फेडररचे विक्रमी विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 July 2017

विंबल्डनचे सेंटर कोर्ट वेगळेच आहे. अनेक दिग्गजांनी येथे आपल्या कामगिरीची मोहोर उमटवली आहे. लढत कुठलीही असो, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सेंटर कोर्ट हाऊसफुल असते. येथे खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझे ते अनेकदा साकार झाले. पुढील वर्षी पुन्हा या कोर्टवर येऊन विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेन.
- रॉजर फेडरर

अंतिम लढतीत चिलीचवर सरळ सेटमध्ये मात
लंडन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने लौकिकास साजेसा खेळ करत रविवारी विंबल्डनचे विक्रमी आठवे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा सरळ सेटमध्ये एक तास ४१ मिनिटांत पराभव केला. 

फेडररने अकराव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठताना आठव्यांदा विजेतेपद मिळविले. एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदाचा विक्रमही आता फेडरेरच्या नावावर नोंदला गेला. फेडररचे हे कारकिर्दीमधील एकोणीसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. 

पहिल्या सेटमध्ये चिलीच कोर्टवर घसरून पडला आणि त्यानंतर जणू त्याचे स्वतःच्या खेळावर नियंत्रणच राहिले नाही. पहिल्या सेटमध्ये पाचव्या आणि नवव्या गेमला चिलीचची सर्व्हिस ब्रेक करत फेडररने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीलाच मिळालेल्या ब्रेकच्या संधीने फेडररने ३-० अशी आघाडी घेतली. त्या वेळेस चिलीचला पायाच्या दुखापतीवर इलाज करण्यासाठी ट्रेनरची मदत घ्यावी लागली. त्या वेळी चिलीच लढतीतून माघार घेतो की काय असे वाटले होते; पण उपचारासाठी आवश्‍यक वेळ घेत तो पुन्हा कोर्टवर उतरला. अर्थात, त्याचा खेळावर परिणाम झाला. तो शंभर टक्के योगदान देऊ शकला नाही. दुसरा सेट त्याने सहज गमावला. तिसऱ्या सेटमध्ये चिलीचने चांगली सुरवात केली. सेट बरोबरीत असतानाच सातव्या गेमला फेडररने पुन्हा ब्रेकची संधी साधली आणि विजेतेपदावर सहज शिक्कामोर्तब केले. 

दृष्टिक्षेपात लढत
निकष     फेडरर     चिलिच

एस           ८            ५
डबल फॉल्ट   २          ३
ब्रेक पॉइंट     ५-१०     ०-१
विनर्स           २३     १६
एरर्स            ८     २३

अंतिम निकाल
रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड ३) वि.वि. मरिन चिलीच (क्रोएशिया ७)
६-३, ६-१, ६-४

दि ग्रेट फेडरर
फेडररचे वयाच्या ३५व्या वर्षी विंबल्डन विजेतेपद
अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर खेळाडू. यापूर्वी १९७६ मध्ये आर्थर ऍश यांचे वयाच्या ३२व्या वर्षी विजेतेपद. 
एकही सेट न गमावता फेडररचे विंबल्डन विजेतेपद. यापूर्वी १९७६ मध्ये बियाँ बोर्ग यांची अशी कामगिरी
फेडररचे आठवे विंबल्डन विजेतेपद. कारकिर्दीमधील १९वे ग्रॅंड स्लॅम विजेतेद
विली रेनशॉ आणि पीट सॅम्प्रास यांचा पुरुष एकेरीत सर्वाधिक सात विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news roger federer win wimbledon competition