esakal | युकीने दवडली संधी, रामने दिली झुंज
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगे बालेवाडी - टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉबर्टो बॉटिस्टा आगुट याचा पराभव केल्यानंतर आनंद व्यक्त करताना जिल्स सिमॉन.

युकीने दवडली संधी, रामने दिली झुंज

sakal_logo
By
मुकुंद पोतदार

पुणे - टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील भारताच्या आशा संपुष्टात आल्या. युकी भांब्रीने फ्रान्सच्या पिएर-ह्युजेस हर्बर्ट याच्याविरुद्ध विजयाची संधी दवडली, तर रामकुमार रामनाथनने अग्रमानांकित मरिन चिलीच याच्याविरुद्ध दाखविलेली जिगर सकारात्मक ठरली. गतविजेत्या रॉबर्टो बॉटीस्टा आगुटला फ्रान्सच्या जिल्स सिमॉनकडून पराभवाचा धक्का बसला.

प्रकाशझोतात प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडलेल्या लढतीत रामकुमारने रंग भरले. माजी अमेरिकन विजेता चिलीच जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. त्याच्याविरुद्ध पहिल्या गुणापासून अखेरच्या गुणापर्यंत संघर्ष करू, असे रामकुमारने पहिल्या फेरीनंतरच सांगितले होते. पहिल्या सेटच्या अंतिम टप्यात त्याने चिलीचची सर्व्हिस भेदत आपले शब्द खरे ठरविले. समोर मातब्बर प्रतिस्पर्धी असला तरी मायदेशात सेंटर कोर्टवर खेळताना भारतीय खेळाडू निर्धाराने प्रतिकार करू शकतात, हे रामकुमारने दाखवून दिले.

युकीने संधी दवडली
मुख्य आशास्थान असलेल्या युकी भांब्रीने मात्र संधी दवडली. हर्बर्टविरुद्ध त्याला तीन सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. निर्णायक सेटमध्ये तब्बल 
सहा ब्रेकपॉइंट दवडल्याचा फटका त्याला बसला. त्यामुळे त्याची उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाची संधी हुकली. 

युकी जागतिक क्रमवारीत ११८व्या क्रमांकावर, तर हर्बर्ट ८१व्या स्थानावर आहे. पहिल्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये हर्बर्टची सर्व्हिस भेदत युकीने सुरवात चांगली केली. त्याने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. त्या वेळी त्याचे पारडे जड होते; पण हर्बर्टने दुसऱ्या सेटच्या दुसऱ्याच गेममध्ये ब्रेक मिळविला. त्याने हा सेट जिंकून बरोबरी साधली. त्यानंतरही युकीला संधी होती; पण निर्णायक सेटमध्ये त्याने दुसऱ्या गेममध्ये तीन ब्रेकपॉइंट दवडले. चौथ्या गेममध्येसुद्धा हेच घडले.

हर्बर्टने मोक्‍याच्या क्षणी झंझावाती सर्व्हिसचे अस्त्र प्रभावीपणे वापरले. त्याने तब्बल १३ बिनतोड सर्व्हिस केल्या. या तुलनेत युकीला एकच बिनतोड सर्व्हिस करता आली. युकीला प्रेक्षकांचे जोरदार प्रोत्साहन मिळत होते; पण त्याला खेळ उंचावता आला नाही. प्रतिस्पर्ध्याच्या झंझावाती सर्व्हिससमोर निरुत्तर झाल्यामुळे त्याचे मनोधैर्य खचल्याचे अंतिम टप्प्यात जाणवले. हर्बर्टने अखेरीस ताशी दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने बिनतोड सर्व्हिस केली.

बेनॉइटने जिंकली मॅरेथॉन
फ्रान्सच्या बेनॉइट पैरेने वाइल्ड कार्डच्या संधीचा फायदा उठवत आगेकूच केली. त्यासाठी त्याला मॅरेथॉन झुंज द्यावी लागली. ८५व्या स्थानावरील मॅरटॉन फुचसोविक्‍स याचे आव्हान त्याने तीन तास दोन मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत परतावून लावले.

सिमॉनचा पराक्रम
फ्रान्ससाठी दिवसातील तिसरा विजय सिमॉनने नोंदविला. तृतीय मानांकित आगुटविरुद्ध त्याचा योजनाबद्ध खेळ निर्णायक ठरला.

निकाल (दुसरी फेरी) - मरिन चिलीच (क्रोएशिया १) विवि रामकुमार रामनाथन ६-४, ६-३. पिएर-ह्युजेस हर्बर्ट (फ्रान्स ८) विवि युकी भांब्री ४-६, ६-३, ६-४. बेनॉइट पैरे (फ्रान्स ४) विवि मॅरटॉन फुचसोविक्‍स (हंगेरी) ६-४, ६-७ (४-७), ७-६ (८-६). रॉबीन हासी (नेदरलॅंड्‌स ५) विवि निकोलस जॅरी (चिली) ३-६, ७-६ (७-५), ७-५. जिल्स सिमॉन (फ्रान्स) विवि रॉबर्टो बॉटीस्टा आगुट (स्पेन ३) ६-३, ७-६ (७-५). रिकार्डो ओजेडा लारा (स्पेन) विवि इल्या इव्हाश्‍का (बेलारूस) ६-४, ६-४.

रामकुमारचा फर्स्ट सर्व्हवरील वेग चांगला होता. त्याचा सेकंड सर्व्हचा वेगही चांगला आहे. पुढे सरसावत त्याने मारलेले फोरहॅंड चांगले होतेट. फक्त बॅकहॅंडवरील सातत्य कमी होते. तो चांगली झुंज देत होता आणि त्याचा कोर्टवरील दृष्टिकोन चांगला होता, जे नेहमीच महत्त्वाचे असते.
- मरिन चिलीच

चिलीच मातब्बर खेळाडू आहे. त्याच्याविरुद्ध खेळण्याचा आनंद लुटावा, असा सल्ला मला प्रशिक्षक एमिलीओ सॅंचेझ यांनी दिला. विजयाची संधी असल्याचे समजूनच मी कोर्टवर उतरलो होतो. मी सर्वस्व पणास लावले. पुण्यात भारतीय टेनिसपटूंना नेहमीच चांगले प्रोत्साहन मिळते. गेल्या वर्षी डेव्हिस करंडक स्पर्धेच्या वेळी याची प्रचिती आले. येथे सातत्याने चॅलेंजर स्पर्धा होत आहे. त्यामुळे येथे खेळताना नेहमीच आनंद वाटतो.
- रामकुमार रामनाथन