सानिया-बेथानी अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 January 2017

ब्रिस्बेन - सानिया मिर्झाने अमेरिकेची जोडीदार बेथानी मॅट्टेक-सॅंड्‌स हिच्या साथीत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या जोडीने स्यू-वेई ह्‌सिह (तैवान)-लॉरा सिग्मंड (जर्मनी) यांच्यावर 6-4, 6-3 अशी मात केली. हा सामना एक तास दहा मिनिटे चालला. सानिया-बेथानी यांच्यासमोर आता द्वितीय मानांकित रशियाच्या एकातेरीना माकारोवा-एलिना व्हेस्निना यांचे आव्हान असेल. सानिया-बेथानीने पहिल्या सेटमध्ये सातपैकी तीन, तर दुसऱ्यात चार पैकी दोन ब्रेकपॉइंट जिंकले.

सानिया या स्पर्धेपुरती बेथानीबरोबर खेळत आहे. पुढील आठवड्यात सिडनीत तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती चेक प्रजासत्ताकाच्या बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत खेळेल. सानियाला विजेतेपद मिळाल्यास संमिश्र भावनेला सामोरे जावे लागेल. एकीकडे तिला जेतेपदाचा आनंद होईल, तर दुसरीकडे बेथानी तिला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल बनेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sania mirza & bethanie mattek in final