esakal | तिसऱ्या मानांकित स्पेनच्या मुगुरुझाची झटपट सलामी
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या मानांकित स्पेनच्या मुगुरुझाची झटपट सलामी

तिसऱ्या मानांकित स्पेनच्या मुगुरुझाची झटपट सलामी

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत झटपट विजयी सलामी दिली. तिने अमेरिकेच्या वार्वरा लेपचेन्को हिला ६-०, ६-३ असे दोन सेटमध्येच गारद केले. मुगुरुझाला तिसरे मानांकन आहे. 

गार्बीनसाठी हा विजय आश्वासक ठरला. तिला या स्पर्धेत एकदाही तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. ती म्हणाली की, मी सर्वस्व पणास लावून खेळ केला. वार्वरा थोड्या दडपणाखाली होती. मी सुरवात चांगली केली. नंतर चुरस झाली. वार्वराचे फटके २२ वेळा चुकले. गार्बीनने सातत्याने आक्रमक खेळ केला. तिने नेटजवळ धाव घेतली. याशिवाय तिने कोर्टलगत भेदक फटके मारले.

तेराव्या मानांकित चेक प्रजासत्ताकाच्या पेट्रा क्विटोवाने सर्बियाच्या एलेना यांकोविच हिचे आव्हान ७-५, ७-५ असे परतावून लावले. पेट्रासाठी सामना सोपा नव्हता. एलेना पूर्वाश्रमीची अव्वल खेळाडू आहे. २००८ मध्ये तिने येथे उपविजेतेपद मिळविले होते. तिच्या प्रतिआक्रमणासमोर पेट्राला संघर्ष करावा लागला.

क्रिस्टीना प्लिस्कोवा हिनेही आगेकूच केली. तिने जपानच्या मिसा एगुचीला ६-२, ६-२ असे हरविले. 

पुरुष एकेरीत अमेरिकेच्या स्टीव जॉन्सन याने स्पेनच्या निकोलस अल्माग्रो याला ६-४, ७-६ (७-२), ७-६ (७-५) असे हरविले.