व्हीनसला हरवून मुगुरुझा विजेती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 July 2017

लंडन - स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने विंबल्डनच्या महिला एकेरीचे विजेतेपद संपादन केले. निर्णायक सामन्यात तिने अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सवर नेत्रदीपक विजय संपादन केला. सुरवात चुरशीने झाल्यानंतर मुगुरुझाने सलग नऊ गेम जिंकताना टॉप गिअर टाकला.

पाच वेळच्या विजेत्या ३७ वर्षीय व्हीनसचे पारडे २३ वर्षांच्या मुगुरुझाविरुद्ध जड होते, पण मुगुरुझाने पहिलेवहिले विंबल्डन विजेतेपद जिंकून स्वप्न साकार केले. दोन सेट पॉइंट वाचविल्यानंतर तिने रचलेले प्रतिआक्रमण व्हीनसला परतविता आले नाही. दुसरा सेट लव्हने जिंकत मुगुरुझाने जेतेपदावर मोठ्या थाटातच शिक्कामोर्तब केले.

मुगुरुझाने कारकिर्दीतील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले. गेल्या वर्षी तिने सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.

कोंचिताच्या पंक्तीत
मुगुरुझाला २०१५ च्या अंतिम सामन्यात सेरेनाने हरविले होते, पण यावेळी तिला ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवर यश मिळाले. स्पेनच्या माजी टेनिसपटू कोंचिता र्मार्टीनेझ तिच्या प्रशिक्षक आहेत. त्यांनी १९९४ मध्ये विंबल्डन जिंकले होते. या कामगिरीसह मुगुरुझा त्यांच्या पंक्तीत विराजमान झाली.

लढतीची सुरवात संघर्षपूर्ण झाली. व्हीनसने बिनतोड सर्व्हिसने (एस) सुरवात केली. दुसरीकडे मुगुरुझाकडून सर्व्हिसची दुहेरी चूक (डबल फॉल्ट) झाली. पहिली ४० मिनिटे दोघींची सर्व्हिस भक्कम झाली. व्हीनसला ५-४ अशा आघाडीस दोन सेट पॉइंट मिळाले होते. पहिल्या वेळी २० फटक्‍यांच्या रॅलीत तिला अनुभवाने दगा दिला, तर दुसऱ्या वेळी तिचा परतीचा फटका बाहेर गेला. त्यानंतर व्हीनसचा फोरहॅंड चाललाच नाही. चार सोपे फटके चुकल्यामुळे (अनफोर्स्ड एरर्स) मुगुरुझाला पहिल्या ब्रेकसह ६-५ अशी आघाडी मिळाली. मग तिने बॅकहॅंड लॉब मारत हा सेट जिंकला. त्यानंतरही व्हीनस जोरदार झुंज देईल, असे वाटले होते. पण हा सामना आणखी २५ मिनिटेच चालला.

मला सेरेनाची उणीव जाणवते. ती करते तसा खेळ करण्याचा मी सर्वोत्तम प्रयत्न केला, पण आता नंतर संधी मिळतील असे वाटते.
- व्हीनस विल्यम्स

व्हीनसविरुद्ध मला खडतर झुंज द्यावी लागली. ती फार विलक्षण खेळाडू आहे. तिचा खेळ पाहतच मी लहानाची मोठी झाले. तिल्या पराभूत केल्याबद्दल सॉरी...तिच्याविरुद्ध खेळायला मिळाल्यामुळे मी खूप भारावून गेले आहे. मी काहीशी भावविवश झाले आहे, कारण ही कामगिरी करण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहात होते. मी खेळताना मात्र एकाग्रता साधली.

- गार्बीन मुगुरुझा
 
दृष्टिक्षेपात लढत
निकष     मुगुरुझा     व्हीनस

एस     १     ३
डबल फॉल्ट     २     ५
ब्रेक पॉइंट     ४-७     ०-३
विनर्स     १४     १७
एरर्स     ११     २५
एकूण गुण     ६७     ५०
 
निकाल (अंतिम फेरी)
गार्बीन मुगुरुझा (स्पेन १४) विवि व्हीनस विल्यम्स (अमेरिका १०) ७-५, ६-०

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis competition