AB de Villiers retirement | एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AB De Villiers

ट्विटमध्ये विराट कोहली, RCB नावांचा उल्लेख करत केली घोषणा

स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून माघार घेतली होती. त्यानंतर आज त्याने IPL मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटमधील माझा प्रवास खूपच छान होता. पण आता मी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने ट्वीट करून सांगितलं. माझ्या भावंडांसोबत घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला होता. मी खेळाचा आनंद घेत क्रिकेट खेळलो. अनेकांनी मला प्रोत्साहित केलं आणि मला चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आता वयाच्या ३७व्या वर्षी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे, अशी माहिती त्याने ट्वीट करून दिली.

"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना मला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला. ११ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही. कटू-गोड आठवणींचा ठेवा सोबत घेऊन मी क्रिकेटचा निरोप घेत आहे. निवृत्तीचा निर्णय घेणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवण्यासाठी मी अखेर निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. मी RCB च्या संघ व्यवस्थापनाचे, माझा मित्र विराट कोहलीचे आणि साऱ्यांचे आभार मानतो", असं डिव्हिलियर्सने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले.

"RCB सोबतचा प्रवास खूप संस्मरणीय होता. आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी मला या संघाने आणि खेळाडूंनी दिल्या. RCB माझ्या कायमच मनाजवळ असेल. या संघाने मला आणि माझ्या कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आहे. माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. मी कायम RCB चा चाहता असेन", असेही डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं.

loading image
go to top