esakal | विंबल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ

बोलून बातमी शोधा

Wimbledon 2018 starts today

 ऐतिहासिक विंबल्डन स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्यात चुरस असेल. 

विंबल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन, ता. १ : ऐतिहासिक विंबल्डन स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्यात चुरस असेल. 
दरम्यान, ब्रिटनच्या अँडी मरे याने रविवारी सायंकाळी अचानक माघार घेतली. त्याचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. अद्याप पुरेसा तंदुरुस्त झालो नसल्याचे कारण मरेने दिला. मरेच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली आहे.

संभाव्य विजेता म्हणून फेडररचे पारडे जड आहे. फेडररने विक्रमी आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचे पारडे जड असेल. २०१६ मध्ये स्टॅन वॉव्रींकाने अमेरिकन विजेतेपद जिंकले. त्यानंतर फेडरर आणि नदाल यांच्याशिवाय इतर एकही खेळाडू ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत विजेता ठरू शकला नाही. वॉव्रींकासह मरे आणि जोकोविच यांना दुखापतींनी त्रस्त केले. या तिघांच्या तंदुरुस्तीवर या गटातील चुरस अवलंबून आहे.

महिला एकेरीत स्पेनची गार्बीन मुगुरुझा गतविजेती असली तरी सर्वांचे लक्ष अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर असेल. ३६ वर्षांच्या सेरेनाला ‘सुपरमॉम’ बनण्याची सर्वोत्तम संधी या स्पर्धेत आहे. जागतिक क्रमवारीत १८३वा क्रमांक असला तरी या स्पर्धेतील यशामुळे ऑल इंग्लंड क्‍लबने तिला खास बाब म्हणून २५वे मानांकन दिले आहे. सेरेनाने २०१५ व १६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. एकूण सात वेळा ती येथे विजेती ठरली आहे. सेरेनाला मार्गारेट कोर्ट यांच्या २३ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांच्या उच्चांकाशी बरोबरी करण्यासाठी एका ग्रॅंड स्लॅम करंडकाची प्रतीक्षा आहे. फ्रेंच स्पर्धेत मानांकन नसताना सुद्धा तिने चौथी फेरी गाठली. छातीचा स्नायू दुखावल्यामुळे तिला माघार घ्यावी लागली. सेरेनाची सलामी नेदरलॅंड्‌सच्या अरांता रुसविरुद्ध होईल. 
ड्रॉनुसार निकाल लागले तर तिसऱ्या फेरीत तिला पाचव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाविरुद्ध खेळावे लागू शकेल. त्यावेळी अनुभव ही सेरेनासाठी जमेची बाजू असेल.

फ्रेंच ओपनच्या वेळी मी सेरेनाचा खेळ पाहिला. त्या तुलनेत विंबल्डनमध्ये ती भक्कम आणि सर्वाधिक धोकादायक प्रतिस्पर्धी असेल. ती शंभर टक्के सज्ज आहे.
- मॅट्‌स विलॅंडर, 
स्वीडनचे माजी विजेते