
मेलबर्न - सहा वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली. त्याने फ्रान्सच्या गेल माँफिसचे आव्हान ४-६, ६-३, ६-१, ६-३ असे परतावून लावले. कोर्टवरील तापमान ६९ अंश सेल्सियस, तर बाहेरील तापमान ३९.९ अंश सेल्सियस असताना हा सामना झाला. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचचा खेळ चांगला झाला.
मेलबर्न - सहा वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली. त्याने फ्रान्सच्या गेल माँफिसचे आव्हान ४-६, ६-३, ६-१, ६-३ असे परतावून लावले. कोर्टवरील तापमान ६९ अंश सेल्सियस, तर बाहेरील तापमान ३९.९ अंश सेल्सियस असताना हा सामना झाला. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचचा खेळ चांगला झाला.
माँफिसने पहिले दोन गेम गमावल्यानंतर दोन वेळा सर्व्हिस गमावली. दुसऱ्या सेटदरम्यान माँफिसची दमछाक झाल्यासारखे जाणवले. जोकोविचने चौथ्या सेटच्या आठव्या गेममध्ये ब्रेक मिळविला; पण त्याला पहिला मॅचपॉइंट जिंकता आला नाही. त्यानंतर त्याला ब्रेकपॉइंटला सामोरे जावे लागले. त्याने आणखी दोन मॅचपॉइंट गमावले. चौथ्या मॅचपॉईंटला मात्र त्याने व्हॉली मारत विजय साकार केला.
वॉव्रींका पराभूत
जागतिक क्रमवारीत ९७व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या टेनिस सॅंडग्रेनने सनसनाटी निकाल नोंदविला. त्याने नवव्या मानांकित स्टॅन वॉव्रींकाला ६-२, ६-१, ६-४ असे तीन सेटमध्येच हरविले. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे वॉव्रींकाला विंबल्डननंतर ‘ब्रेक’ घ्यावा लागला. त्याचे पुनरागमन फसले. त्याची सर्व्हिस पाच वेळा खंडित झाली. याशिवाय त्याचे फटके ३५ वेळा चुकले.
फेडरर, थीम विजयी
रॉजर फेडररने जर्मनीच्या यान-लेनार्ड स्ट्रफला ६-४, ६-४, ७-६ (७-४) असे आरामात हरविले. पाचव्या मानांकित डॉमनिक थीमला अमेरिकेच्या डेनिस कुडलाने झुंजविले. थीमने ६-७ (६-८), ३-६, ६-३, ६-२, ६-३ असा विजय मिळविला.
गॉफीन पराभूत
‘डार्क हॉर्स’ अशी गणना झालेल्या बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनला पराभूत व्हावे लागले. फ्रान्सच्या अनुभवी ज्यूलियन बेन्नेने सातव्या मानांकित गॉफीनला १-६, ७-६ (७-५), ६-१, ७-६ (७-४) असे हरविले. ज्यूलियन ३६ वर्षांचा आहे. जागतिक क्रमवारीत तो ५९व्या स्थानावर आहे. त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत २०१३ नंतर प्रथमच तिसरी फेरी गाठली.
बुशार्डचे आव्हान संपुष्टात
अग्रमानांकित सिमोना हालेपने कॅनडाच्या युजेनी बुशार्डला ६-२, ६-२ असे सहज हरविले. पहिल्या फेरीदरम्यान तिचा घोटा मुरगाळला होता, पण त्या दुखापतीचा तिला या वेळी कोणताही त्रास जाणवला नाही. युजेनीने २०१४च्या विंबल्डन उपांत्य फेरीत सिमोनाला हरविले होते, पण यावेळी तिला २६ वेळा फटके चुकल्याचा फटका बसला.
शारापोवा-केर्बर लढत
तिसऱ्या फेरीत जर्मनीची अँजेलिक केर्बर आणि रशियाची मारिया शारापोवा आमनेसामने येतील. अँजेलिकने ३०वा वाढदिवस विजयाने साजरा केला. तिने क्रोएशियाच्या डॉन वेकीचला ६-४, ६-१ असे हरविले. शारापोवाने १४व्या मानांकित अनास्ताशिया सेवात्सोवाला ६-१, ७-६ (७-४) असे हरविले.