esakal | कॅनडाविरुद्धच्या पराभवाने भारताची पीछेहाट

बोलून बातमी शोधा

कॅनडाविरुद्धच्या पराभवाने भारताची पीछेहाट
कॅनडाविरुद्धच्या पराभवाने भारताची पीछेहाट
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एडमाँटन (कॅनडा) - भारतीय टेनिस संघाला डेव्हिस करंडक लढतीत आशिया-ओशियाना गट १ मधून बाहेर पडण्यात पुन्हा अपयश आले. कॅनडाविरुद्धच्या लढतीत ३-२ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ जागतिक गटापासून दूरच राहिला.

परतीच्या दोन्ही एकेरीच्या लढती भारताला जिंकण्यात अपयश आले. युकीने ब्रायडन श्‍नुरवर विजय मिळविला खरा; पण रामकुमार डेनिस शापोवालोवचे आव्हान पेलू शकला नाही. सलग चौथ्या वर्षी भारताला प्ले-ऑफ लढतीच्या पुढे जाता आले नाही. यापूर्वीच्या तीन वर्षांत भारताला अनुक्रमे सर्बिया, चेक प्रजासत्ताक आणि स्पेनविरुद्ध पराभूत व्हावे लागले.

याच तुलनेत कॅनडाने विजयाने जागतिक गटात पुन्हा प्रवेश मिळविला. या वर्षी त्यांना पहिल्या फेरीत ब्रिटनविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ आता पुन्हा आशिया-ओशियाना गट १ मधून आपली ताकद आजमावेल. 

निराशाजनक सुरवात
भारताची आजची सुरवात निराशाजनक झाली. रामकुमारला आज शापोवालोवविरुद्ध खेळताना अजिबात लय गवसली नाही. शापोवालोवच्या वेगवान फटक्‍यांसमोर त्याची सर्व्हिस आणि व्हॉलीजही निष्प्रभ ठरल्या. त्याने सुरवातीलाच सलग ११ गुण गमावले आणि तेथेच लढतीचा निर्णय स्पष्ट झाला. रामकुमारने काही वेळा अपेक्षा उंचावल्या खऱ्या, पण लढतीवर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येकवेळे त्याने कच खाल्ली. दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला हेच रामकुमारसाठी समाधान देणारे ठरले.

रामकुमारने खोलवर सर्व्हिस आणि व्हॉलीज केल्या खऱ्या, पण शापोवालोवचे अचूक रिटर्न्स त्याला नेटवर येण्याची संधीही देत नव्हते. दुसऱ्या सेटमध्ये दडपण असतानाही शापोवालोव याने अखेरच्या १५ गुणांपैकी १३ गुण जिंकले हाच फरक निर्णायक ठरला.

रामकुमारच्या पराभवाने लढतीचा निर्णय झाला होता. त्यामुळे अखेरच्या स्वारस्य न उरलेल्या लढतीत युकीने कॅनडाच्या श्‍नुरवर मिळविलेला विजय दुर्लक्षित राहिला.

निकाल -
कॅनडा ३ भारत २
डेनिस शापोवालो वि. वि. रामकुमार रामनाथन ६-३, ७-६(७-१), ६-३
युकी भांब्री वि.वि. ब्रायडन श्‍नुर ६-४, ६-४, ६-४