विंबल्डनचे बाजीगर

Wimbledon's hero
Wimbledon's hero

लंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या बिग फोरमधील मरेने स्पर्धेच्या पूर्वसंध्येस माघार घेतली होती. या मॅचमधील एका सहभागी स्पर्धकाने आदल्यादिवशी गतविजेत्या फेडररची सद्दी संपवून त्याच्या फॅन्सना निराश केले होते. या निकालाच्या दोन दिवस आधी एकूणच इंग्लिश क्रीडाप्रेमी त्यांच्या फुटबॉल टीमचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपल्यामुळे हताश झाले होते. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या तीन नंबरच्या मॅचच्या काऊंटडाऊनमध्ये फार कुणाला विशेष असा इंटरेस्ट नव्हता.

 अशा बॅकग्राऊंडवर हे दोन स्पर्धक सेंटर कोर्टवर उतरले. म्हणायला गेले तर एकला आठवे, तर दुसऱ्याला नववे मानांकन. म्हणजे दोघे टॉप टेनमधील मानांकित. दोघे उंचपुरे. दोघांचेही हुकमी अस्त्र एकच-बिनतोड सर्व्हिस अर्थातच अशा बॅकग्राऊंडवरही हा मुकाबला किती रंगेल याविषयी सामान्य नव्हेच तर एक्स्पर्टनाही कमालीची उत्सुकता अशी काही नव्हती.

अमेरिकेचा जॉन इस्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा केव्हीन अँडरसन यांच्यातील मॅच सुरु झाल्यानंतर मात्र उत्सुकता ताणली जाणे म्हणजे काय असते याची पदोपदी प्रचिती येऊ लागली. निर्णायक पाचव्या सेटमध्ये तर उत्सुकता ताणली जाण्याची जी काही प्रोसेस असते तीच थांबली. जास्त ग्लॅमर आणि जास्त लोकप्रियता असलेले काही सांघिक क्रीडाप्रकार आणि वैयक्तिक पातळीवरील इतर काही खेळांमध्ये टेनिसचे खास स्थान कसे टिकून आहे हे या मॅचने सिद्ध केले.

निर्णायक सेट- नो टायब्रेक
विंबल्डनच्या नियमानुसार निर्णायक सेटमध्ये टायब्रेक होत नाही. 15-30-40-गेम अशीच पॉईंट्स सिस्टीम वापरली जाते. त्यामुळे हा सेट लांबणार हे अपेक्षित होते. 

आधीच्या फेऱ्यांचा संदर्भ
 अँडरसनला फेडरविरुद्ध चार तास 14 मिनिटे प्रयत्नांची शिकस्त करावी लागली होती. त्याआधी चौथ्या फेरीत तो फ्रान्सच्या गेल माँफीसविरुद्ध तीन तास 29 मिनिटे खेळला होता. दुसरीकडे इस्नरचा सर्वाधिक वेळ चाललेला सामना तीन तास 46 मिनिटांचा होता. दुसऱ्या फेरीत बेल्जियमच्या रुबेन बेमलमान्सविरुद्ध ही मॅच झाली होती. त्यावेळी त्याने दोन मॅचपॉइंट वाचविले होते. अँडरसनने मॅच जिंकल्यानंतर नेटच्या पलिकडील बाजूला जाऊन इस्नरचे अभिनंदन केले. तोपर्यंत अँकरचे कोर्टवर आगमन झाले होते. या तुफानी फाईटनंतर अँडरसनचा बाईट घेण्यास त्या उत्सुक होत्या.

अँडरसनची पहिली प्रतिक्रिया अशी होती- आय फील फॉर जॉन...
नंतर तो म्हणाला की, या घडीला मी फार रोमांचित झालेलो नाही त्याबद्दल मला माफ करावे.
 त्याच्या पहिल्या वाक्यावर पडलेल्या टाळ्या मग दुसऱ्या वाक्यानंतर आणखी वाढल्या. टेनिससच नव्हे तर अनेक खेळांमध्ये एखादी मॅच इतकी रंगते की त्यात दोघेही जिंकावेत असे प्रेक्षकांना वाटते, पण दुर्दैवाने तसे होत नाही. टायब्रेक असो किंवा नसो पराभूत स्पर्धकाबरोबरच मग प्रेक्षकांचाही हार्टब्रेक होतो. अशा मॅच मात्र यास अपवाद असतात. स्कोअर नोंदवायचा म्हणून विजयी स्पर्धकाचे नाव घेतले जाते, पण टेनिसप्रेमींच्या ह्रदयात दोन्ही बाजीगरांनी घर केलेले असते.

सोशल मिडीयावर धुव्वा                                                                                                वर्ल्ड कप फुटबॉलच्या रणधुमाळीतही या मॅचमुळे सोशल मिडीयावर धुव्वा झाला. यातील एक पोस्ट मार्मिक ठरली. रेयाल माद्रिदकडून युव्हेंट्सशी घसघशीत रकमेवर करारबद्ध झालेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डो, गतविजेत्या जर्मनीचा वर्ल्ड कपमधील सहभाग, टूर डी फ्रान्स या जगातील सर्वाधिक लोकप्रिय सायकल रेस आणि ही मॅच या संदर्भातील ही पोस्ट अशी : 
125 मिनिटे - माद्रिद ते ट्युरीन फ्लाईटचा वेळ (रोनाल्डोच्या कराराचे आकडे कितीही मोठे असले तरी ही मिनीटे त्याहून कमी असा आशय) 
270 मिनिटे - जर्मनीचा वर्ल्ड कपमधील सहभाग (गटातील प्रत्येकी 90 मिनिटांच्या तीन लढती) 
343 मिनिटे - यंदाच्या टूर डी फ्रान्स रेसमधील सर्वाधिक 231 किलोमीटर अंतराची स्टेज पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ
 395 मिनिटे - अँडरसन विरुद्ध इस्नर सेमी फायनल मॅचचा कालावधी

निकाल : केव्हीन अँडरसन (दक्षिण आफ्रिका-8) विजयी विरुद्ध जॉन इस्नर (अमेरिका 9) 7-6 (8-6), 6-7 (5-7), 6-7 (9-11), 6-4, 26-24

कालावधी : सहा तास 35 मिनिटे
- निर्णायक पाचव्या सेटचा कालावधी : दोन तास 50 मिनिटे
- विंबल्नडच्या इतिहासात सर्वाधिक वेळ चाललेली दुसऱ्या क्रमांकाची, तर टेनिसच्या इतिहासातील

तिसऱ्या क्रमांकाची मॅच
सर्वाधिक कालावधीची मॅच : विंबल्डनमध्येच, इस्नरचा सहभाग हा आणखी एक योगायोग
- इस्नर व फ्रान्सचा निकोलस माहूत यांच्यातील लढत 11 तास पाच मिनिटे रंगली
- निर्णायक सेटमध्ये इस्नरची 70-68 अशी बाजी

दुसऱ्या क्रमांकाची मॅच : 2015च्या डेव्हिस कपमध्ये अर्जेंटिनाचा लिओनार्डो मायर आणि ब्राझीलचा जोओ सौझा यांच्यात सहा तास 43 मिनीटे लढा
- अँडरसनचे वय : 32, इज्नरचे वय : 33
- निर्णायक सेटमध्ये एकमेव सर्व्हिसब्रेक
- अँडरसनने 49व्या गेममध्ये इस्नरची सर्व्हिस भेदली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com