नऊ तासांच्या चौकशीनंतर, आज अहवालासाठी बैठक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान साखळीतच आटोपल्यावर तब्बल पाच आठवड्यांनी या अपयशाची चौकशी सुरू झाली.

मुंबई : राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान साखळीतच आटोपल्यावर तब्बल पाच आठवड्यांनी या अपयशाची चौकशी सुरू झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीमुळे समितीचा अहवाल तयार करण्याचे काम करण्यासाठी बैठक उद्या (ता. 26) होणार आहे. 

दरम्यान, या मॅरेथॉन चौकशीत दहा खेळाडू, मार्गदर्शक राजू भावसार; तसेच व्यवस्थापिका आणि फिजिओ यांचीही चौकशी झाली. मात्र या चौकशीच्या वेळी अव्वल खेळाडू दीपिका जोसेफची अनुपस्थिती खटकत होती. दीपिकाप्रमाणेच पुण्याची स्नेहल शिंदेही आली नव्हती; पण तिला डेंगी असल्याचे कळले. संघटनेच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता सुरू झालेली शिस्तपालन समितीची बैठक आणि चौकशीची प्रक्रिया संध्याकाळी आठपर्यंत सुरू होती.

आता उद्याच्या बैठकीनंतरच समिती आपला अहवाल आता संघटनेच्या कार्यकारिणीस देणार आहे. समितीची 11 वाजता होणारी बैठक सुरू झाल्यानंतर संघातील काही खेळाडू शिवाजी पार्कवरील संघटनेच्या कार्यालयात आल्या. समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी केवळ तीन-चार खेळाडूच आल्याचे समजल्याने समिती सदस्य संतापले होते. राज्य कबड्डी संघटनेचा मान खेळाडूंनी राखायलाच हवा. खेळाडूंपेक्षा खेळ मोठा असतो, असे काही पदाधिकारी चिडून सांगत होते. त्याच वेळी या समितीतील काही सदस्यांनी चौकशीस अनुपस्थितीत राहणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाईची शिफारस करणार असल्याचे सांगितले होते. 

दरम्यान, पाटण्यातील राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी गेलेल्या संघाचे मार्गदर्शक राजू भावसार यांच्या चौकशीने प्रत्यक्ष चौकशीस सुरुवात झाली. त्यापूर्वी समितीने संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांच्याबरोबरही चर्चा केली. भावसार यांची सुमारे पाऊण तास चौकशी झाल्यानंतर उपस्थित खेळाडूंना काही लेखी प्रश्न देण्यात आले. त्यांना याबाबत स्पष्टपणे लिहिण्यास सांगण्यात आले. या वेळी खेळाडू एकमेकांशी कोणतीही चर्चा करणार नाहीत, याकडे लक्ष देण्यात आले; तसेच त्यांच्यापासून शिस्तपालन समितीतील सदस्य सोडून सर्वांना दूर ठेवण्यात आले. 

कर्णधार सायली केरीपाळेपासून खेळाडूंची चौकशी सुरू झाली. त्यानंतर सर्व खेळाडूंची चौकशी झाली. त्यांना काय चुकले; तसेच काय करायला हवे याचीही विचारणा केली. व्यवस्थापक तसेच फिजिओंचीही या वेळी चौकशी झाली. आता उद्याच्या अहवालाची राज्यातील कबड्डीप्रेमींना प्रतीक्षा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After a nine-hour inquiry, a meeting to report today