
प्राग (चेक प्रजासत्ताक) - चेक प्रजासत्ताकाच्या माजी विंबल्डन विजेत्या टेनिसपटू याना नोवोत्ना (वय ४९) यांचे कर्करोगामुळे निधन झाले. १९९८ मध्ये त्यांनी विंबल्डन विजेतेपद मिळविले होते. त्याआधी १९९३ मध्ये अंतिम फेरीत स्टेफी ग्राफकडून हरल्यानंतर त्या सेंटर कोर्टवर डचेस ऑफ केंट यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्या होत्या. १९९०च्या दशकातील तो क्षण टेनिसप्रेमींच्या कायम स्मरणात राहणारा आहे.
प्राग (चेक प्रजासत्ताक) - चेक प्रजासत्ताकाच्या माजी विंबल्डन विजेत्या टेनिसपटू याना नोवोत्ना (वय ४९) यांचे कर्करोगामुळे निधन झाले. १९९८ मध्ये त्यांनी विंबल्डन विजेतेपद मिळविले होते. त्याआधी १९९३ मध्ये अंतिम फेरीत स्टेफी ग्राफकडून हरल्यानंतर त्या सेंटर कोर्टवर डचेस ऑफ केंट यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्या होत्या. १९९०च्या दशकातील तो क्षण टेनिसप्रेमींच्या कायम स्मरणात राहणारा आहे.
नोवोत्ना यांनी तरुण स्टेफीविरुद्ध तिसऱ्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली होती; पण नंतर स्टेफीने सलग पाच गेम जिंकत ७-६ (६), १-६, ६-४ अशी बाजी मारली. बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी नोवोत्ना यांना दुःखावेग अनावर झाला. त्या ‘डचेस ऑफ केंट’ यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडल्या. त्या वेळी नोवोत्नाचे सांत्वन करताना त्या म्हणाल्या की, ‘काळजी करू नकोस, एके दिवशी तू विंबल्डन जिंकशील. (डोण्ट वरी, यू वील वीन थिस वन डे)
नोवोत्ना यांना चार वर्षांनी मार्टिना हिंगीसविरुद्ध अंतिम सामना गमवावा लागला. अखेर १९९८ मध्ये त्यांचे स्वप्न साकार झाले. फ्रान्सच्या नताली तौझियाला हरवून त्यांनी ही कामगिरी केली. तेव्हा त्यांचे वय २९ वर्षे व नऊ महिने होते. टेनिसमध्ये खुल्या स्पर्धांचे युग (ओपन एरा) सुरू झाल्यापासून त्या सर्वाधिक वयाच्या ग्रॅंड स्लॅम विजेत्या ठरल्या होत्या.
तेव्हाच्या काळानुसार नोवोत्ना सर्व्ह-व्हॉली शैलीचा खेळ करायच्या. दुहेरीत त्यांनी लक्षवेधी यश मिळविताना चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. त्या हेलेना सुकोवा, मार्टिना हिंगीस, लिंडसे डेव्हेनपोर्ट, आरांता सॅंचेझ, जीजी फर्नांडिस अशा खेळाडूंसह खेळल्या.
‘जणू काही मीच विजेती’
नोवोत्ना यांनी २०१५ मध्ये ‘बीबीसी’ला मुलाखत दिली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, १९९३ मध्ये अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मी फार दुःखी आणि निराश होते; पण मी वृत्तपत्र वाचायला उघडले, तेव्हा माझे ‘डचेस ऑफ केंट’ यांच्याबरोबरील छायाचित्र पहिल्या पानावर होते. ते पाहून मला क्षणभर वाटले की जणू काही मीच विजेती आहे. ती भावना फार सुखद होती. तेव्हाची वृत्तपत्रे मी आजही जपून ठेवली आहेत. ती छायाचित्रे फार सुंदर आहेत. त्यातून व्यावसायिक टेनिसची मानवी बाजू समोर आली. माझ्या पराभवानंतरही अनेकांना ती जाणवली. त्या अंतिम सामन्याचा मला सर्वाधिक अभिमान वाटतो, असे म्हणणे कदाचित फार चांगले वाटणार नाही; कारण, मी आघाडीवर असताना हरले होते. त्या प्रसंगाने मात्र मला खेळाडू, व्यक्ती म्हणून सरस बनविले. त्यामुळे मी कारकिर्दीत नंतर बरेच काही साध्य करू शकले.
दृष्टिक्षेपात कारकीर्द
एकूण १०० विजेतीपदे
एकेरीत २४, दुहेरीत ७६
१७ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे
एकेरीत एक, दुहेरीत १२, तर मिश्र दुहेरीत चार
१९९७ मध्ये डब्ल्यूटीए फायनल्स जेतेपद
१९९८ मध्ये फेडरेशन करंडक विजेत्या संघासाठी योगदान
१९८८ च्या सोल ऑलिंपिकमध्ये दुहेरीत रौप्य
१९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये दुहेरीत रौप्य, एकेरीत ब्राँझ
२००५ मध्ये ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान