही 24 वर्षांचा राहिलेलो नाही. त्यामुळे नियोजनात मोठा बदल होऊ झाला आहे. फ्रेंच ओपन वगळता मी कदाचित कोणत्याही क्‍ले कोर्ट स्पर्धेत खेळणार नाही.' फेडररने 2009 मध्ये फ्रेंच विजेतेपद मिळविले होते. 2015 मध्ये त्याने इस्तंबूलमधील स्पर्धा जिंकली होती. क्‍ले कोर्टवरील हे त्याचे यापूर्वीचे विजेतेपद आहे.

दृष्टिक्षेपात
- फेडरर आणि नदाल यांच्यातील पहिली लढत 2004 मध्ये याच स्पर्धेत
- उभय प्रतिस्पर्ध्यांत आतापर्यंत 37 लढती
- फेडररचा 14वा विजय, नदालची 23 वेळा बाजी
- एकाच मोसमात इंडियन वेल्स व मायामी या दोन मास्टर्स स्पर्धांत विजेतेपदाची फेडररकडून दुसऱ्यांदा कामगिरी.
- यापूर्वी 2005 मध्ये असे यश

निकाल
रॉजर फेडरर विवि रॅफेल नदाल
6-3, 6-4


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roger federer win tennis competition