esakal | चॅंपियन्स टेनिस लीगचा पुनःश्‍च डबल फॉल्ट
sakal

बोलून बातमी शोधा

चॅंपियन्स टेनिस लीगचा पुनःश्‍च डबल फॉल्ट

चॅंपियन्स टेनिस लीगचा पुनःश्‍च डबल फॉल्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महेश भूपती भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यामुळे भारतातील टेनिस लीगमधील संघर्षास वेगळे वळण लागले आहे. भारतीय टेनिस संघटनेने चॅंपियन्स टेनिस लीगबाबतचा विजय अमृतराजबरोबरील करार संपुष्टात आणला आहे आणि पुढील वर्षीच्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता सलग दोन वर्षे ही लीग होणार नाही. 

भारतीय टेनिस संघटनेच्या कार्यकारिणीची नुकतीच त्रिसूर येथे बैठक झाली होती. त्यात गतवर्षी चॅंपियन्स टेनिस लीग न झाल्याचा मुद्दा चर्चेस आला. ही लीग घेण्याबाबत विजय अमृतराजबरोबर करार करण्यात आला होता. त्यामुळे आता गतवर्षी ही लीग न झाल्यामुळे त्याबाबतचा सेकंड सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडबरोबरील करार संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे. सेकंड सर्व्हने काही गोष्टींची योग्य पूर्तता न केल्याचेही संघटनेचे मत झाले आहे. त्यामुळे २०१८ च्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवण्यात आले आहे, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरॉन्मय चॅटर्जी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

गेल्या वर्षीची लीग न झाल्याबद्दल करार रद्द करण्याचा निर्णय जवळपास आठ महिन्यांनी झाल्यामुळे टेनिस वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी विजय अमृतराज आणि महेश भूपतीच्या टेनिस लीग झाल्या होत्या. या वर्षीही कोणतीही लीग अद्याप झालेली नाही. महेश भूपतीने लीग लांबणीवर टाकताना नोटाबंदीचे कारण दिले होते. आता या वर्षी कदाचित भूपतीची लीग होईल; पण भारतीय टेनिस संघटनेची लीग होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.